आले नवे E D पर्व उतरेल कित्येकांचा गर्व…
मी जेव्हा एखाद्या काळजीने चिंतेने दुःख्खाने अस्वस्थ अशांत चिंतीत होतो तेव्हा सारे काम बाजूला ठेवून गाढ झोप काढतो, कित्येक तास अशावेळी झोपा काढतो. 29 जून शुक्रवार आम्हा राजकीय पत्रकारिता करणार्यांसाठी तसा राजकीय वर्दळीचा आणि माहिती घेण्याचा दिवस होता, राज्यातल्या राजकीय घडामोडींना ऊत आला होता, नेहमीप्रमाणे 11 च्या आसपास घरातून बाहेर पडलो आणि वांद्रापर्यंत स्वतःच ड्राइव्ह करून आलो असतांना पुण्यातून नेमीच्या खबरी देणार्या मित्राचा फोन आला कि शपथविधी नक्की उद्या होईल पण फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, क्षणार्धात पुढल्या क्षणी पायाखालची वाळू सरकली म्हणजे एखाद्याला सुस्वरूप पत्नी मिळाल्याचा नक्की आनंद असतो पण त्याचवेळी आवडत्या देखण्या प्रेयसीशी लग्न झाले नाही होत नाही होणार नाही याचे दुःख अधिक अत्यंत तीव्र असते जे माझे झाले माझे मित्रवर्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याचा जेवढा आनंद झाला त्यापेक्षा सतत अडीच वर्षे ज्याच्यासाठी आपण किल्ला लढविला आणि किल्ला लढवीत असतांना थेट बाजी प्रभू देशपांडे होण्याची जी मोठी शक्यता होती त्याची कधी तमा भीती बाळगली नाही चिंता केली नाही तो आवडता देवेंद्र फडणवीस या राज्याचा खर्या अर्थने देवदूत किंवा मसीहा त्याचवेळी मुख्यमंत्री होत नाही याचे दुःख मोठे होते, त्याक्षणी मनातून काहीसा अस्वस्थ झालो आणि नरिमन पॉईंटच्या ऑफिस कडे निघालेलो मी, रस्ता बदलला आणि माहीम च्या माझ्या निवांतपणा देणार्या ऑफिस मध्ये येऊन थेट ऑफिस च्या गेस्ट हाऊस मध्ये शिरलो आणि संध्याकाळपर्यंत ताणून दिली, झोप काढली मध्येच अगदीच एकदा महत्वाचा फोन घेतला तेवढाच नंतर तीस तारिख उजाडली आणि एकंदर राजकीय हालचाली अजिबात संशयास्पद न वाटल्याने, मित्राने चुकीचे सांगितले अशी मनाची समजूत काढली आणि नेहमीप्रमाणे व्हिडीओ शूटिंग साठी नरिमन पॉईंटच्या ऑफिस मध्ये बाराच्या आसपास मी आणि विक्रांत माझा पत्रकार मुलगा पोहोचलो, तेवढ्यात पुन्हा त्याच मित्राचा फोन, आज शपथविधी नक्की आहे पण एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, फडणवीसांचा संबंध नसेल, अमित शाह यांनी हे घडवून आणले आहे, फडणवीसांना मुद्दाम बाजूला ठेवण्यात आले आहे त्यांची राजकीय अवस्था थेट नितीन गडकरी यांच्याही पेक्षा अधिक वाईट करण्याची त्यांच्या श्रेष्ठींचा हा मोठा डाव आहे, फडणवीस यांना यापुढे राजकीयदृष्ट्या अधिक कठीण दिवस येणार आहेत असे दिसते…
मी जे सांगतो तेच घडेल नेमके तेच घडणार आहे आणि माझे आत्ताचे सांगणे खोटे ठरल्यास मी तुला एक लाख रुपये हरणार आहे, मित्र म्हणाला, तोपर्यंत माझा व्हिडीओ आणि विक्रांतचे लिखाण आटोपले होते तेवढ्यात भाजपातल्या एका मोठ्या मान्यवर नेत्यांचाही तोच फोन आला कि फडणवीस ऐवजी आज शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि पुण्यातल्या मित्राच्या आदल्या दिवसापासूनच्या बातमीची या फोनमुळे खात्री पटली, विक्रांतने लिहिलेला ब्लॉग मागे घेतला आणि मी माझा व्हिडीओ आबा माळकर यांना रद्द करायला डीलीट करायला सांगितला कारण ज्या मित्रांच्या राजकीय खबरी कधीही खोट्या ठरत नाहीत त्यांनी आम्हाला हि माहिती दिली होती. त्यानंतर मात्र मी आणि विक्रांत दोघांनीही हि बातमी कुठेही लीक केली नाही तेवढ्यात एक आमदार आले, त्यांच्यासंगे गप्पा झाल्या खाणे पिणे झाले, विशेष म्हणजे हे आमदार यावेळी शंभर टक्के मंत्री किंवा राज्यमंत्री होणार आहेत तरीही त्यांना यातले काहीही ठाऊक नव्हते, त्यांचे जिवलग फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती, नंतर मी एका अत्यंत यशस्वी उद्योजक पण मोठा भाजपा नेता असलेल्या आवडत्या मित्राच्या कार्यालयात त्याचा तेवढ्यात फोन आला म्हणून गप्पा मारायला थोडक्यात वेळ घालायला म्हणून गेलो तेथे आणखी तीन फार मोठे भाजपाचेच स्टोलवर्ड्स बसलेले होते, तेथेही तासभर गप्पा झाल्या, फडणवीस मुख्यमंत्री होणार या आनंदात तेही होते, वेगवेगळ्या राजकीय आठवणी निघाल्या गप्पा रंगल्या, वास्तविक ते सारे भाजपाच्या आतल्या गोटातले फार मोठे नेते पण त्यांना देखील याची अगदी पुसटशीही कल्पना नव्हती, पुढल्या काही वेळात आपल्या साऱ्यांचा राजकीय खून होणार हे त्यांना माहित नव्हते, पावसाळ्यात अचानक अंगावर भिंत कोसळावी असेच त्यांचे होणार होते, मी मात्र मिळालेली बातमी तेथेही काढली नाही फोडली नाही आणि चारच्या आसपास पुन्हा ऑफिस मध्ये परतलो तेवढ्यात फडणवीसांची पत्रकार परिषद सुरु झाली, आणि त्यांनी जाहीर केले कि मी सत्तेत नसेल आणि एकनाथ शिंदे राज्याचे पुढले मुख्यमंत्री असतील. आम्हाला सतत दोन दिवस मिळणारी बातमी खरी ठरली, मी आबा माळकर विक्रांत आणि माझे अख्खे कार्यालय दुःख सागरात क्षणार्धात आकंठ बुडाले, पुढल्या क्षणी वेळेआधीच ऑफिस बंद करण्याच्या मी सूचना दिल्या आणि आम्ही बाहेर पडलो….
पुढल्या घडामोडी कानावर पडत होत्या, आमचे नेहमीचे सोर्सेस फोन करून माहिती देत होते, आणि कानावर बातमी आली कि फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोदी विशेषतः अमित शाह आणि भाजपाच्या लोकप्रियतेचा ग्राफ जगभरातून अतिशय वेगाने खाली आला आहे, येतो आहे, तिकडे संघ मुख्यालयात फडणवीस यांचा या जोडगळीने गडकरी केल्याने खळबळ माजली असून देशातला प्रत्येक मोठा संघ आणि भाजपा नेता मोदी आणि शाह यांना दूषणे आणि शाप देत बसला आहे, राज्यात संतापाची आणि निराशेची एका क्षणात मोठी लाट पसरली आहे. अर्थात हे त्या दोघांच्या कानावर गेले आणि पुढल्याच क्षणी भाजपावादग्रस्त श्रेष्ठींना त्यांनी केलेली मोठी चूक उमगली, विशेष म्हणजे या गदारोळात मुंबईत जमा झालेले फडणवीस प्रेमी अक्षरश: धाय मोकलून रडत होते, नाना पटोले यांच्यासारखे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक आणि विरोधी पक्षातले असूनही डोळ्यात पाणी आणून प्रतिक्रिया नोंदवत होते, राज्यातला मग तो कोणीही असो कुठल्या जातीचा किंवा राजकीय विचारांचा असो हळहळ व्यक्त करीत असतांना संबंधितांना शिव्यांची लाखोली अर्पण करतांना कानावर पडत होते, घरातला मोठा कर्ता पुरुष गेल्याचे जणू हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख होते, शेवटी मोदी शाह नड्डा साऱ्यांचे फडणवीस यांना फोन आले, आमच्या हातून आज फार मोठी चूक घडली त्यांनी मान्य केले, फडणवीस मात्र निर्विकार आणि शांत होते आणि त्यांनी मोदी यांची सूचना शेवटी मान्य केली, फडणवीस अपमानित होऊन देखील राज्याच्या आणि भाजपाच्या हितासाठी शेवटी शपथ घेऊन मोकळे झाले खरे पण आजपासून त्यांनी नव्या राजकीय परिवर्तनाची मोठी नांदी दिली. मित्रांनो, एकाएकी राज्यातले हे बदललेले गढूळ राजकारण आणि तापलेले राजकीय वातावरण त्यावर येथे मी पुनःपुन्हा येईन, नवे एकनाथ प्लस देवेंद्र म्हणजे नवे E D पर्व सुरु झाले आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी