राज्यातले राजकीय रोग रोगी आणि भोगी…
अलीकडे आमच्या घरी एका अगदीच खाजगी आणि मर्यादित स्वरूपाच्या समारंभाला मोजक्या आमंत्रितांना निमंत्रित केले होते, मैत्री कशी जपावी, संबंध कसे वाढवावेत, ओळखी कशा ठेवाव्यात, समोरच्याला क्षणार्धात आपलेसे कसे करावे, एखाद्याला एका क्षणात कसे जिंकावे, कितीही वर्षांनी भेटल्यानंतर एखाद्याला त्याच्या नावानिशी बोलावून कशी तेथे जमलेल्या सर्वांची दाद मिळवावी असे दिवंगत विलासराव देशमुख किंवा आर आर पाटील यांच्यासारखे फारच कमी नेते असतात आणि याची सुरुवात या राज्यात मला वाटते शरद पवार यांनी केली त्यावर कळस अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी चढविला अर्थात पवार किंवा फडणवीसांसारखे जितेंद्र आव्हाड, राज ठाकरे किंवा नागपुरातले गिरीश गांधी, आशिष शेलार यांच्यासारखे आणखीही काही नेते या राज्यात आहेत ज्यांचे प्रचंड अफाट लोकसंग्रह हे त्यांच्या यशाचे गमक आहे. त्याच्या नेमके उलटे उद्धव ठाकरे यांचे म्हणजे ज्या पदावर त्यांनी दिवस रात्र फक्त आणि फक्त लोकांमध्ये कार्यकर्त्यात जनतेत मिसळून अख्खा महाराष्ट्र आपलासा करून मोकळे होण्याची त्यांना सुवर्ण संधी चालून आली होती, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आजही ते जेव्हा एखाद्या कर्मठ घराण्यातल्या विटाळ आलेल्या बाईसारखे साऱ्यांपासून सतत दूर पळतात, शिवसैनिकांच्या जनतेच्या नेत्यांच्या मनातली उद्धव यांच्या वागण्याची तिरस्कार करण्याची दूर ठेवण्याची नेमके पिता बाळासाहेब ठाकरे यांच्या विपरीत स्वभावाची हि जखम हळू हळू वाढत जाऊन आज ती फार मोठी झालेली आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे. प्रकृती स्वास्थ्याचे कारण पुढे करून कदाचित त्यांच्या जवळचे उद्धव यांची बाजू भलेही घेत असतील पण उद्धव जेव्हा अगदी ठणठणीत होते वरून शिवसेना प्रमुख देखील होते तेव्हा तरी ते इतर सामान्यांना कधी उपलब्ध झालेत का, नाय नो नेव्हर !! आर्थिक हित संबंध ठेवणारे तेवढे बिलगलेले, जवळ बसलेले हेही दृश्य उद्धवजी, राज्यातल्या शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या लोकांना विशेषतः सामान्य शिवसैनिकांना मोठी जखम करुन गेले आहे , आमचे उद्धव ठाकरे हे आमच्यातल्याच दिवंगत आनंद दिघे किंवा आजच्या एकनाथ शिंदे पद्धतीने आमचे प्रत्यक्ष भेटून किंवा आमच्यात मिसळून आमच्या समस्या, आमची गाऱ्हाणी का ऐकून घेत नाही, आम्हाला कधीही अजिबात भेटत नाहीत, हे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सामान्य लोकांचे अनेक नेत्यांचे प्रत्येक शिवसैनिकांचे खूप मोठे शल्य आहे त्यांना तुमच्या या वागण्याच्या सतत वेदना होत असतात किंवा जेथे स्वार्थ त्यांना अगदी लगेच भेटायचे आणि इतरांना दुखवायचे कारण टाळायचे, उद्धवजी याची राजकीय जीवनात मोठी किंमत तुम्हाला कदाचित मोजावी लागेल आणि मी हे तुम्हाला द्वेषापोटी नव्हे तर प्रेमापोटी येथे अगदी जाहीर सांगतो आहे…
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा अनिरुद्ध अष्टपुत्रे हा एक निष्क्रिय पण चतुर म्हणजे उद्धव कसे बदनाम होतील पद्धतीने काम करणारा एक जनसंपर्क अधिकारी आहे त्याने मागल्या वर्षी त्याच्या मर्जीतल्या किंवा केवळ उद्धव यांच्या आवडीच्या काही उत्तम आणि काही अगदीच सामान्य किंवा दुकानदारी करणाऱ्या पत्रकारांची, मीडियात काम करणाऱ्यांची उद्धव यांच्याशी भेट घडवून आणली आणि मला वाटते अष्टपुत्रे याच्या मनात ज्या अनेक मान्यवर पत्रकारांविषयी असूया द्वेष किंवा राग होता त्यांना उद्धव पासून लांब ठेवले अर्थात उद्धव यांना न भेटल्याने असे पत्रकार किंवा मीडियातले संपले असे होत नसते असे अजिबात झाले नाही घडले नाही पण ज्यांना अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी या पद्धतीने अपमानित केले, त्यातल्या माझ्या काही जवळच्या मित्रांनी त्याला फोन केला त्यावर अष्टपुत्रे म्हणाले, उद्धव यांची तुमच्याशीही मी नक्की भेट घालून देणार आहे आणि तसे मी केले नाही तर नोकरी सोडून राजीनामा देऊन घरी निघून जाईन, वर्षे दीड वर्षे उलटले, त्या नाराज मोठ्या मान्यवर मीडियाची ना भेट अष्टपुत्रे यांनी घालून दिली ना ते राजीनामा देऊन मोकळे झाले. जवळची माणसे त्यांच्या विचित्र वागण्यातून एखाद्या मान्यवर मोठ्या व्यक्तिमत्वाला कशी युक्तीने संपवून विरोधकांच्या मर्जीतले काम फत्ते करून मोकळे होत असतात त्यावर हे असे झारीतले शुक्राचार्य बहुतेक मान्यवरांच्या जवळच्या घोळक्यात असतात ज्यांना हुडकून काढून बाहेर काढणे अतिशय कठीण असे काम असते. आणखी एका मुख्यमंत्र्यांचे उदाहरण येथे देतो म्हणजे माझया बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीच्या पत्रकारितेत ज्यांचा मी सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांपैकी एकमेव असा कायम सतत उल्लेख करीत आलो आहे ते आपले पृथ्वीराज चव्हाण, जर मध्यंतरी जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी किंवा युती असतांना काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी वरून म्हणजे दिल्लीतून थेट पृथ्वीराज चव्हाण या देशभक्ताला या महाराष्ट्राच्या सेवेकर्याला स्वभावाने रिंग मास्टर किंवा कडक शिस्तीच्या या हेड मास्तरला महाराष्ट्राचा त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पाठविले नसते तर राष्ट्र्वादीतल्या अजित पवारांसारख्या बहुतेक साऱ्याच मंत्र्यांनी आणि थेट काँग्रेस कोट्यातल्या मंत्र्यांनी देखील गेट वे ऑफ इंडिया सारख्या सरकारी मालमत्ता सुद्धा आमच्याच खाजगी मालमत्ता कशा, सांगून विकून टाकल्या असत्या, राज्यातल्या जनतेला आणखी कंगाल हताश निराश फ्रस्ट्रेट करून हे असे मंत्री मोकळे झाले असते पण काय त्या काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींना सुबुद्धी सुचली आणि त्यांनी अत्यंत शिस्तप्रिय बऱ्यापैकी देशभक्त सुसंस्कारित निर्व्यसनी पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री केले येथे धाडले. अर्थात उद्धव ठाकरे पद्धतीने याच पृथ्वीराज यांना देखील माणूसघाणा मीडियाघाणा पद्धतीचा स्वभाव नडला आणि या विचित्र विक्षिप्त स्वभावातून पृथ्वीराज चव्हाण राजकारणातून खूप बाहेर फेकल्या गेले पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे कि मोठे नुकसान महाराष्ट्राचे आणि येथल्या जनतेचे झाले, यापुढे दिल्लीतले पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रचंड नाराज असलेले पक्ष श्रेष्ठी आणि या राज्यातले काँग्रेसमधले नारद पद्धतीचे नेते या चव्हाणांना पुन्हा अशी नामी संधी देतील, दूरदूरपर्यंत वाटत नाही तसे अजिबात दिसत नाही त्यामुळे उद्या हेच देशभक्त शिस्तप्रिय पृथ्वीराज भाजपच्या गळाला लागले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. सतत कायम दर क्षणी जे नेते सामान्य लोकात मिसळतात, सर्वसामान्यांना आपले आपल्यातले वाटतात असेच नेते प्रदीर्घ काळ लोकमान्यता टिकवून झपाट्याने पुढे जातात प्रसंगी कधी अपयशी ठरले तरी…
अर्थात पृथ्वीराज आणि उद्धव दोघांच्या माणूसघाण्या स्वभावावर वृत्तीवर मी डीपली विचार केला असता मला वाटते उद्धव हे मुख्यमंत्री होण्याआधी किंवा सेना प्रमुख असतांना किंवा त्याहीआधी हे असेच माणूसघाणे असतांना देखील त्यांना अगदी थेट सांगायचे झाल्यास बाळासाहेब ठाकरेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आर्थिक आणि राजकीय यश मिळाले मिळते आहे मिळत गेले आणि हे असे वागूनही जर त्यांना यश मिळत असेल तर मला नाही वाटत याही पुढे ते स्वतःला बदलवून घेतील स्वतःमध्ये बदल घडवून आणतील. पण बदल न घडवून आणणे हा त्यांचा अतिआत्मविश्वास आहे का, तो त्यांना नजीकच्या काळात एकाकी पडू शकतो का किंवा ते अपयशी ठरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे का, निदान उद्धव बाबतीत प्रेडिक्शन करणे म्हणजे काम वासनेने पेटलेल्या वाघासमोर एखाद्याने ओठांचा चंबू करून उभे राहणे, नको ते उद्धवबाबत कोणतेही भविष्य वर्तविणे, काळ ठरवेल काय घडवून आणायचे ते. पत्रकार, मीडियातल्या अनेक मान्यवरांना भेटणे टाळायचे हे उद्धव यांना स्वतःला देखील तसे वागायचे असेल पण अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी नेमके कारण सांगितल्यास ते उगाच तोंडावर पडणार नाहीत…
अपूर्ण : हेमंत जोशी