बदल घडवा नाहीतर आम्हाला सोडा…
राज्यातल्या ज्या गुप्त घडामोडी तुमच्या कानावर पण पडलेल्या नाहीत आल्या नाहीत त्या येथे मी तुम्हाला सांगणार आहे, ऐकून तुमच्यातले काही चमूकन बघतील तर काही हबकून जातील काही दचकून उठतील तर काही सावध होतील. जे कोणालाही माहित नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे घडते आहे किंवा नजीकच्या काळात घडणार आहे त्यातून फार मोठी खूप मोठी राजकीय उलथापालथ नक्की होणार आहे. महाराष्ट्रातले जे काँग्रेच्या तिकिटावर निवडहून आलेले आमदार आहेत पण नामदार नाहीत त्यातले जे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते किंवा आहेत ते त्यांच्या पक्ष श्रेष्ठींवर विशेषतः राज्यातल्या स्वार्थी नेतृत्वावर त्यांच्या जवळपास साऱ्याच मंत्र्यांवर मनापासून मनातून खूप खूप खूपच नाराज आहेत त्यांच्या या अस्वस्थततेचा आता केव्हाही म्हणजे कोणत्याही क्षणी स्फोट होणार आहे घटस्फोट देखील होणार आहे, कदाचित नाराज आमदारांचा वेगळा गट जन्माला येऊन ते बंड करून मोकळे होतील त्यातून राज्यात उरलीसुरली संपत आलेली काँग्रेस देखील नक्की संपून जाईल. महाआघाडी सरकार सत्तेवर येऊन आता जवळपास तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना देखील दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी मंत्रिमंडळात कोणताही बदल घडवून आणलेला नाही, बदलानंतर तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की स्थान मिळेल हे जे प्रॉमिस गांधी परिवाराने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा धुळ्याच्या राज्यातल्या काँग्रेस मधल्या किंवा राजकारणातल्या अत्यंत लोकप्रिय व प्रभावी आमदार कुणाल रोहिदास पाटील सारख्या काही आमदारांना केले होते ते सोनिया किंवा राहुल यांनी न पाळल्याने मंत्री मंडळातले काँग्रेस चे सदस्य सोडल्यास जवळपास सारेच आमदार या दिवसात त्यांच्या पक्ष श्रेष्ठींवर अतिशय नाराज आहेत आणि मनातून एवढे चिडले आहेत कि या नाराज आमदारांना केवळ छेडण्याचा अवकाश ते त्यांच्या दिल्लीतल्या पक्ष श्रेष्ठींना तीही शिव्यांची लाखोली वाहून मोकळे होतात…
जेव्हा या राज्यात काँग्रेस भरभक्कम होती ताकदवान होती तेव्हा ज्या चुका करून पक्ष श्रेष्ठींनी राज्यातली प्रभावी काँग्रेस बघता बघता संपविली, आणि आज असलेल्या अत्यंत भीषण अवस्थेत देखील जर काँग्रेसचे दिल्लीतले श्रेष्ठी वारंवार त्याच त्या चुका करून उरली सुरली काँग्रेस या राज्यातली संपवणार असतील तर या अशा काँग्रेस मध्ये राहून करयचे काय असा थेट सवाल रावेरच्या शिरीष मधुकरराव चौधरी सारखे अनेक आमदार एकमेकांना सतत करीत असल्याचे माझी नेमकी माहिती आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे राहुल गांधी भारतात राहायला तयार नाहीत बिना कामाचे ते परदेशात सतत फेऱ्या मारून नेमके काय करतात हे गूढ अद्याप उकलले नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे आमदार नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर नाराज आहे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नेमके माहित असल्याने किंवा आमची नाराजी गांधी परिवाराच्या कानावर टाका असे पृथ्वीराज यांना आमदारांकडून वारंवार सांगितले जात असल्याने ते राहुल किंवा सोनिया यांना गेल्या दोन वर्षांपासून सतत भेटीची वेळ मागत असतांना त्यांनाही भेटीची वेळ मिळत नसल्याने म्हणजे महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रभावी आमदारांना हे असे सतत डावलले जात असल्याने म्हणजे भेटीची वेळ मिळत नसल्याने थोडक्यात अपमानित केले जात असल्याने कोणत्याही क्षणी राज्यातल्या काँग्रेस मध्ये शंभर टक्के बंड होईल आणि राज्यातल्या उरल्या सुरल्या काँग्रेसचा नक्की राजेश खन्ना होईल यात तिळमात्र शंका वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा एखादा मंत्री सोडल्यास उरलेल्या समस्त मंत्र्यांवर महाराष्ट्रातले आमदार विशेषतः प्रत्येक जिल्ह्यतले कार्यकर्ते महाआघाडी सरकारवर केवळ नाराज नाहीत तर मनापासून चिडले संतापले रागावलेले आहेत जणू हि आता धोक्याची सूचना मी या ठिकाणी त्यांच्या वतीने त्यांच्या पक्षश्रेष्ठींना करतो आहे कि लगेच नेमकी मोठी ऍक्शनघ्या अन्यथा राज्यातल्या इंदिरेच्या काँग्रेसमध्ये मोठी फूट अटळ आहे…
सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या उपयोगी पडतील अशी सारी खाती अगदी सुरुवातीला शिवसेना विशेषतः राष्ट्रवादी आपल्याकडे ठेवून मोकळी झाली आहे आणि काँग्रेसची अवस्था म्हणजे एखाद्या तरुणाचे जख्खड म्हातारीशी लग्न लावून दिल्यासारखी झालेली आहे त्यात काँग्रेसचे मंत्री त्यांच्याच आमदारांच्या उपयोगी पडत नाहीत आणि कार्यकार्त्यांना तर साधी प्रेमाची झप्पी देखील ते द्यायला तयार नाहीत तिकडे शिवसेना काँग्रेस पासून कोसो दूर आहे आणि राष्ट्रवादी याच काँग्रेसला सतत आपला शत्रू किंवा प्रतिस्पर्धी मनात असल्याने त्यांना अगदी शरद पवार यांच्यासहित राज्यातल्या काँग्रेसचे होईल तेवढे अधिक वाटोळे बघण्यात कायम मनापासून आनंद होत असतो, नाही म्हणायला राज्यातल्या काँग्रेसकडे त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडे राज्यातले थेट गार्हाणे मांडू शकतील असे सुशीलकुमार शिंदे मुकुल वासनिक इत्यादी अनेक नेते आहेत पण या अशा नेत्यांचे आपल्याच नाराज आमदारांशी नसबंदी केलेल्या नवऱ्यासारखे नाते आहे असते, जेथे आमदार पोरके तेथे कार्यकर्त्यांची किती व कशी कठीण अवस्था असेल, कल्पना करा म्हणजे ग्रहण सुटल्यानंतर मोठ्यांदा आवाज करून रस्त्याने दान मागणाऱ्या मजबूर मंडळींसारखी मित्रानो राज्यातल्या काँग्रेस मधल्या कित्येक किंवा प्रत्येक बहुतेक कार्यकर्त्याची शोचनीय भीषण दारुण अवस्था या दिवसात झाली आहे, महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे कानाकोपऱ्यातले नेते आमदार आणि कार्यकर्ते असे सैरभैर झालेले असल्याने नजीकच्या काळात काँग्रेस मधून तेही मोठे बंड करून अनेक बाहेर पडतील विशेष म्हणजे त्यात असंख्य आमदार आघाडीवर असतील..
पुढले पुढल्या भागात : हेमंत जोशी