अंतिम भाग : केली हाड हाड म्हणून झाला पहाड आव्हाड…
कोण येऊन तुमच्या चांगल्या चाललेल्या संसारात माशी शिंकून जाईल सांगता येत नाही, माझे आमच्या या घरात काही वर्षांपासून चांगले चालले होते, विशेष म्हणजे कोणीही संशय घेत नसल्याने त्याचा नेमका गैरफायदा मला घेणे सहज शक्य होत होते पण त्या क्रिकेटर अरुणलाल याने नको तेवढा गोंधळ घातला, स्वर्गीय इंदिरा गांधी यांना फॉलो केले म्हणजे कुटुंब लहान तर सुख महान, निम्मे वयाच्या तरुणीशी लग्न केले, तो करून मोकळा झाला पण स्वातंत्र्य आम्ही हरवून बसलो, आता घरातून अचानक कोणत्याही क्षणी थेट व्हिडीओ कॉल येतो आणि आम्ही कुठे व कोणत्या अवस्थेत बारकाईने बघितल्या तपासल्या जाते, माय मरो पण अरुणलाल जगो हि म्हण बायकांमध्ये नव्याने आता प्रचलित झाली आहे. समोरचा चुकलेला असतो तेव्हा एखाद्याने त्याच्या तोंडात शेण घातले तर त्याला राग येतो जे अत्यंत चुकीचे आहे, अनेकदा लिखाणाच्या ओघात माझा एखादा संदर्भ चुकतो त्यावर अतिशय तिखट खोचक प्रतिक्रिया येतात त्या मी कधीही खोडून मोकळा होत नाही किंवा टीका करणार्या व्यक्तीच्या तोंडोतोंडी देखील येत नाही, उलट काढलेली चूक योग्य असेल तर ती सुधारतो. याआधीच्या भागात जेव्हा मी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड विषयी लिखाण केले त्यातले काही कसे चुकीच त्यावर कळव्यातल्या तेही साने आडनावाच्या थेट ब्राम्हणाने मला तासले, माझे मुद्दे चुकीचे कसे, नेमके सांगितले त्यांनी जे अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले त्यावर पुढले लिखाण…
जितेंद्र आव्हाड केवळ मुसलमानांचे असे चित्र उभे राहता काम नये, मुसलमानांनी त्यांना मतदान का केले त्यापेक्षा अधिकतर हिंदूंनी देखील त्यांना भरघोस मतदान केले कारण आव्हाड यांचा केवळ मुंब्रा हा मतदार संघ नसून तो मुंब्रा कळवा असा आहे आणि मुंब्र्यात देखील जवळपास वीस टक्के हिंदू मतदार आहेत ज्यांनी मनात आव्हाड विषयी अजिबात द्वेष राग न ठेवता त्यांना मतदान केले कारण जितेंद्र आव्हाड केवळ मुसलमानांचे नेते असे कोणतेही चित्र त्या मतदार संघात नसल्याने मुंब्र्यातले हिंदू आणि कळव्यातले बहुसंख्य हिंदू देखील त्यांनाच मागल्यावेळी मतदान करून मोकळे झाले आणि आव्हाड 80 हजारांच्या वर भरघोस मतांनी निवडून आले याचे कारण म्हणजे ते निवडून येण्याआधी आणि निवडून आल्यानंतर देखील हमखास कळवा मुंब्रा मतदारसंघातल्या नागरिकांना मतदारांना थेट व सहज भेटत भेटतात, खालची मान वर करून न बघता म्हणजे काम घेऊन आलेला पाटील कि जोशी कि अब्दुल हे न बघता त्याची नेमकी अडचण तेथल्या तेथे सोडवून मोकळे होतात, आव्हाड यांची राज्याचे नेते राष्ट्रवादीचे नेते किंवा मंत्री म्हणून आक्रमक नेते या नात्याने तिकडे मुंबईत नेमकी भूमिका कोणती हे कळवा मुंब्रा मधल्या मतदारांना त्यासी काहीही अजिबात देणे घेणे नसते, ते येतात, जात आणि धर्म न बघता काम करून देतात म्हणून जशी त्यांना मुंब्र्यातून 40-45 हजार मतांची आघाडी मिळाली तशी त्यांना बहुसंख्य हिंदू असलेल्या कळव्यातून देखील मोठी आघाडी मिळाली आणि आव्हाड 80 हजाराच्या मताधिक्याने त्यावेळी निवडून आले, आमदार झाले आणि विश्वासू व आक्रमक तसेच अभ्यासू असल्याने पवारांनी त्यांच्यावर अतिशय महत्वाच्या खात्यांची जबाबदारी टाकली, त्यांना पूर्णवेळ मंत्री केले…
पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या अतिशय प्रभावी मान्यवर नेत्यांसमोर टिकून राहायचे असेल तर विधान सभा गाजविणे आवश्यक आहे असे आव्हाडांना वारंवार वाटायला लागले, अन्यथा त्यांना देखील दिवंगत वसंत डावखरे कायमचे होणे अगदी सहज शक्य झाले असते म्हणजे कायम विधान परिषदेवर निवडून येऊन सत्तेत बसणे सहज शक्य होते पण आव्हाडांनी ते अजिबात केले नाही त्यांनी विरोधकांना टक्कर देण्याचे ठरविले आणि 2009 पासून कळवा मुंब्रा विधान सभा मतदार संघावर विविध अनेक सार्वजनिक कामांच्या माध्यमातून लक्ष घालण्यास सुरुवात केली, पूर्वीचा कळवा आणि मुंब्रा भकास होता विकास होत नसल्याने बदनाम होता जात्यंध ठरविल्या जात होता हि सारी वाईट बिरुदे जितेंद्र आव्हाडांनी मोठ्या खुबीने आणि मेहनतीने घालविली, स्वच्छता मोकळे व बांधलेले रस्ते विविध समस्यांवर आणि प्रश्नांवर त्यांनी कायमस्वरूपी तोडगे काढले, लोकांना निवासासाठी उपयुक्त परिसर असे चित्र उभे केले, आज कळवा आणि मुंब्रा मोस्ट डिमाण्डेड एरिया असे जे वाटते किंवा तीच वस्तुस्थिती आहे त्याचे श्रेय केवळ जितेंद्र आव्हाड यांना. म्हणून जातीच्या आधारावर जगणारा मतलबी नेता असे आव्हाडांकडे आज अजिबात बघितल्या जात नसल्याने इतर मुस्लिम वा हिंदू इच्छुक नेते मनातून अतिशय अस्वस्थ आहेत परेशान आहेत. आज निवासासाठी सेफ आणि योग्य मतदार संघ असे कळवा मुंब्र्याकडे हमखास आता बघितल्या जात असल्याने प्रत्यक्ष दिसण्यातला हिरो आता त्यांचा प्रत्यक्षातला हिरो ठरला आहे, मतदार संघातले, ठाणे जिल्ह्यातले आणि राज्यातले आव्हाडांचे अनेक ताकदवान विरोधक मनातून मनापासून कमालीचे खूप खूप अस्वस्थ आहेत…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी