देवेन्द्रजी आणि दादा नको इतरांचा फायदा…
जे जेव्हा इतर सारे करीत असतात त्यावेळी माझे वेगळेच प्रयोग करणे सुरु असते म्हणजे ज्या वयात माझे मित्र हनिमून साजरा करायला जायचे मी तेव्हा व्यवसायात आणि पैसे जमा करण्यात गुंतलो होतो आता तेच मित्र जेव्हा पैसे कमावण्यात गुंतले आहेत, केवळ तुम्हाला म्हणून सांगतो मी कोणत्याही क्षणी काश्मीरला जाईन म्हणतो हनिमून साजरा करायला, वाटल्यास तुम्हीही या आमची मौज व गम्मत दुरून बघायला. जेव्हा काही घटना ताज्या घडतात तेव्हा इतर मीडिया त्यावर तुटून पडते पण मी मात्र अशावेळी वेगळे विषय हाताळणे पसंत करीत आलो आहे. आज आता याक्षणी देखील मी तेच करणार आहे म्हणजे जे मीडिया लिहिते आहे त्यावर मी नंतर माझे मत व्यक्त करिन किंवा खूप आधीच नेमके मत व्यक्त करून मी मोकळा झालो असेल. पण एक मात्र तुम्हाला सांगायलाच हवे कि यादिवसात या राज्यात विरोधक आणि सत्ताधारी राजकीय पक्षात जे घनघोर युद्ध सुरु आहे त्या युद्धाचे आपण सार्या सामान्य मंडळींनी दर दिवशी टाळ्या वाजवून यासाठी स्वागत करायला हवे कि हे या राज्यात असे राजकीय युद्ध पेटले आहे कि ज्यामुळे राज्यातले जे गेल्या पन्नास वर्षातले अत्यंत हलकट वाईट भ्रष्ट अधिकाऱ्यांचे दलालांचे विविध अनेक नेत्यांचे घराणे जन्माला आले त्यातले बहुतांश सारे भरडल्या जाणार आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर दडवलेला काळा पैसा ह्यातून नक्की बाहेर येणार आहे उघड होणार आहे आणि हे जे घडतेय ते सर्वसामान्य जनतेला सुखावणारे असल्याने आपण त्याचे नक्की सार्वजनिक ठिकाणी येउन टाळ्या वाजवून स्वागत करायला हवे. जेव्हा एखाद्या युद्धात वाईट माणसे पळून जातात आणि साधी सरळ माणसे मारली किंवा भरडली जातात तेव्हा असे युद्ध नक्की नकोसे वाटते पण राज्यातल्या पेटलेल्या या राजकीय युद्धात जी अत्यंत वाईट माणसे आहेत त्यांचा काळा पैसा आणि भ्रष्ट व्यवहार बाहेर पडत असल्याने हे डाग मला आवडले आहेत असे राजकीय युद्ध मला सर्वांना आपल्याला कायम हवे आहे. अर्थात या दिवसात घनघोर पेटलेल्या या राजकीय युद्धातून जी नीच व वाईट माणसे व त्यांची कुटुंबे जी अनिल देशमुखांसारखी रस्त्यावर आलेली आहेत हे तर केवळ हिमनगाचे एक टोक आहे, वाईटाचा अख्खा हिमालय अद्याप नक्की खोदून काढणे बाकी आहे, उशीर लागेल पण हळूहळू साऱ्यांचे सारे काही नक्की बाहेर पडेल…
भाजपामध्ये या दिवसात त्यांच्या कप्तानावर म्हणजे एकमेव देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी आहे त्यातून ते जरी वरकरणी दाखवत नसले तरी मोठ्या तणावाखाली आहेत कारण त्यांनी थेट राज्यातल्या दोन महा धूर्त नेत्यांना म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अंगावर घेतले असल्याने त्यांच्या भाजपामध्ये जे फडणवीस यांच्या रांगेतले इतर नेते आहेत, प्रदशाध्यक्ष आहेत या मोठ्या नेत्यांनी अशावेळी पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होणार नाही त्याकडे काळजीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे असे व्हायला नको कि जे भाजपामध्ये बाहेरून आलेले संधीसाधू नेते आहेत त्यांचे तेवढे भयंकर लाड करायचे आणि ज्यांना कायम भाजपामध्ये राहून पक्षाची सेवा करायची आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अशांना अडगळीत टाकायचे. मित्रवर्य गिरीश महाजन तुम्हाला म्हणून सांगतो कि अमळनेरच्या मराठा समाजाच्या उत्साही व जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी लोकप्रिय नेत्या ललिता पाटील मला भेटून सांगत होत्या कि जळगावातल्या मराठा समाजाकडे जो भाजपाकडे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे, जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या आमच्या भाजपा नेत्यांचे दुर्दैवाने दुर्लक्ष होत असल्याने आम्ही मराठा समाजाचे अनेक मान्यवर मनातून अस्वस्थ आहोत विशेष म्हणजे आम्ही भाजपाचे लॉयलिस्ट आहोत इतर अनेक नेत्यांसारखे कुंपणावर बसून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारणारे नाही, शेवटी मी राज्यातल्या अनेक मराठ्यांची भाजपमधली अस्वस्थता थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आणि त्यांनी ललिता पाटील यांना भेटीसाठी अतिशय व्यस्त असूनही बोलावून घेतले, त्यांच्या मनातली अस्वस्थता नेमकी समजावून घेतली, तेथून बाहेर पडल्यावर ललिता मला एवढेच फोनवरून म्हणाल्या कि देवेन्द्रजी का बिग बॉस आहेत हे मला आज नेमके कळले. तोच प्रकार नासिकच्या आणखी एका धडपडणाऱ्या मराठा नेत्याचा, आमचे मित्र संजय गायकवाड यांचा, तेही त्यांच्याकडे जिल्ह्यातल्या बड्या भाजपा नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने असेच मनातून अस्वस्थ पण लॉयल्टी भाजपाशी, शेवटी संजय गायकवाड यांच्या मनातली तगमग मी थेट श्रीकांत भारतीय यांच्या कानावर घातली, भारतीय यांनी गायकवाड यांना तातडीने बोलावून तर घेतलेच पण रेटून सांगितले कि संजय मी नासिकला असलो कि अगदी माझ्या शेजारी येऊन उभा राहत जा, आणि पक्षाचे काम करतांना काही अडचण आली तर मला पक्ष कार्यालयात येऊन भेटत जा. दादा चंद्रकांत तुमच्या या पक्षात या राज्यात असे अनेक ललिता किंवा संजय आहेत ज्यांच्याकडे तुम्ही जातीने यापुढे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा भाजपाला देखील एक दिवस काँग्रेस सारखी मोठी किंमत मोजावी लागेल. पुढल्या भागात लातूरकर दलित गायकवाड कुटुंबाविषयी जे वाचून राज्यातले भाजपा नेते नक्की अस्वस्थ होतील आणि डोक्यावरले केस उपटून मोकळे होतील…
क्रमश: हेमंत जोशी