पवारांची खेळी आणि खेळीमेळी…
फार पूर्वी घनदाट जंगलाच्या मध्यभागी चित्रांग नावाच्या राजाची राजधानी होती. राजाची एकुलती एक अत्यंत लाडकी आणि देखणी राजकन्या मनाली वयात येताच राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले आणि हि बातमी राजधानी सभोवताली पसरलेल्या जंगलातल्या सिंहाच्या कानावर गेली तसे त्या सिंहाने राजाला गाठले आणि म्हणाला कि मला तुमच्या राजकन्येशी विवाह करायचा आहे, हे ऐकून राजा मनातल्या मनात घाबरला पण चतुर राजाने चेहऱ्यावर तसे न दाखवता तो सिंहाला म्हणाला, का नाही, जंगलाच्या पराक्रमी राजाला मी अत्यंत आनंदाने राजकन्या देईल पण माझ्या काही अटी तुम्हाला त्याआधी मान्य कराव्या लागतील, राजकन्या मिळतेय म्हटल्यावर सिंहाने राजाच्या सार्या अटी मान्य करण्याचे जसे ठरविले तसे राजा म्हणाला कि माझ्या अटी फारशा अवघड नाहीत फक्त नाजूक राजकन्येला पुढे कोणतीही शारीरिक इजा पोहचू नये म्हणून तुम्हाला काही बदल तुमच्या शरीरात करून घ्यावे लागतील. सिंह आनंदाने तयार होताच राजा म्हणाला, आधी तुमच्या पायाची नखे तेवढी कापून घ्या, सिंहाने ते लगेच केले. नंतर राजा म्हणाला तुमची ती दाढी माझ्या कन्येला रुतायला नको, सिंह लगेच न्हाव्याकडे जाऊन दाढी मिशी कापून आला. आणि त्या विषारी दातांचे काय असे राजाने विचारताच सिंह डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्याकडे जाऊन दात उपटून कवळी बसवून आला थोडक्यात राजा जे सांगेल ते सिंह आनंदाने करीत राहिला. आता शेवटची विनंती राजा म्हणाला आणि त्याने सिंहाला डॉ. राजेंद्र शिंगणे कडे जाऊन नसबंदी करून ये, सांगताच सिंह जेव्हा शिंगणे यांच्याकडे गेला सुरुवातीला डॉ शिंगणे पण सिंहाने चड्डी काढल्यानंतर नक्की का घाबरले असतील, एव्हाना ते तुमच्या लक्षात आलेच असेल पण तरीही डोळे घट्ट मिटून शिंगणे यांनी डॉ राजेश टोपे यांना मदतीला बोलवून नसबंदी करून दिली, शेवटी हा दुबळा सिंह जेव्हा राजासमोर येऊन उभा राहिला, राजाने त्याला दोन थोबाडात ठेवत पुन्हा न येण्याचे सांगून जंगलात पिटाळून लावले…
शरद पवार आणि राजा चित्रांग यांच्यात कवडीचाही फरक नाही, पवारांसमोर जो कोणी आजतागायत सिंह होण्याचा प्रयत्न केला पवारांनी या साऱ्यांची, अनेकांची लग्नाला उतावीळ झालेल्या सिंहासारखी अवस्था करून ठेवली, उदाहरणे एवढी आहेत कि यादी वाचता वाचता तुम्हाला बेशुद्ध पडायला होईल. अगदी लेटेस्ट उदाहरण नवाब मलिक यांचे, विशेष म्हणजे पवार जेव्हा एखाद्याचा बावळट सिंह करून ठेवतात तेव्हा ते एका दगडात अनेक पक्षी मारून ठेवतात जे इतरांच्या अजिबात लक्षात येत नाही अगदी उद्धव यांच्या देखील जेव्हा ते अगदी सुरुवातीलाच सिंह झाले, या अत्यंत चतुर व धूर्त मुख्यमंत्र्यांच्या ते अजिबात लक्षात आले नाही, उद्धव यांच्यासमोर अजितदादा म्हणजे अमिताभ समोर विजयेंद्र घाडगे त्यामुळे दादा यांना स्वतःला अगदी आजही कळलेले नाही कि काकांनी त्यांना कसे काखेत दाबून गावभर फिरवून आणलेलं आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत अलीकडे पवारांनी घेतलेले निर्णय म्हणजे म्हणाल तर नवाब मलिक यांचा मोठ्या खुबीने त्यांनी कथेतला बावळट सिंह करून ठेवला पण त्याचवेळी शरद पवारांनी दुसरा दगड विरोधकांवर देखील भिरकावून त्यांना जखमी करून ठेवले आहे म्हणजे एकीकडे त्यांनी नवाब यांना जेव्हा लुळे पांगळे करून ठेवले त्याचवेळी मुद्दाम नवाब यांचा राजीनामा न घेता, मी तुम्हाला फाट्यावर मारतो, हेच जणू विशेषतः भाजपाला वाकुल्या दाखवत चारचौघात चिडवून सांगितले. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे यापुढे जे नेमके शरद पवार यांना हवे आहे ते भाजपाने अजिबात आपणहून करू नये, पवारांना आता या राज्यात राष्ट्रपती राजवट हवी आहे जिचे खापर त्यांना भाजपावर फोडून पुन्हा पुढल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या मतदारांची मागल्या पावसात भिजणार्या खेळीची पुनरावृत्ती करून सिम्पथी मिळवायची आहे, म्हणून राष्ट्रपती राजवट आणल्याचे खापर आपल्यावर फुटणार नाही याची मोठी खबरदारी यापुढे राज्यातल्या भाजपा नेत्यांना घ्यायची आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी