नागेश आणि निशा : छाब्रिया कुटुंब
माझी मीन रास असल्याने मी कायम द्विधा मनस्थितीत असतो, हे कि, ते ते कि हे या गोंधळात माझे आयुष्य येथवर संपले आहे विशेष म्हणजे मी हि अशी केवळ सत्य सांगणारी सतत अनेकांना कित्येकांना अंगावर घेणारी, अनेक वाईटांना अंगावर घेणारी पत्रकारिता करावी कि आटोपती घ्यावी या गोंधळात मी सतत असतो आणि विचारांचे काहूर कायम डोक्यात ठेवून शेवटी प्रत्येक सकाळी लिखाण करतांना तेच करतो जे पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून करत आलो आहे. मी जे पत्रकारितेत केले करतो आहे ते तुम्ही मात्र जर मीडियात असाल तर अजिबात करू नका कारण ते आमच्या मीडियातले सर्वाधिक कठीण असे व्रत जे मी अंगिकारले आहे. अनेक माणसे तोंडात पाण्याचा थेम्ब देखील न घेता कित्येक दिवस उपवास करतात त्यापेक्षा देखील मी खूप स्वीकारलेले पत्रकारितेचे व्रत कठीण आहे असते ज्याची गोड फळे कमी मिळाली पण चटके अधिक बसले. येथे देखील मी दोन भिन्न कुटुंबे जी जवळून बघितली त्यावर नेमके लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. मी ज्या इमारतीतमध्ये सध्या राहतो जेथून लवकरच शिफ्ट होणार आहे तेथे माझ्या शेजारच्या विंग मध्ये नागेश छाब्रिया निशा छाब्रिया हे दाम्पत्य दोन मुलांसहित राहते पैकी त्यांच्या मुलीचे लग्न अलीकडे झाले असल्याने आता ती नवर्याकडे असते. महत्वाचे म्हणजे नागेश छाब्रिया हे हिंदुजा बंधूंचे सख्खे भाचे आहेत आणि याच नागेश यांनी विक्रांतला पत्रकारितेत आणले आहे, विशेष म्हणजे निशा या देखील श्रीमंत व्यापारी कुटुंबातून आलेल्या, खूप मोठ्या मनाने नागेश छाब्रिया यांनी विक्रांतला मुंबई 24 तास हि बातम्या देणारी वाहिनी सुरु करवून दिली होती त्याकाळात हि वाहिनी खूप गाजली होती पण वाहिनी चालविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लांड्यालबाड्या आणि प्रचंड दगदग, काळ्या पैशांसाठी हा जीवघेणा खेळ नको म्हणून मुंबई 24 तास पुढे आम्ही बंद केली पण आमच्या मधुर संबंधात कोणतीही कुठेही कटुता त्यातून आली नाही येऊ दिली नाही. एकप्रकारे विक्रांतला छाब्रिया यांनी मीडिया क्षेत्रात आणले मी नाही, आजही आमच्या आणखी एका व्यवसायाचे सोशल मीडियावर केल्या जाणारे प्रमोशन छाब्रिया दाम्पत्याची मुलगी करते बघते. छाब्रिया यांचे मुंबईसह देशभरात कार्यालये असले तरी हे कुटुंब तसे कर्नाटकातल्या बेळगावचे राहणारे विशेष म्हणजे कर्नाटक बेळगावातल्या पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत नागेश निशा असले तरी या कुटुंबाला अजिबात गर्व नाही, अगदी अलीकडे मी कलावती आई या माझ्या गुरूंचे प्रमुख स्थान असलेल्या बेळगावला गेलो असतांना अर्थात दोन दिवस सतत छाब्रिया कुटुंबाने आमची जी बडदास्त ठेवली, माणसे मोठी झाली असली तरी किती जमिनीवर असतात तो प्रत्यय आम्हाला तेथेही आला. नागेश आणि निशा यांच्या मुलाचे नाव सुमुख आणि मुलगी रिद्धी, जिच्या नावाने छाब्रिया यांचे बेळगावात रिद्धिज किचन म्हणून मोठे रेस्टोरंट आहे विशेष म्हणजे तेथे दारू आणि मांसाहारी फूड मिळत नसतांना देखील ते प्रचंड चालते आणि हो, छाब्रिया हे सिंधी कुटुंब सहज शक्य असून देखील मद्याला स्पर्श करीत नाही आणि ते सारे शाकाहारी आहेत. असे अनेक आगळे वेगळे ओळखीची कुटुंबे जेव्हा मी जगभरात जवळून बघतो, त्यांचे आपणही अनुकरण करावे मनाला सतत वाटत राहते तसा प्रयत्न देखील करतो…
दुसरे आणखी एक कुटुंब काहीसे दुरून दुरुन माझ्या ओळखीचे त्यातले कुटुंब प्रमुख एकेकाळी राज्याच्या शासकीय नोकरीत राज्याचे अमुक एका विभागाचे बॉस होते आणि श्रीकांत जिचकार पद्धतीने त्यांनी अनेक पदव्या देखील मिळविल्या होत्या. जे करायला टाळा मी तुम्हाला सांगतो, तेच त्यांनी केले, सरकारी नोकरीत असतांना अफाट अमाप काळी संपत्ती जमा केली. पुन्हा तेच कि वाईट कामांचा वक्त चांगला असतो अंत नक्की दुर्दैवी असतो. त्यांचा मुलगा खूप शिकला मोठ्या हुद्दयावर तोही नोकरीला लागला त्याला देखणी आणि उच्च शिक्षित पत्नी मिळाली पण या दाम्पत्याला मुलबाळ न झाल्याने शेवटी नैराश्येपोटी पत्नी दिल्लीजवळच्या कुठल्याशा आश्रमात कायम राहायला निघून गेली आणि मुलगा आता एकटा मुंबईत असतो, आजही पैसा प्रचंड आहे पण या दाम्पत्यानंतर त्या संपत्तीचा उपभोग घ्यायला कुटुंबात एकही सदस्य नाही नसेल. सत्ता हाती आलेले असणारे अनेक बहुतेक हे असा अमाप समाप पैसा मिळवितात तेव्हा त्यांना एक प्रकारचा असुरी आनंद नक्की मिळतो पण या काळ्या संपत्तीसंगे कोणते वाईट ताट आपण वाढून आणलेले आहे हे अशांना अजिबात कळत नसते. कमी पडू नये म्हणून थोडेफार वाममार्गाने मिळविणे मला वाटते फारसे गैर नाही पण इतरांच्या गरिबांच्या तोंडचा घास काढून स्वतःचे घर भरणारे अशांचा तेच, केवळ वक्त चांगला आहे अंत नक्की वाईट आहे, कुठे किती खायचे आणि कुठे कसे थांबायचे हे ठरविता यायलाच हवे असे मला वाटते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी