मीडिया किती बढिया कशी घटिया..
-हेमंत जोशी
आमच्याकडे देखणी आणि चुणचुणीत राधा नावाची स्वयंपाकीण होती ती अत्यंत चतुर आहे हे मी अगदीच सुरुवातीला ओळखले असल्याने घरातल्यांना आधीच तिच्यापासून सावध राहण्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि सुंदर असली म्हणून काय झाले मला देखील संयम पाळता येतो. ती उत्तम स्वयंपाक करीत असल्याने आम्ही तिला कधीही काढले नाही पण कोरोना महामारीत तिला नोकरी सोडविच लागली. अलीकडे मला ती भेटायला आलेली, तिला तिच्या नवऱ्यापासून तीन मुली आणि एक मुलगा म्हणजे आम्ही कायम तिचे पोट फ़ुगलेलेच बघितलेले, दर दिड वर्षाआड एक बाळंतपण. पण पुढे जाण्याची धडपड त्यासाठी वाट्टेल ते हे तिच्या बोलण्यातून देहबोलीतून कायम जाणवायचे. कसलेसे काम घेऊन आली होती मी ते करायचे टाळले, तिच्या लक्षात यावे कि मी तिला टाळतो. गप्पांच्या ओघात ती म्हणाली, भाऊ, नवरा गेला चारही मुलांना घेऊन कायमस्वरूपी गावाकडे कारण मी त्याला फारकत दिली आणि सरकारी कार्यालयात दलाली करणाऱ्याशी दुसरे लग्न केले, तुमच्या आता लक्षात आलेच असेल ती नेमकी कशी ? तिने मला कसलेसे मीरा रोड येथल्या कुठल्याशा घटिया मीडियाचे ओळख पत्र दाखविले आणि म्हणाली भाऊ मी पण आता तुमच्यासारखी पत्रकार झाली मी कपाळावर हात मारून घेतला. आणि मंत्रालयातले सरकारी कार्यालयात फिरणारे स्वतःला पत्रकार सांगून मिरविणारे असे कितीतरी बदमाश सडकछाप मीडियावाले क्षणार्धात थेट माझ्या नजरेसमोरून गेले. आम्ही पण पत्रकार असे मला भेटणारे जेव्हा असले टिनपाट ओळखपत्र काढून दाखवतात, तळपायाची आग मस्तकात पोहोचते कारण शासकीय ओळखपत्र मिळविणे आजही बऱ्यापैकी कठीण असे काम आहे, माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या अनेक परीक्षांतून आणि निरीक्षणातून पास होत तुम्हाला ते मिळत असते जे दरवर्षी पुरावे दाखल करूनच रिन्यू केल्या जाते. अर्थात अनेकांना सरकारी ओळखपत्र मिळत नाही पण त्यांनी आपल्या लिखाणातून किंवा कार्यातून सिद्ध केलेले असते कि ते अस्सल मीडियावाले आहेत केवळ एखाद्या बदमाश वाहिनी किंवा पीत पत्रकारिता करणाऱ्या काही वृत्तपत्राचे ओळखपत्र मिळवून माणूस पत्रकार होत नसतो त्यातून फारतर अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळता येतात…
राधा म्हणाली कि तिला तेथे पगार मिळणार नाही वरून महिन्याला ती जी कामे व कमाई करून आणेल त्यातला अर्धा हिस्सा त्या मालकाला द्यावा लागणार आहे आणि हेच सतत सगळीकडे सऱ्हास सुरु असते त्यातूनच चांगली मीडिया जी फार थोडी उरली आहे खूप बदनाम होते एवढेच कशाला असे अनेक राधा थेट मंत्रालयात पण आहेत ज्यांचे कितीतरी पुरावे माझ्याकडे आहेत. वास्तविक उत्तम लिखाण करण्याची हातोटी साधायला सुरुवातीला कित्येक वर्षे त्यासाठी खर्च करावे लागतात अगदी मला सुद्धा पत्रकारितेत आल्यानंतर सुरुवातीची पंधरा वर्षे जेमतेम लिखाण जमायचे कदाचित उदय तानपाठक त्यावर म्हणेल कि त्याला आता लिखाण करता येते असे का वाटते? मीडियामध्ये काम करणे म्हणजे एखाद्या गायकासारखी साधना करणे जी खूप वर्षे केल्यानंतर साध्य होते किंबहुना असे कितीतरी अडाणी मीडियातले मी बघतो जे निवृत्त होईपर्यंत आमच्या क्षेत्रातले बोलण्यात किंवा लिखाणात अजिबात तरबेज नसतात केवळ धंदेवाईक असल्याने काळा पैसा मिळवून मोकळे होत असतात. एखाद्या मीडियाकडून ओळखपत्र मिळवायचे आणि दुसरे दिवशीपासूनच स्वतःला पत्रकार म्हणून मिळवायचे रांडा आणि असले पत्रकार यात कोणताही कुठलाही फरक नसतो. मालकांना जाहिराती मिळवून द्यायच्या पैसे मिळवून द्यायचे सरकारी दलाली त्यांच्यासाठी करायची त्यातून अस्सल पत्रकार कधीही घडत नसतो. जर सतत माझा पत्रकार मुलगा विक्रांत पत्रकारितेच्या पाठी राहतांना दिसला नाही तर मी आजही त्याला थेट उभा आडवा घेतो आणि हेही सांगतो कि सत्य तेवढेच लिहायचे बोलायचे मला त्यात एकदाही कधीही खोटारडेपणा दिसता कामा नये किंवा माझा दुसरा मुलगा विनीत ज्या व्यवसायात आहे त्याला देखील त्याच सूचना, चोवीस तास तुमच्या नजरेसमोर तुम्ही निवडलेले क्षेत्रच असायला हवे, हयगय दुर्लक्ष मी खपवून घेणार नाही आणि यशापयशाची कधीही चिंता काळजी पर्वा करून थांबायचे नाही घाबरायचे नाही थकायचे नाही….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी