सूर्याचा अकाली अस्त…
-हेमंत जोशी
सत्ता आली, एखाद्याकडे अधिकार आले कि संधीसाधू त्यांना जाऊन लगेच गुळासारखे चिकटतात माझे वेगळे आहे सत्तेत नसतांना किंवा अधिकार नसतांना माझी अनेकांशी मैत्री असते आणि असे अनेक आहेत जे सत्तेत आले किंवा ज्यांच्याकडे मोठे अधिकार चालून आले कि अशांच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात म्हणून मी दूर उभा राहतो किंवा अनेकांना ते सत्तेत असतांना मी भेटत देखील नाही. गुरुवारी 17 फेब्रुवारीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ जोशी यांनी प्राण सोडले असले तरी 20-22 वर्षांपासून म्हणजे त्यांचा कार अपघात झाल्यापासून त्यातून काही असाध्य आजार बळावल्यापासुनच ते आम्हा सर्वांपासून दूर होते दादरला घरीच असायचे म्हणून मी म्हणालो कि सूर्याचा असा केव्हाच अकाली अस्त झालेला होता. शिवसेनेच्या तीन शाखांमध्ये मी अनेकदा गेलेलो आहे म्हणजे दादरला मनोहर जोशी सरांना भेटायला, ठाण्यात आनंद दिघे यांच्याकडे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे सुधीर जोशी यांच्या शिवाजी पार्क राजा बढे चौकातील टायकल वाडीतल्या शाखेत. अरे ! पण हा तर एकेकाळी माझ्याही ऑफिसचा पत्ता होता आणि तेच तर तुम्हाला सांगायचे आहे. पण जरा थांबा एवढ्यात मला ते पूर्वीचे दिवस आठवले, सुरुवातीचे मुंबईतले दिवस आठवले आणि सुधीरभाऊ संगतीच्या आठवणी मनात दाटून आल्याने जरा रडू कोसळले आहे….
मी कायमस्वरूपी पत्रकारिता करण्यासाठी 1987 मध्ये मुंबईत आलो त्यानंतर लगेच 1988 मध्ये मला माझ्या मालकीची वर्सोव्यात धुळ्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील आणि शंकरराव चव्हाण यांनी सदनिका मिळवून दिली आणि 1990 मध्ये मला सुधाकरराव नाईक यांनी माझ्या हक्काचे माझ्या मालकीचे पहिले ऑफिस पारेख महाल टायकल वाडीसमोर राजा बढे चौकया इमारतीत मोठ्या मनाने किंवा केवळ आत्यंतिक प्रेमापोटी विकत घेऊन दिले आणि मी तेव्हापासून पुन्हा आजतागायत परमेश्वर कृपेने कधीही मागे वळून बघितले नाही. आयुष्यात माणसे चांगली भेटली कि आपोआप कल्याण होते जे माझेबाबतीत अनेकदा होते आणि झाले. या माझ्या ऑफिसच्या दरवाजासमोर विरुद्ध दिशेला सुधीरभाऊ यांची शाखा होती जेथे ते अतीशय नियमित यायचे आणि कित्येक तास बसून लोकांच्या अनेकांच्या अडचणी सोडवायचे त्यावेळी तेथे त्यांचे उजवे आणि डावे हात होते दिवाकर बोरकर व अजित पंडित त्यापैकी अजित पंडित कायम नगरसेवक म्हणून निवडून यायचे आणि दिवाकर बोरकर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेना भवनाचे प्रमुख होते. साक्षात देवमाणसाचे सुधीरभाऊ यांचे कार्यालय माझ्या ऑफिस समोर त्यामुळे गप्पांच्या, खाण्यापिण्याच्या अनेक मैफिली या तिघांसोबत मला झोडता आल्या. माझ्याच इमारतीत गुप्तहेर रजनी पंडित राहायची आणि पारेख महाल शेजारी विशेष म्हणजे काही काळ तिघा जिवलग मित्रांनीं म्हणजे बाल मोहनचे गुरु रेगे, मिलिंद चिटणीस आणि राज ठाकरे या तिघांनी एक रेस्टोरंट सुरु केले होते जेथे मी अनेकदा जेवायला जात असे, मोठ्या व्यापातून त्या तिघांनाही ते पुढे चालविता आले नाही पण उत्तम फूड तेथे मिळायचे…
एखादा नेता किती सालस सुसंस्कृत सरळमार्गी सोजवळ असू शकतो हे ज्वलंत उदाहरण मी काही काळ सतत दररोज सुधीरभाऊ यांच्या रूपाने बघितलेले आहे म्हणून त्यांच्या आठवणी दाटल्या आणि रडू कोसळले. पुढे मी माझे कार्यालय काकड इस्टेटच्या मोठ्या जागेत नेले आणि लगेचच सुधीरभाऊ जोशी देखील मंत्री झाले त्यामुळे त्यांच्या सतत मंत्रालयात भेटी व्हायला लागल्या. तेथेही भेटी व्हायच्या गप्पा व्हायच्या पण भाऊ मंत्री असतांना एखादे काम घेऊन मी गेलो नाही ज्याचे त्यांना मोठे आश्चर्य वाटायचे ते तसे कौतुकाने बोलून देखील दाखवायचे. एकदा फक्त मला अमरीश पटेलांनी त्यांच्या ओळखीच्या एका नंदुरबारच्या कार्यकर्त्याच्या शाळेची परवानगी आणून देण्याची विनंती केली आणि सुधीरभाऊ यांनी मला कधीही फेऱ्या मारू न देण्याची वेळ आणली नाही एका झटक्यात शाळा मंजूर करून दिली…एक दिवस गप्पांच्या ओघात मी सुधीरभाऊंना मला ऑफिस बॉय पाहिजे असे सांगितले. भाऊंनी एक होतकरू शिवसैनिकाला माझ्याकडे पाठवले. दुसऱ्या दिवशीपासून तो माझ्याकडे काम करू लागला. एक दिवस त्याला घेऊन मला मंत्रालयात जायचे होते. रस्त्यात नेहमी प्रमाणे सेनाभवनाच्या मागे असलेल्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून पुढे जायचे होते. पण तो म्हणाला कि मी जेवून येतो आणि नंतर आपण निघूया. मी काहीसे नाराजीने त्याला हो म्हणालो; तो जेवाल्याला गेला त्या १५ मिनिटांत तिकडे त्याच पेट्रोल पंपवर बॉम्बस्फोट झाला; केवळ तो जेवायला गेल्यामुळे त्या दिवशी आमचे प्राण वाचले…
अनेक नेते हे असे जगावेगळे असतात ज्यांच्या कार्याला तोड नसते. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून सुधीरभाऊ यांनी कधीही बोंबा मारल्या नाहीत जसे मंत्रिपद मिळाले नाही म्हणून दिवाकर रावते कधी रुसल्याचे ऐकले नाही, या अशा मंडळींचा कधीही रामदास कदम किंवा एकनाथ खडसे झाला नाही. सुधीरभाऊ काल पर्वा गेले पण ते सक्रिय राजकारणातून समाजकारणातून शिवसेनेतून केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे केव्हाच म्हणजे कित्येक वर्षे आधी बऱ्यापैकी बाजूला झाले होते, अन्यथा ते नक्की आणखी आणखी खूप खूप मोठे झाले असते पण दुर्दैव त्यांच्या आड आले, त्यांच्याबाबतीत हे वाईट घडले. भाऊ गेले आता उरल्या त्या केवळ आठवणी आणि आपण त्यांना याक्षणी श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आणखी काय करू शकतो ?
तूर्त एवढेच : हेमंत जोशी