राजकीय टोळीयुद्ध / टोळीयुद्धाचे परिणाम…
-हेमंत जोशी
पती पत्नी मधला एकमेकांविषयी संशय आणि जीवघेण्या स्पर्धेतून कोणत्याही क्षेत्रात वाढीस लागलेले टोळी युद्ध झपाट्याने वाढणाऱ्या वृक्षासारखे असते आणि जे झाड झपाट्याने वाढते ते उन्मळून देखील लवकरच पडते. 1987 दरम्यान जळ्गावचे जी तू महाजन राज्याचे गृहराज्य मंत्री होते. एकदिवस त्यांच्या केबिन मध्ये सहजच गेलो आणि त्यांनी माझी एका व्यक्तीशी ओळख करून दिली त्यावेळी मुंबईत मी नुकताच स्थिरावत होतो. महाजन यांच्यासमोर दोघे बसले होते, महाजन म्हणाले हे पत्रकार दीपक शाह आहेत आणि हे अरविंद ढोलकीया, यांचे लिंकिंग रोडवर सीझर पॅलेस नावाचे हॉटेल आहे आणि हा माझा पी ए शांताराम भोई याला तर तू ओळखतॊस. मी बाहेर येऊन जी तू महाजनांच्या खाजगी सचिवांशी गप्पा मारत बसलो तेवढ्यात मीटिंग आटोपून अरविंद ढोलकीया आणि दीपक शाह तेथे आले जातांना अरविंद मला त्यांचे व्हिजिटिंग कार्ड देऊन गेले आणि सीझर पॅलेसला या एकदा, आमंत्रण देऊन गेले. एक दिवस मी लिंकिंग रोड च्या सीझर पॅलेस मध्ये गेलो तर ते हॉटेल मोठा महागडा डान्सबार निघाला स्वतः अरविंदने मला दाखवला आणि त्याने मला त्या बारमध्ये बसवून तो वरच्या चौथ्या माळ्यावर निघून गेला पण पाठोपाठ मी पण त्याच्याकडे परतलो. तो म्हणला अनेक पत्रकारांना येथे फुकटात एन्जॉय करायला आवडते आणि तुम्ही तर लगेच परतलात त्यावर मी त्याला एवढेच म्हणालो कि रांडांसंगे एन्जॉय करण्याएवढे माझ्यावर वाईट दिवस आलेले नाही किंवा मला हि अशी पत्रकारिता देखील करायची नाही त्याला माझे हे स्पष्ट बोलणे आवडले आणि आमची शुद्ध मैत्री झाली एवढी कि अरविंद मला त्याच्या घरी देखील घेऊन जात असे आणि माझ्या लक्षात आले कि अरविंद मुंबईतला मोठा गॅंगस्टर देखील आहे, त्यादरम्यान टोळीयुद्धाचा मोठा भडका उडालेला होता मला क्राईम क्षेत्रात पत्रकारिता अजिबात करायची नव्हती पण अरविंदला मी एक दिवस म्हणालो यातून प्लिज बाहेर पडा अन्यथा तुमचा देखील जीव जाईल पुढे तेच घडले ढोलकीया कुटुंबातले तिघे चौघे टोळी युद्धात मारल्या गेले हळूहळू मुंबईतले हे गँगस्टर टोळीयुद्धातून एकतर दीर्घकाळ तुरुंगात गेले किंवा देशाबाहेर पळाले किंवा मारल्या गेले. विशेष म्हणजे वादग्रस्त नाममात्र पत्रकार दीपक शाह देखील सांगली जवळ एका कार अपघातात आपला जीव गमावून बसला….
सुरवातीला जेव्हा मी राजकीय पत्रकारिता केली तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात ना बढती बदल्यांसाठी स्पर्धा होती ना जातीय तणाव होता ना आज सारखा भ्रष्टाचार बोकळललेला होता पण विजयसिंह मोहिते पाटील या बांधकाम खात्याच्या मंत्र्याकडे एक अतिशय जातीयवादी आणि भ्रष्ट व बेरकी खाजगी सचिव म्हणून रुजू झाला आणि तेव्हापासून राज्यातले सार्वजनिक बांधकाम खाते झपाट्याने बिघडले कारण तेथे भ्रष्टाचार आणि जातीयवाद बोकाळला, त्या दरम्यान तांबे आणि देशपांडे आडनावाचे अतिशय आदर्श देशभक्त आणि खात्यावर जीवापाड प्रेम करणारे हे दोघे बांधकाम खात्याचे सचिव होते, मी देशपांडे आणि तांबे जे दोघे आजही अतिशय सुखासमाधानाने निवृत्तीचे यशस्वी जीवन जगताहेत बांधकाम खात्यातल्या प्रत्येक अभियंत्याला पोटतिडकीने सांगत असू कि कामाचा दर्जा घालवून असे काळे पैसे घरी नेऊ नका तुमच्यात असे पैसे मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण होईल ज्यातून पैसे मिळतील पण समाधानी आयुष्य तुम्ही घालवून बसणार आहात, फारसे कोणीही ऐकले नाही त्यातून या खात्यात आजतागायत प्रचंड जातीयवाद आणि भ्रष्टाचार बोकाळला प्रचंड पैसा भलेही कंत्राटदार आणि अभियंत्यांकडे आला पण त्यांच्या या जीवघेण्या स्पर्धेतून या खात्यात एकप्रकारे टोळीयुद्ध सुरु झाले आणि खुद्द भुजबळ काका पुतणे म्हणजे याच खात्याचे मंत्री छगनराव आणि समीर भडकलेल्या टोळीयुद्धातून त्यांनी जवळ केलेल्या कंत्राटदारामुळेच तुरुंगात गेले, आणखी काही तुरुंगाची हवा खाऊन आले किंवा गंभीर चौकशांना सामोरे गेले सामोरे जाताहेत त्यातल्या काहींकडे अगदी अलीकडे आयकर खात्याने धाड घालून मोठी मालमत्ता आणि काळी संपत्ती जप्त केली पण हे आजही थांबलेले नाही याचे मोठे वाईट वाटते, कित्येक बुद्धिमान अभियंते या जीवघेण्या टोळी युद्धात अडकले आहेत…..
15 फेब्रुवारीला संजय राऊत यांनी गाजावाजा करीत पत्रकार परिषद घेतली खरी पण त्या पत्रकार परिषदेचा आज जरी तुम्हा सर्वांना फज्जा उडालेला दिसला तरी राज्यात पेटलेले हे राजकीय टोळीयुद्ध वाट्यावरून पेटलेले असल्याने 15 तारखेची राऊत यांची पत्रकार परिषद व त्यांचे दुष्परिणाम नक्की संपलेले नाही नक्की पुढल्या काही दिवसात राऊत भाजपा नेत्यांच्या आर्थिक भानगडी काढून मोकळे होतील ज्यातून त्यांना जे वाटते तसे फारसे काही कदाचित साध्य देखील होणार नाही आणि त्यानंतर किंवा कालपासून भाजपा नेते देखील स्वस्थ बसणार नाहीत बसलेले नाहीत ते देखील महाआघाडीच्या अनेक नेत्यांना एकशे एक टक्के देशोधडीला लावतील आणि हे सुडाने व स्वार्थाने पेटलेले राजकीय टोळीयुद्ध आपल्या या राज्याला राज्यातील जनतेला आणि नेत्यांना आपापसात उध्वस्त करून मोकळे होईल कारण टोळीयुद्धातून उडालेला भडका साऱ्यांची शंभर टक्के राखरांगोळी करून मोकळा होत असतो. तिकडे उद्धवजी पुन्हा पूर्वीसारखे म्हणजे ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी ज्या उत्साहात कामें करून मोकळे व्हायचे अनेकांना दररोज भेटायचे, ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे हे सारे संपले एवढे का भाजपाचे किंवा हिंदूंचे त्यांना शाप लागले, पण आता अगदी लवकरात लवकर शिवसेनेत आणि सत्तेत त्यांची जागा आदित्य ठाकरे घेऊन मोकळे होतील स्वतः उद्धव आदित्य यांनाच आपला उत्तराधिकारी नेमून नक्की मोकळे होतील, अशी हि दयनीय शोचनीय कठीण राजकीय परिसस्थिती वरून पेटलेले नेत्यांचे आपापसातले टोळीयुद्ध, जाणकार जे म्हणताहेत तेच सत्य असे कि हे राज्य आता कित्येक वर्षे मागे पडले आहे आणि शिवसेना व भाजपा हि हिंदूंची युती एकत्र नसल्याने पाक विचारांचे बहुसंख्य टगे प्रभावी ठरताहेत प्रभावी ठरले आहेत, जे मी अरविंद ढोलकीया किंवा बांधकाम खात्यातील समस्त अभियंत्यांना अगदी हात जोडून टोळीयुद्धातून बाहेर पडायला सांगत होतो त्यांनी ऐकले नाही मग त्याठिकाणी काय घडले हे जसे तुमच्या आमच्या नजरेसमोर आहे, मित्रांनो नेत्यांच्या या टोळीयुद्धातून प्रत्येक टोळीशी संबंधित नेते मंत्री दलाल अधिकारी मीडिया एक ना एक दिवस आयुष्यातून उठणार आहेत किंवा स्वतः परमेश्वर या अशा मंडळींना अशी काही अद्दल घडवितो कि त्यानंतर या बदमाशांचे सारे काही संपलेले असते, जे टोळीयुद्धाशी संबंधित पण चांगल्या विचारांचे त्यांचा पांडव होईल म्हणजे पेटलेले टोळीयुद्ध शांत होताच एक दिवस कधीतरी त्यांना परमेश्वर यातून सहीसलामत नक्की बाहेर काढेल…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी