माझी तुझी रेशीमगाठ…
टुक्कार मराठी मालिका बघणे हे सेक्स करण्यासारखे अतिशय कठीण असे काम म्हणजे सेक्स आधी आई व वडिलांपासून लपून करावा लागतो त्यानंतर मुलांपासून आणि सरतेशेवटी नवऱ्याला बायकोपासून किंवा बायकोला तिच्या नवऱ्यापासून, अर्थात सेक्स पेक्षा खरेच काही जिकरीचे डोके दुखीचे काम असेल तर कंटाळवाण्या मराठी मालिका बघणे. अलीकडे मला कोरोना काळात बराचसा रिकामा वेळ घरात घालवितांना काही मराठी मालिका मी अगदी सहज किंवा मुद्दाम देखील बघितल्या जे इतक्या वर्षात जमले नव्हते. मनाशी विचार केला बघूया तर खरे कि या मालिका नेमक्या असतात तरी काय किंवा कशा आणि या अशा बहुतेक मालिकांचे काही भाग बघितल्यानंतर मला राग मालिका बनविणाऱ्यांचा नाही तर बघणार्यांचा अगदी मनापासून आला कि किती हि दर्जाहीन अभिरुची तेही आमच्यातल्या मराठी दर्शकांची, किंव आली किंवा मनापासून किंव करावीशी वाटली अशा बहुसंख्य टुक्कार मालिका बघणाऱ्यांची. संकर्षण कऱ्हाडे सारखा दर्जेदार अभ्यासू अभिनेता, माझी तुझी रेशीमगाठ, हि मालिका लिहितोय वरून तो त्यात अभिनय देखील करतोय याशिवाय हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतला यशस्वी अभिनेता श्रेयस तळपदे देखील या मालिकेत अभिनय करतोय म्हणून माझी तुझी रेशीमगाठ बघण्याचा मोह मला आवरता आला नाही. विशेषतः हि मालिका लिहीणार्या संकर्षण कऱ्हाडे यास मला मुद्दामहून असे सांगायचे आहे कि जर तुला नेमकी श्रीमंत माणसे कशी असतात हे माहित नसेल तर ती माहिती एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून समजावून घ्यायला हवी होती. अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यात श्रेयस तळपदे हा केवळ 500 कोटींचा मालक असतांना अतिशय महागडे असलेले हेलिकॅफ्टर कसे विकत घेऊ शकतो आणि पाचशे कोटीचा मालक जर हेलिकॅफ्टर घ्यायला लागला तर जमिनीवर जशा कार्स दिसतात तसे आकाशात दिवसभर हेलीकॅफ्टर्सची वर्दळ दिसली असती, याहीपेक्षा महाभयानक टुक्कार या मालिकेत काही असेल तर श्रेयस तळपदे याची एकमेव दाखवलेली आणि तीही जुनाट म्हणजे पाच दहा लाखात मिळणारी सेकंड हॅन्ड होंडा कार. ज्याने कोणी या मालिकेत हे प्रताप केले त्याने निदान श्रेयसच्या वेगवेगळ्या तीन चार महागड्या कार्स तरी दाखवायला हव्या विशेष म्हणजे श्रेयसची वहिनी ज्या कारने या मालिकेतल्या प्रार्थना बेहरेकडे जाते तेव्हाही तिची अगदी जुनाट टोयोटो इन्होवा दाखवलेली आहे ज्या अशा जुनाट कारची देखील किंमत पाच लाखांच्या पुढे नसावी. किती या दळभद्री आणि अननुभवी कल्पना अशा मालिका बनविणाऱ्यांच्या? अत्यंत महत्वाचे म्हणजे श्रेयस तळपदे या उद्योगपतीचे कार्यालय एवढे टुक्कार दाखविले आहे कि ते कोणत्याही अँगलने फार मोठी आर्थिक उलाढाल करणाऱ्या उद्योगपतींचे कार्यालय अजिबात वाटत नाही आणि एवढ्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाच्या कार्यालयातला अत्यंत बालिश स्टाफ बघून तर असे वाटते ज्याने हे घडवून आणले त्याला हजार माराव्यात आणि एक मोजावी. आणि अशा आणखी असंख्य चुकांनी काठोकाठ भरलेली हि भिक्कार मालिका, बघितल्यानंतर भिंतीवर डोके आपटून मोकळे व्हावेसे वाटते, एका चांगल्या कथानकाचे भजे झाले एवढेच सांगून मोकळा होतो…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी