मुक्काम पोस्ट दिल्ली आणि व्यथा मनातली…
-हेमंत जोशी
कोरोनाने वाट लावली माझा जगभर प्रवासाचा मार्ग खुंटला आता ते दिवस येतील किंवा नाही कधी येतील सांगता येत नाही, माझे ओळखीच्या एका सरकारी अधिकारी असलेल्या मित्रासारखे अलीकडे झालेले आहे म्हणजे त्याची देखणी पत्नी माहेरी गेली कि हा पूर्वीच्या जाडजूड कुरूप प्रेयसीला घरी बोलावून घेतो त्यापद्धतीने काही वर्षात मला परदेशात जाणे जमत नाही म्हणून मी अलीकडे तीन दिवस दिल्लीलाच जाऊन आलो कदाचित तीन दिवस ठाण्याला जाऊन आलो असे देखील या कोरोनामुळे सांगण्याची वेळ घेऊ शकते. दिल्लीत अचानक प्रसाद लाड यांची भेट झाली, मुलीच्या स्वागत समारंभाचे मला म्हणाले आमंत्रणे करायला आलो आहे, मुलगी आणि जावई दोघेही उच्चशिक्षित त्या दोघांचे कौतुक करतांना प्रसाद लाड यांना भरून आले त्यानंतर मुंबईला परततांना औरंगाबादचे मोठे उद्योगपती कंत्राटदार मित्रवर्य विवेक देशपांडे विमानतळांवर असेच अचानक भेटले अलीकडे मित्रांचा संपर्कच तुटला आहे त्यांच्याशी देखील खूप अंतराने बोलणे झाले, मुलीला मुलगा आणि मुलाला चक्क जुळे झाले सांगतांना त्यांना देखील डोळ्यातला आनंद लपविता आला नाही, माणूस आपला पुनर्जन्म आपल्या पुढल्या पिढीत बघत असतो मग तो साधा कामगार असो कि कोट्याधीश, तुम्हाला म्हणून सांगतो असे कोणीही केव्हाही तुम्हाला जेव्हा त्यांच्या मुलांविषयी सांगतात, तुम्ही देखील त्यांच्या आनंदात अशावेळी मनापासून सहभाग घ्यायला हवा, उगाचच मनाचा जळफळाट करून घेऊन नका जो अनेक भारतीय करवून घेतात. मध्यंतरी असेच अचानक मला ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर माझ्या नरिमन पॉईंटच्या कार्यालया आसपास भेटले. त्यांचा मोठा मुलगा आणि संजय राऊत यांची मुलगी एकाच वर्गात शिकणारे त्यातून त्यांचे प्रेम जुळले जे दोघांच्याही घरी मान्य होते कसलाही विरोध करण्याचा प्रश्न नव्हता किंबहुना संजय राऊत यांची कन्या लग्नाआधीच समंजस सुशिक्षित मनमिळाऊ नार्वेकर कुटुंबात खूप रुळलेली होती, विवाह स्वागत समारंभात आम्ही होतोच, हौशेने समारंभ पार पाडला पण त्यावर देखील टीका, का तर म्हणे ब्राम्हण नसलेल्या नार्वेकर पिता पुत्राने लग्नात पेशवाई फेटा बांधला होता आणि त्यापद्धतीने कपडे घातले होते म्हणून टीका आणि तीही कोणाकडून तर बहुसंख्य ब्राम्हण आणि संघ भाजपावाल्यांकडून म्हणजे जेथे ज्यांनी मनापासून कौतुक करायला हवे तेथे त्यांनी जहरी टीका केली, ज्याचे नार्वेकर आणि राऊत कुटुंबाला अगदी मनापासून वाईट वाटले. असे घडता कामा नये असे मलाही मनापासून वाटते…
दिल्ली मुक्कामात मुद्दाम रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे कार्यालयीन प्रमुख आणि राज्यातल्या भाजपाचे माजी प्रवक्ते अत्यंत बुद्धिमान उच्चशिक्षित चतुर बोलके आणि अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे विश्वास पाठक यांना त्यांच्या रेल भवनातील कार्यालयात भेटायला गेलो तेथे महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी सुनील चावके यांची देखील ओळख झाली वास्तविक चावके भाजपा द्वेषाने खचाखच भरलेले पण पाठक माणूस हा असा कि उद्या त्यांना भेटायला ममता बॅनर्जी देखील येईल किंवा नितीन राऊत त्यांना पप्पी देऊन जाईल आणि नाना पटोले त्यांना लाडाने कडेवर उचलून घेतील. विश्वास पाठक कायम समुद्राच्या लाटात पोहणारे व्यक्तिमत्व वास्तविक हा माणूस कार्पोरेट जगतातला एकेकाळी प्रचंड यशस्वी व्यक्तिमत्व पण दिवंगत वडिलांनी दोन्ही मुलांना सांगून ठेवले होते कि तुमच्यातल्या कोणा एकाने आपले आयुष्य कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संघ भाजपाला समर्पित करायलाच हवे म्हणून विश्वास यांनी ते प्रचंड आर्थिक मिळकत असलेले कार्पोरेट जगत एक दिवस सोडले आणि नागपुरात येऊन त्यांनी आर्थिक दृष्टया अपयशी तरुण भारत या संघाच्या दैनिकाची जबाबदारी अंगावर घेतली त्यानंतर त्यांना श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्युत मंडळात संचालक म्हणून घेतले नंतर काही काळ भाजपा प्रवक्ते आणि आता रावसाहेब दानवे यांनी टाकलेली जबाबदारी ते मोठ्या कौशल्याने पार पाडताहेत. आयुष्याचे नेमके आर्थिक नियोजन आणि सतत काहीतरी नवनवीन शिकण्याची जिद्द, राज्यातल्या भाजपाला एक गुणी माणूस गळाला लागलाय…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी