मीडिया बढिया कि घटिया ?
-पत्रकार हेमंत जोशी
मला मीडियात देखील हेमंत देसाई भाऊ तोरसेकर कमी दिसले अभावाने आढळले, घटिया मंडळी मीडियातल्या प्रत्येक क्षेत्रात तेही आपल्या या राज्यात जागोजागी दिसले तेच वातावरण राज्यातल्या राजकीय वर्तुळातले देखील म्हणजे पोटतिडकीने लढणारे किंवा प्रश्न समाजासाठी मांडणारे अभावाने दिसले, स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटासाठीच युक्तीने पण पोटतिडकीने समस्या किंवा प्रश्न मांडणारे सर्वत्र दिसले दिसतात आढळतात, कुटुंबासाठी आर्थिक दुकानदारी हे पोटतिडकीने प्रश्न मांडणाऱ्या नेत्यांचे मीडियाचे प्रमुख उद्दिष्ट असते त्यामुळे एखादा लोकप्रतिनिधी किंवा मीडियावाला जेव्हा एखाद्या झालेल्या होणाऱ्या घडलेल्या भ्रष्टाचारावर बोलत किंवा लिहीत असतो त्यात समाजाचे देशाचे राज्याचे राष्ट्राचे भले कमी, पुढे या पोटतिडकीने मांडलेल्या किंवा लिहिलेल्या प्रकरणातून आपल्या आर्थिक वाट्याचे काय, हाच प्रश्न तो मीडियावाला किंवा नेता समोरच्याला विचारात असतो, एकदा का तोडपाणी झाली कि त्या भ्रष्टाचाराचे हा पोटतिडकीने बोलणारा एकतर समर्थन करायला लागतो किंवा त्या प्रकरणावर आयुष्यभर मूग गिळून बसण्याची भूमिका घेतो. वरकरणी अतिशय शिस्तीचे वाटणारे सरकारी अधिकारी देखील बहुतेकवेळा ती शिस्त केवळ काळ्या कमाईसाठी अंगिकारतात हे लक्षात ठेवा म्हणजे फारच कमी किंवा बोटावर मोजण्याएवढे प्रवीण दीक्षित किंवा अविनाश धर्माधिकारी ज्यांना अगदी मनापासून वाईटांवर कोणत्याही अपेक्षेविना तुटून पडायचे असते…
ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यात केव्हातरी कुठेतरी काहीतरी चांगले केले आहे त्यांना विसरायचे नाही त्यांना फसवायचे नाही हे मी अगदी सुरुवातीला ठरविले आणि तेच पोटच्या मुलांना देखील सांगितले त्यामुळे आमच्यावर उपकार केलेल्यांचे विषय आम्ही कायम घरी गप्पांच्या ओघात काढतो मनातून मनापासून अशांची मूर्ती डोळ्यासमोर आणून नतमस्तक देखील होतो. उपकाराची परतफेड कधीही अपकार पद्धतीने करायची नसते हे तुम्ही देखील कायम लक्षात ठेवा, जगण्यातला आनंद आपोआप द्विगुणित होतो. एक महत्वाची बाब अशी कि आपल्याशी अमुक एखादा मित्र किंवा नातेवाईक किंवा अन्य ओळखीचा वाईट वागला कि आपण त्याला सतत शाप देतो किंवा त्याचे वाटोळे होवो असे सतत म्हणतो पण असेही शिव्या शाप देणे अजिबात योग्य नाही कारण ते ज्याला देतो त्याला न लागता आपलेच शाप आपल्याकडे परत येत असतात कारण तुम्ही आम्ही म्हणजे परमेश्वराचे का अवतार आहोत कि आपल्या बददुवा इतरांना लागतील आणि त्याचे वाईट होईल, असे देखील कधीही घडत नाही. माझा एक चुलत भाऊ होता तो मी लहान असतांना त्याच्या वर आलेल्या आर्थिक संकटामुळे ब्राम्हण व पुजारी घराण्यातला असून देखील सट्टा जेथे खेळतात त्या दुकानावर नोकरी करायचा, मला तो माझ्या लहानपणापासून आवडायचा मी त्याला त्या दुकानासमोर संध्यकाळी भेटायला गेलो कि तो त्याकाळी मला पाच पैशांचे नाणे द्यायचा ज्यातून मला माझे आवडते पदार्थ खायला मिळायचे म्हणजे बिस्कीट किंवा ब्रेड असे फुटकळ काहीतरी. पुढे तो त्याच्या पुण्याईने धुळे विद्युत मंडळात नोकरीला लागला आणि शॉर्टहँडच्या शेवटच्या परीक्षेसाठी त्याकाळी त्याने मला सहा महिने त्याच्याकडे ठेवून घेतले त्याचे हे उपकार मी आजही कधीही विसरलो नाही पुढे त्याचा मुलगा शेतकरी झाला म्हणून त्यांनी आणि मी त्या मुलासाठी खामगाव येथे शेती घेऊन दिली, आजही माझया नावावर त्यामुळे 22 एकर शेती आहे. अगदी अलीकडे ती शेती बघायला मी खामगावला गेलो आणि शेगावच्या भक्त निवासात उतरलो….
सकाळी भक्त निवास परिसरात फिरत होतो, एके ठिकाणी एक अतिशय वयस्क जोडपे उभे राहून त्यांच्या भ्रमण ध्वनीवर काहीतरी ऐकत होते म्हणून मी कान पुढे केले तर असे लक्षात आले कि ते जगप्रसिद्ध पत्रकार आदरणीय भाऊ तोरसेकर यांचा लक्ष्यवेध ऐकत होते, मला राहवले नाही म्हणून मी पण तेथे उभा राहून ते ऐकायला लागलो, भाऊंचे बोलणे थांबल्यावर आम्ही एकमेकांचा परिचय करून घेतला, ते रापूर येथे राहणारे दामोटी मला म्हणाले एकवेळ आम्ही जेवण बाजूला ठेवतो पण दररोज पत्रकार भाऊ तोरसेकर ऐकल्याशिवाय आम्हा दोघांनाही चैन पडत नाही, माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मी त्यांना सरप्राईज दिले, तेथूनच दिल्लीत सध्या वास्तव्याला असलेल्या भाऊंना मी त्यांचे जेव्हा बोलणे करून दिले त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, त्यासाठी येथे शब्द नाहीत. आणि जगाचे लाडके असलेले भाऊ, आम्ही त्यांच्या कुटुंबातले एक असे जेव्हा मानून ते आमचे लिखाणाच्या बाबतीत कधी कान पकडतात किंवा कधी अगदी फोन करून मी, विक्रांत किंवा आबा मालकर आम्हा तिघांचे कौतुक देखील करतात, मन भरून येते, भाऊंचे आम्हा तिघांवर लै उपकार पण त्या उपकाराची परतफेड कधीही आम्हा तिघांकडून चुकीच्या पद्धतीने होणार नाही याचे समाधान वाटते. जगात जेथे जावे तेथे मराठी माणसात भाऊंचे कौतुक ऐकतांना कान तृप्त होतात मन भरून येते, महत्वाचे म्हणजे भाऊ तोरसेकर यांनी जे काय अगदी तुटपुंजे आर्थिक धन मिळविले असेल ते केवळ ऑन मेरिट, म्हणून हा आदर वाढत गेला, जर भाऊंनी लेखणीचा वापर आर्थिक सुबत्तेकडे केला असता तर ते त्यांच्या आयुष्यात म्हाडाच्या वन रम किचन मध्ये राहिले नसते पण त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे व कन्येचे लक्ष कायम कायम देशसेवा करण्यात गुंतले असल्याने भाऊंना पैसा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गरजा कायम गौण वाटल्या, भाऊंच्या आठवणींवर पुन्हा कधीतरी…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी