झी गौरव रटाळ पुरस्कार…
-पत्रकार हेमंत जोशी
मी एखाद्या मान्यवर व्यक्तीला ओळखतो ऐवजी अमुक एक मान्यवर मला ओळखतात, हे माझ्या आयुष्याचे ध्येय होते जे बऱ्यापैकी साध्य झाले म्हणजे मी शरद पवारांना ओळखतो ऐवजी शरद पवार मला ओळखतात इतपत जेव्हा माझी ओळख या राज्याला झाली, हा विचार जेव्हा केव्हा अनेक मान्यवरांच्या बाबतीत माझ्या डोक्यात येतो, आयुष्याचे खर्या अर्थाने सार्थक झाले, कायम हेच वाटत राहते. 30 ऑकटोबर शनिवारी दरवर्षीचा झी गौरव रटाळ पुरस्कार कार्यक्रम यथासांग पार पडला. यावर्षी देखील नेहमीप्रमाणे तेच ते आणि तेच ते, कित्ती कित्ती वेळा म्हणून तो रटाळ निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या कार्यक्रम बघायचा, उबग आलाय या भिक्कार विनोद वापरणाऱ्या कार्यक्रमाचा, समोर बसलेले आणि जमलेले सिने कलावंत खोटे हास्य चेहेऱ्यावर आणत असल्याने डॉ निलेश साबळे यांना सतत हेच वाटत असावे कि आपण आणि आपली छपरी टीम भलतेच यशस्वी आहोत. ना विनोदाचा कुठला दर्जा आणि ना हसू येते, पांचट कुठले. तर मी अमुक मोठ्या व्यक्तीला ओळखतो पेक्षा तमुक मान्यवर मला ओळखतात अशी तुमची जेव्हा या समाजासमोर इमेज तयार होते, खर्या अर्थाने तुम्ही यशस्वी झालात असे म्हणता येते. या झी गौरव रटाळ पुरस्कार कार्यक्रमात अभिनेते आणि आमचे लाडके व आवडते मित्र मोहन जोशी यांना ज्या दोन महान कलावंतांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला ते देखील माझे अत्यंत लाडके आणि कोकणस्थ असूनही कमालीचे बुद्धिमान असे अभिनेते अर्थात प्रशांत दामले आणि गिरीश ओक. विशेष म्हणजे गिरीश नागपूरचे आणि मोहन जोशी अमरावतीचे म्हणजे दोघेही माझ्या विदर्भातले. संधी मिळाली कि आम्हा वर्हाडी माणसाचा कसा एका झटक्यात सुरेश भट होतो त्यावर गिरीशजी आणि मोहनजी मस्त उदाहरण…
याच रटाळ कार्यक्रमात भ्रष्ट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सत्कार व छोटेखानी मुलाखत घेण्यात आली, पत्नी ऐवजी हे महाशय भलत्याच आवडत्या तरुणीचे नाव कौतुकाने घेतात कि काय मला वाटले पण चतुर राजेश टोपे यांनी जेव्हा वेळ मारून नेली तिकडे जालन्यातली त्यांची ओरिजनल पत्नी मनोमन नक्की सुखावली असेल. राजेश टोपे आणि त्यांचे करोना काळातले कारनामे त्यावर मी शंभर टक्के राजेश यांना अजिबात सोडणार नाही. येथे राजेश नव्हे मोहन जोशी हा विषय आहे. आणि आमचा हा प्रचंड श्रीमंत मित्र जेव्हा अगदी स्वस्तातल्या कार्स कायम वापरतो, काय करणार एवढ्या संपत्तीचे, मनाला प्रश्न पडतो कारण कार्यक्रमाच्या चार दिवस आधी मी आणि मोहनराव अचानक पुण्याला जातांना एकमेकांना टोल नाक्यावर जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्याकडे 18-20 लाखाची स्कोडा दिसली त्यानंतर त्यांना जेव्हा झी वाहिनीने मोहम्मद रफी यांच्या घरी पाठवले तेव्हा तर या श्रीमंतांकडे अगदीच स्वस्तातली मारुती कार होती. म्हणजे हे तर असे झाले कि हिंदी सिनेमातला खलनायक त्या झाडाखाली 10 कोटी रुपये घेऊन ये अशी जेव्हा धमकी देतो तेव्हा मराठी सिनेमातला खलनायक त्या झाडाखाली 50 हजार रुपये घेऊन ये पद्धतीने धमकी देतो, आपले मोहनराव हे असे प्रचंड पैसे असूनही मराठी सिनेमातल्या खलनायकासारखे. जरा आमच्या या मित्राची येथे सहज खेचली त्या ज्योतीवाहिनी खुश व्हाव्यात म्हणून पण जे प्रशांत आणि गिरीश म्हणाले तेच खरे कि मोहनजोशी यांच्यासारखा साधा सिम्पल आणि मैत्रीला जागणारा अभिनेता शोधून सापडणार नाही. फार वर्षांपूर्वी माझी पहिल्यांदा दिवंगत उद्योगपती दत्तात्रय म्हैसकर यांनी अभिनेते मोहन जोशी यांच्याशी ओळख करून दिल्यानंतर भलेही मी आणि मोहनराव एकमेकांना कामाच्या व्यापात फारसे भेटत नसलो तरी मनातून दोघांना हेच वाटते कि आम्ही एकमेकांच्या फार जवळ आहोत आणि हीच त्यांची खासियत आहे. मोहन जोशी उत्तम नट तर आहेच पण आधी अति उत्तम मित्र म्हणून कित्येकांना ज्ञात आहेत, हेच त्यांचे मोठे यश आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी