खुले कवाड अफलातून अनिल गायकवाड…
-पत्रकार हेमंत जोशी
दारिद्र्य कुचंबणा अपमान दुर्लक्षित चेष्टा त्रास हेळसांड असे जेवढे म्हणून वाईट शब्द असतील त्यातून बऱ्यापैकी बाहेर पडणारी बौद्ध धर्मियांची माझ्या वयाची पहिली पिढी, नवंबौद्ध म्हटला कि आजही जवळपास सारेच सवर्ण त्यांना खुबीने एकतर टाळतात किंवा दूर ठेवतात, हे असे अलीकडे आता प्रमाण बऱ्यापैकी घटलेले असले तरी संपलेले अजिबात नाही आणि मला हे जाणवते किंवा माहित आहे कारण मी ब्राम्हण आहे म्हणून मला हे छुपे अंतर तंतोतंत माहित आहे, जे बौद्ध धर्मीय त्यांच्या क्षेत्रात म्हणजे नोकरी व्यवसायात पुढे चालले किंवा पुढे गेले, दुर्दैवाने ते देखील गचाळ वस्तीत आजही दारिद्र्यात राहणाऱ्या बौद्ध बांधवांचा अजिबात विचार न करता केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात कारण बाबासाहेबांचे विचार अशांना फक्त मिरवायला हवे असतात त्यांना आचरणात आणायचे नसतात त्यामुळे नवश्रीमंत झालेले असे कितीतरी किंवा बहुसंख्य बौद्ध धर्मीय असे कि जे त्यांच्या गरीब असलेल्या समाज बांधवांसमोर मुद्दाम साधी स्वतःची म्हणजे मीही तुमच्यातलाच एक अशी ओळख द्यायलाही तयार नसतात आणि सवर्ण तर सतत फार मोठ्या प्रमाणात नवबौद्धांपासून दूर राहणे कायम पसंत करतात आणि सवर्णांचे हे असे खुबीने वाळीत टाकणे नवबौद्धांच्या लक्षात येते त्यामुळे मनातून ते आजही प्रचंड अस्वस्थ असतात. सुख दुख्खात आम्ही एकमेकांना अगदी उघड सहकार्य आणि मदत करीत आलो म्हणजे तो बडा सरकारी अधिकारी असूनही त्याने कधीही आमच्या मैत्रीची लपवाछपवी केली नाही म्हणजे माझ्यासारख्या खतरनाक पत्रकारांशी मैत्री आहे हे सांगतांना आणि माझे तर त्याच्यावर कायम सख्ख्या भावासारखे प्रेम आहे होते आणि असेल…
३१ ऑक्टोबरला राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव आणि मी जय तर तो वीरू म्हणजे अनिल गायकवाड त्यांच्या प्रदीर्घ सरकारी सेवेतून निवृत्त होताहेत, आपसूकच आठवणी दाटून आल्या आणि 27-28 वर्षांची हि दीर्घकाळ टिकलेली जोपासलेली वाढलेली अतूट मैत्री नजरेसमोर तरळून गेली. मी माझ्या अनेक असंख्य स्वार्थी नवबौद्ध मित्रांना अभियंता अनिल गायकवाड आणि नेता माझा मित्र रामदास आठवले या दोघांचेही उदाहरण हमखास देऊन सांगतो कि जमले तर गायकवाड आणि आठवले यांच्या वृत्तीला फॉलो करा त्यामुळे इतरांचे सोडा निदान तुमच्या आजही दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात खितपत पडलेल्या समाजबांधवांचे त्यातून अगदी भले साधणे तुम्हाला सहज शक्य होईल, दुर्दैवाने ते तसे घडत नाही, एकालाही कोणालाही गायकवाड आठवले अजिबात व्हायचे नाही. अत्यंत अत्यंत महत्वाचे जे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आहे आणि अनुभवले आहे ते असे कि अभियंता अनिल गायकवाड आणि नेता रामदास आठवले या दोघांचेही शंभर टक्के त्यांच्या बौद्ध धर्मियांवर मनापासून प्रेम आणि सहकार्य पण इतरांचा ते कधीही दुस्वास करताना दिसले नाहीत त्यामुळे बौद्धेतर लोकांची तेवढीच मोठी गर्दी या दोघांसभोवताली सतत आढळते. अनिल गायकवाड माझे फुल टू मित्र, ते अभियंता कमी नेता अधिक आहेत, प्रचंड उत्साही त्यामुळे एका हाताने बांधकाम खात्याने सोपविलेल्या जबाबदारीची कामे उरकतांना दुसऱ्या हाताने त्यांचे जमलेल्या गर्दीला सहकार्य करणे मनापासून सुरु असते. यार अनिल तुमचे यापुढे या खात्यात सचिव म्हणून नसणे आता हि पोकळी भरून निघणे अशक्य आहे….
आपल्या प्रदीर्घ सेवेत अनिल गायकवाड यांनी कधीही वागण्यातली साधी सरळ मितभाषी वृत्ती सोडली नाही आणि मुजोरी कधीही अंगात आणली नाही. मध्यंतरी विनाकारण त्यांना काही प्रकरणात त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी जेलसीतून गोवले तेव्हा त्यांना ओरबाडणारे बहुतेक सारे त्यांच्यापासून या कठीण काळात दूर गेले. मला मात्र यासाठी बरे वाटले कि एकतर अनिल यांना नेमके कोण आपले आणि कोण स्वार्थी हे कळले आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे अनिल यांना त्यादरम्यान वेळच वेळ असल्याने आम्हाला अनेकदा माझ्या ऑफिस मध्ये बसून विविध आवडत्या पदार्थांची चव चाखता आली. माझ्या आयुष्यात आनंद दिघे यांच्यासारखी फार कमी मंडळी मी अशी बघितली कि अगदी खिसे उपडे करेपर्यंत लोकांना वाटत राहायचे त्यातलेच आमचे हे सरकारी नोकरीतले मित्र श्रीमान अनिल गायकवाड, यांचे दानधर्म करण्याचे व्यसन सुटता सुटत नाही अगदी मी किंवा माझ्यासारखे काही कितीही त्यांना रागावले तरी त्यामुळे जेव्हा अनिल सरकारी नोकरीतून कांही काळ घरी होते याच दानधर्म करण्याच्या नादातून त्यांना मिळविलेली कमावलेली मालमत्ता विकावी तर लागलीच पण कर्जबाजारी झाल्याने त्यांना प्रसंगी उधारी व कर्जे उचलावी लागली. सरकारी नोकरीतला म्हणाल तर हा वृत्तीने बाबासाहेब आणि म्हणाल तर दानशूर कर्ण. समोरचा सहकार्य मागायला आला कि ना त्याची जात बघायची ना धर्म ना गरिबी किंवा श्रीमंती, जेवढे म्हणून शक्य आहे ते सर्व अगदी कुटुंबाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून लुटून किंवा सहकार्य करून मोकळे व्हायचे. रामदास आठवले यांचे देखील हे असेच, नशीब रामदास दीर्घकाळ सत्तेत आहेत अन्यथा त्यांना एकदिवस दानधर्म करण्यासाठी जर काही उरले नसते तर त्यांना अक्षरश: नक्की वेड लागले असते…
माझ्या शरीरावर दोन ठिकाणी तीळ आहे त्यातला एक जिभेवर आणि दुसरा कुठे असेल ओळखा कारण मला तो कुठे आहे हे येथे सांगता येणार नाही. एक तीळ जिभेवर असल्याने मी जे बोलतो नेमके ते तसेच घडते. अनिल गायकवाड यांच्या बाबतीत बोलायचे सांगायचे झाल्यास, ते बांधकाम खात्याचे सचिव म्हणून जरी निवृत्त होत असले तरी शासन त्यांना समृद्धी महामार्गाच्या जबाबदरीतून नक्की मुक्त करणार नाही कारण समृद्दी महामार्गाचे कठीण असे काम गायकवाड यांच्या मार्दर्शनाशिवाय सहज पूर्ण होणे नक्की अशक्य आहे मात्र जेव्हा केव्हा अनिल गायकवाड महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातून निवृत्त होतील मला खात्री आहे ते पूर्ण वेळ समाजसेवेला वाहून घेतील आणि एक दिवस नक्की बंधू सुनील गायकवाड यांच्यासारखे खासदार किंवा निदान आमदार तरी होतील जे त्यांना सहज शक्य आहे, मतदार त्यांना डोक्यावर उचलून घेतील समाजकारणात किंवा राजकारणात अनिल यांना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल. अनिल उत्तम कवी आहेत कर्तबगार बाप आहेत त्यांच्या प्रत्येक नातलगांचे ते आयकॉन व आधारस्तंभ आहेत. जयश्री वहिनींचे तर ते हिरो आहेत आवडते राजकुमार आहेत आणि हे असे उत्तम संस्कार त्यांना त्यांच्या अत्यंत आवडत्या दिवंगत बापाकडून म्हणजे शिक्षक म्हणून जीवन जगलेल्या बळीराम गायकवाड यांच्यापासून मिळाले आहेत. त्यांच्या निवृत्ती निमित्ते देवाकडे त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणे माझे कर्तव्य आहे जे मला मनापासून पार पडायचे आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी