आशिष शेलार आणि घंटा : वाजवली एकदाची
-पत्रकार हेमंत जोशी
दारू ढोसून घरी आल्यानंतर आईवडिलांना यथेच्छ शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या त्यांच्या पोटच्या मुलाने डेथबेड वर असलेल्या वृद्ध आईवडिलांना एक दिवस हळूच येऊन कानात सांगावे कि आजपासून मी पिणे आणि चिडणे सोडले आहे त्याक्षणी मृत्यूच्या दारात असलेल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद किंवा भुकेपोटी तडफडणाऱ्या एखाद्या गरीब कुटुंबाला अचानक मोठ्या रकमेची लॉटरी लागल्यानंतर त्यादिवशी भरपेट जेवणार्या अशा अस्वस्थ उपाशी दरिद्री कुटुंबाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद असे अनेकांच्या बहुतेकांच्या चेहऱ्यावर अचानक काहीतरी चांगले घडण्याने जो न मावणारा आनंद अचानक ओसंडून वाहायला लागतो आणि आपण बघणारे अशावेळी मनापासून जी कौतुकाची दाद त्यांना देतो तो तसा क्षण मी 22 ऑकटोम्बर शुक्रवारी रोजी अनुभवला म्हणाल तर बघितला. निमित्त अर्थात भाजपा नेता माजी नामदार सध्याचा उत्साही आमदार आशिष शेलार हे ठरले. 22 तारखेला अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा बांद्र्याच्या रंगशारदा नाट्यगृहाचा पडदा वर गेला आणि आशिष शेलार यांनी घडवून आणलेले माझ्या जवळच्या मित्राचे म्हणजे प्रशांत दामले यांचे, एका लग्नाची दुसरी गोष्ट हे नाटक समस्त जमलेल्या प्रेक्षकांना बघायला मिळाले म्हणून जमलेल्यांनी आमदार आशिष शेलार यांचे मनापासून आभार मानले. इतर अनेकांसारखा आशिष शेलार केवळ स्वतःच्या मतदारांचा म्हणजे केवळ स्वतःच्या मतदार संघाचा कधीही विचार करीत नाही कारण तो म्हणाल तर या राज्याचा आणि शंभर टक्के अख्य्या मुंबापुरीचा नेता आहे त्यामुळे त्यादिवशी गर्दी होती दर्दी मुंबईकर नाट्य रसिकांची….
नाटक सुरु होण्यापूर्वी आशिष शेलार आणि त्यांचे आम्ही काही मित्र एकत्र चहा कॉफी घेत असतांना त्यातले एक अशोक हांडे जे आशिष यांचा एकेरी उल्लेख करत होते,मला खूपसे उथळ काहीसे पोरकट वाटले पण जेव्हा त्यांनी रंगमंचावर नाटक सुरु होण्यापूर्वी भाषण केले, जमलेल्या माझ्यासहित समस्त रसिकांना ते अगदी मनापासून आवडले. आशिष तर भाषण करण्यात पटाईत, त्यांचे आश्वासक शब्द आकर्षक ठरले. कवी आणि पत्रकार प्रशांत डिंगणकर आणि आशिष यांचे केवळ मित्र त्यांना कायम मनापासून सहकार्य करणारे पराग पागे दोघांचे आणि आशिष यांच्या स्टाफचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन दाद देण्यासारखे ठरले. माणसे कशी जोडावीत हे आशिष शेलार यांच्याकडून शिकण्यासारखे, देश विदेशात राहून आलेला उच्चशिक्षित घरातला परेश पागे हा असाच आशिष यांचा अफलातून सहकारी आणि मित्र ज्याच्या कल्पनेतून आशिष शेलार यांनी सीलिंक सुरु होण्यापूर्वी उत्तुंग तिरंगा असलेले आणि समस्त मुंबईकरांचा आकर्षण ठरलेले ते गार्डन उभे केले आहे. डिंगणकर किंवा पागे सारख्या अशा कितीतरी कर्तबगार मंडळींचा गोतावळा म्हणजे आशिष यांच्याकडे अशा धमाल सहकाऱ्यांचा मोठा साठा आहे म्हणजे आशिष यांची ती मोठी पुंजी आहे….
जेव्हा माझे मन अस्वस्थ असते तेव्हा मी, जिंदगी देनेवाले सून ‘तेरी दुनिया से दिल भर गया, सारखी गाणी ऐकतो एकटाच बघत बघत झोपी जातो त्यातलेच एक माझे अत्यंत आवडते गाणे जे प्रशांत दामले याने स्वतः गायले आहे आणि मला एकट्यात गाऊन देखील दाखवले आहे ते, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य केले कि ते घरबसल्या मिळतं, हे गाणे एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये देखील ऐकायला मिळाल्याने कान आणि मन तृप्त झाले त्यात या नाटकात माझ्या सिनियर दिवंगत मित्राची रामचंद्र लाड यांची मुलगी कविता अभिनय करते, प्रशांत, कविता दोघांनाही पाहून व भेटून मन आनंदाने भरून आले. एकदाची 22 तारखेला तिसरी घंटा वाजली, माझ्या आमच्या साक्षीने रंगमंच पुन्हा एकवार उजळून निघाला, नेहमीचे कामगार सज्ज झाले, कलाकार आणि रसिक प्रेक्षक एकत्र आले. कलाकार भूमिकेत शिरले, पडदा हळूहळू वर गेला, जमलेल्या रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजविल्या, तत्पूर्वी अगदी मनापासून ज्या नाट्यकर्मींनी नाट्य क्षेत्राशी संबंधित ज्यांनी कोरोना काळात तन मन धनाने इतर गरजूंना सहकार्य केले त्या साऱ्यांचा आशिष शेलार यांनी सत्कार सोहळा देखील तेथे घडवून आणला, त्यानंतर इतर काही महत्वाच्या कार्यक्रमाना फाटा देऊन शेलार माझ्या शेजारी बसून नाटकाचा आनंद घेत होते आणि मागे बसलेले जयवंत वाडकर नको वाटावे एवढे विनाकारण हसून दाद देत होते, या प्रसंगाचा एक साक्षीदार म्हणून मी धन्य झालो….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी