आशिष तुझे रंग हजार
-पत्रकार हेमंत जोशी
जोशांचे जोशिलेपण ही कविता मला दररोज अनेकांकडून इतक्यांदा पाठविली जाते कि एखाद्या दिवशी जर कोणी ती पाठविली नाही तर मीच त्या कवितेला माझ्याच फोनवर पाठवून मोकळा होतो हे असे पूर्वी आमच्या एका गमत्या पत्रकाराचे पण व्हायचे म्हणजे कधीतरी कोणीतरी प्रेमपत्र पाठवेल या आशेवर जगणाऱ्या या पत्रकाराला प्रेमपत्र पाठविणे फार दूर पण साधा ओठांच्या चंबूचा फोटो देखील एखादीने न पाठवल्याने पुढे पुढे तो स्वतःच स्वतःला प्रेमपत्र पाठवून मोकळा व्हायचा. आठवले यांचे किंवा अनेक कवी कवियत्रींचे देखील तेच होते म्हणजे त्यांनी रचलेल्या चारोळ्या किंवा कविता ते स्वतःच अनेकदा आरशासमोर उभे राहून स्वतःलाच ऐकवतात आणि स्वतःची स्वतःच्या हाताने पाठ थोपटून मोकळे होतात. तोच तो अभिनय करणाऱ्यांचे देखील तेच होते विशेषतः विनोदी पात्र रंगवणाऱ्यांवर अशी हि वेळ नक्की एक दिवस येते म्हणजे जे हिंदी मध्ये जॉनी लिव्हर राजू श्रीवास्तव सारख्या किंवा मराठीत देखील अनेक विनोदी नट नट्यांचे होते तेच विशाखा सुभेदार समीर चौगुले किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये काम करणाऱ्या साऱ्यांचे एक दिवस होणार आहे जसे कॉमेडी एक्स्प्रेस मधले कलावंत एकेकाळी खूप लोकप्रिय होते पण आता ते फारसे कुठे काम करतांना दिसतही नाहीत थोडक्यात कोणत्याही नटाने साचेबद्ध अभिनयात अडकू नये मग त्यांचाही लक्ष्मीकांत बेर्डे एक दिवस नक्की होतो. अर्थात काही नटांना अभिनयात खूप मर्यादा असतात त्यामुळे त्यांना असे कॉमेडी शो म्हणजे आयुष्यभराच्या पोटापाण्याची चिंता सोडविणारे ठरतात. मात्र नम्रता संभेराव सारख्या नटनट्यांनी अशा साचेबद्द अभिनयात न अडकणे केव्हाही चांगले अन्यथा सर्वांचाच एक दिवस डॉ. निलेश साबळे होतो…
मी राहातो त्या विधान सभा परिसराचे मतदार संघांचे आमदार आशिष शेलार त्यांचा 3 ऑकटोबर हा जन्मदिवस त्यानिमीत्ते अगदी मनापासून आशिषजी, बिलेटेड हॅपी बर्थडे !! आशिष आणि माझ्या प्रेमाची सुरुवात एखाद्या सिनेमासारखी झाली म्हणजे सुरुवातीला एकमेकांविषयी म्हणाल तर नफरत किंवा म्हणाल तर फारसे प्रेम नाही आणि आज मात्र राज्यातल्या माझ्या काही लाडक्या नेत्यांपैकी ते एक कारण मी जेव्हा सांताक्रूझ परिसरात राहायला आलो तेव्हा माझ्या हे लक्षात आले कि आशिष काही जातीयवादी अत्यंत वादग्रस्त नेत्यांशी उघड पंगा घेऊन पुरून उरतात उलट वरून ते त्यांच्या अशांच्या थेट उरावर बसून निवडणूक मग ती महापालिकेची असो अथवा आमदारकीची ते निवडूनही येतात इतरही सहकाऱ्यांना निवडून आणतात म्हणजे प्रसंगी नेता मग तो शिवसेनेचा असो अथवा बाबा सिद्दीकी सारखा अत्यंत वादग्रस्त जातीयवादी मुस्लिम नेता, मर्द आशिष प्रसंगी विरोधकांच्या मतदारांना हाताशी धरून निवडून येतात म्हणजे आशिष आमच्या परिसरातला थेट तरुण शिवाजी कि तो मोगल वृत्तीच्या मुस्लिम नेत्याला एवढा सळो कि पळो करून सोडतो कि शेवटी विधान सभेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या बाबा सिद्दिकीच्या मुलास झिशान याला आपला मतदार संघ बदलवून वरून मित्रवर्य आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेला हाताशी घेऊन दुसर्या कुठल्यातरी मतदार संघातून निवडणूक लढवावी लागली. वास्तविक ज्या विनोद तावडे यांनी खऱ्या अर्थाने आशिष यांना राजकारणात आणि भाजपमध्ये नेता म्हणून एकेकाळी एसट्याब्लिश केले किंवा पुढे आणले त्या विनोद तावडे यांच्याशी माझी सुरुवातीपासून मैत्री, जेव्हा केव्हा विनोद यांच्याशी बोलणे व्हायचे मी त्यांना कायम म्हणत असे कि आशिषचे पाय पाळण्यात दिसतात तुम्ही त्यांना डोक्यावर बसवू नका ते तुमच्या पुढे एक दिवस निघून जातील पण विनोद यांचे तेव्हाही आणि आजही त्या दोघांचे एकमेकांवर मनापासून प्रेम, त्यातून विनोद दुर्लक्ष कारायचे आणि नेमके तेच घडले, विनोद यांना त्यांच्या काही सवयी व चुका नाडल्या आणि बघता बघता अत्यंत सावध अत्यंत हुशार अत्यंत धूर्त अत्यंत मेहनती व उच्चशिक्षित आशिष हे तावडे यांच्या पुढे निघून गेले….
तेच आमच्या परिसरातील खूप श्रीमंत आणि खूप खूप धाडसी मोहित कंबोज या दुसऱ्या भाजपा नेत्याचे म्हणजे आधी माझा विनोद यांच्याशी फारसा परिचय नव्हता पुढे छान गट्टी जमली, पण जे विनोदजींना मी आशिष बाबत सावधगिरी बाळगायला सांगत असे तेच मी आशिष यांना मोहित कंबोज बाबत अनेकदा सांगितले कि हा गोल्ड किंग एक दिवस बघा तुम्हाला कसा वरचढ ठरतो ते, पण येथेही मैत्रीच्या बाबतीती मोठ्या मनाच्या आशिष यांनी माझे ऐकले नाही आणि मोहित यांना कायम जवळ घेतले पटापट मुके दिले घेतले आणि एक दिवस मोहित देखील भाजपामध्ये नेता म्हणून वेगळे स्थान निर्माण करून मोकळे झाले, मी वाट्टेल ते सांगितले असेल पण विनोद तावडे आणि आशिष शेलार किंवा मोहित कंबोज आणि आशिष शेलार यांची आपापसातले मैत्री त्या राजकारणात राहूनही आजतागायत अबाधित आहे ते तिघेही एकमेकांच्या पाठी एकमेकांचा दुस्वास करतांना कधी कानावर आले नाही. आशिष हे असे एकदा का मैत्री एखाद्याशी जोडली कि ती कायम टिकवणारे आणि त्यांना त्यांच्या याच वृत्तीचा स्वभावाचा विधान सभा मतदार संघात फायदा होतो, थेट मुस्लिम नेत्यांना आणि शिवसेनेला कायम आव्हान देत ते त्यांचा विधानसभा संघ आणि मुंबई शहर गाजवून सोडतात कायम चर्चेत असतात. ते जसे देवेंद्र फडणवीस यांना मनापासून भावतात त्याच आशिष यांना अगदी लाडाने शरद पवार कडेवर उचलून थेट क्रिकेट च्या विश्वात आणून सोडतात आणि राज ठाकरे देखील याच आशिष यांना प्रेमाचा व मैत्रीचा मिश्किल डोळा मारून मोकळे होतात. आशिष यांचा अख्खा विधान सभा मतदार संघ ग्लॅमर्सने पुरेपूर काठोकाठ भरलेला म्हणजे सलमान खान सारखे आघाडीचे सिने स्टार्स पासून तर सचिन तेंडुलकर किंवा विविध क्षेत्रे गाजवून सोडणारी कितीतरी कुटुंब आमच्या या मतदार संघात राहायला वास्तव्याला पण त्या प्रत्येकाशी आशिष यांचे घरगुती संबंध आणि ते सारे अगदी हक्काने व हट्टाने आशिष यांना आपल्या अडचणी सांगून त्यावर तोडगा काढण्यास हमखास सांगतात आणि काळ वेळ न बघता आशिष साऱ्याच मतदारांच्या मदतीला मनापासून धावून जातात म्हणून त्यांचे फॅन फॉलोअर्स फार मोठ्या संख्येने, आशिष यांना निवडणूक मग ती कोणतीही कुठलीही कोणाचीही असो विजय खेचून आणणे सहज शक्य होते…
आशिष शेलार एकदम बिनधास्त असा मुंबईकरांचा आवडता नेता किंबहुना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिका आत बाहेर तंतोतंत पाठ असलेल्या शेलार यांचा भाजपाला मोठा फायदा नक्की होणार आहे किंवा आशिष नियोजनपूर्वक हि निवडणूक लढवतील भाजपाला मोठे यश मिळवून देतील. कायम चौकटी पलीकडे विचार करणारा हा नेता, मुंबईकरांना आठवते कि जेव्हा एल्फिस्टन रोड वर पूल अचानक कोसळला तेव्हा याच शेलारांनी थेट रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा करून विशेष म्हणजे भारताच्या सरंक्षण मंत्र्यांना विश्वासात घेऊन थेट भारतीय सैन्य या रेल्वे पुलाच्या बांधकामात उभारणीत उतरविले आणि इतिहास घडला म्हणजे बघता बघता हा पूल पूर्ण केल्या गेला. आमच्या या परिसरात फळे भाज्या विकत घेणे म्हणजे कायम सोन्याचे भाव मोजण्यासारखे पण आशिष यांनी या परिसरात अनेक ठिकाणी फळे व भाज्यांचे टेम्पो उभे करून सामान्य काय किंवा श्रीमंत काय साऱ्यांना स्वस्त भाज्यांची पर्वणी उपलब्ध करून दिली. आशिष भल्या पहाटेपासून स्वतःला विविध उपक्रमात गुंतवून घेतात म्हणजे असे कोणतेही क्षेत्र किंवा त्यांचा मतदार संघ ज्याकडे त्यांचे लक्ष नसते, सतत पायाला भिंगरी लागल्यागत धावपळ, मतदार त्यांची हि लोकांसाठी सार्वजनिक उपक्रमांसाठी चाललेली लगबग कायम बघतात म्हणून आशिष शेलार मुंबईकरांना भाजपचा मोठा नेता म्हणून मनापासून आवडतात. महत्वाचे म्हणजे कुठे थांबायचे आणि कुठे झेप घेऊन भरारी घ्यायची हे आशिष यांना राजकारणातले नेमके हे गणित कळत असल्याने त्यांनी स्वतःचा कधीही एकनाथ खडसे करवून घेतला नाही. मागल्या विधानसभेला विरोधकांनी जंग जंग पछाडले वरून आशिष अख्ख्या मुंबईतल्या निवडणूक प्रचारात व्यस्त आणि त्रस्त तरीही मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली नाही आणि आशिष यांची जात व त्यांचा पक्ष न बघता आशिष यांना थेट 26000 मताधिक्याने निवडून दिले. असा हा आमचा भन्नाट आमदार आणि माजी नामदार. त्यांना पुन्हा एकवार शुभेच्छा !!
तूर्त एवढेच : हेमंत जोशी