फडणवीस आणि खडसे नेते ऐसे
—पत्रकार हेमंत जोशी
चंद्रकांत पाटलांना मी त्यांच्या अगदी तरुण वयापासून ओळखतो आणि बघतो. जेव्हा मी जळगाव जिल्ह्याचा काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा हेच चंद्रकांत पाटील जळगाव जिल्ह्यात विद्यार्थी संघटना एवढ्या दूरवर म्हणजे थेट कोल्हापूरवरून येऊन जळगाव जिल्ह्यातली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद घट्ट रोवण्यात अग्रेसर होते. त्यांच्या दिसण्यावर बोलण्यावर बघण्यावर हसण्यावर रुसण्यावर अजिबात जाऊ नका हा नेता साऱ्याच बाबतीत कदाचित वाटतो बावळा परी त्याच्या अंतरी ज्या नाना कला व कळा आहेत त्या अत्यंत बेरकी जिद्दी चलाख नेत्याला अगदी सहज मागे टाकणाऱ्या आहेत हे कायम लक्षात ठेवा माझे हे वाक्य आजच जसेच्या तसे लिहून ठेवा. चंद्रकांत पाटील जरी आत आणि बाहेर प्रत्येकाला पुरून उरणारे नेतृत्व असले तरी त्यांचे त्यांच्या नेत्यावर म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर असलेले प्रेम व श्रद्धा यावर देखील करावे तेवढे कौतुक कमी आहे अन्यथा चंद्रकांत पाटील हे नरेंद्र मोदी आणि विशेषतः अमित शाह यांना फडणवीस यांच्यासारखेच जवळचे असल्याने त्यांना देखील एकनाथ खडसे पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना कायम राजकीय त्रास व जाच नक्की देता आला असता पण असे कधीही घडले नाही किंबहुना चंद्रकांत पाटलांची वेळोवेळी फडणवीसांना भरभक्कम मिळणारी साथ व दाद त्यातून फडणवीस यांना त्यांच्या भाजपामध्ये व राज्यात इतरत्र पुढे जाणे प्रभाव टाकणे प्रभावी ठरणे बरेचसे सोपे झालेले आहे. अन्यथा स्वतः देखील महत्वाकांक्षी असलेल्या चंद्रकांत पाटलांना राज्यातल्या त्यांच्या इतर नेत्यांसारखा फार मोठा मानसिक त्रास फडणवीसांना नक्की देता आला असता मात्र ते त्यांनी आजतागायत कधीही केले नाही म्हणून पाटलांना त्यांच्या भाजपामध्ये आजही मोठे मानाचे स्थान आहे….
जे चंद्रकांत पाटलांना आणि विनोद तावडे आशिष शेलार विशेषतः पंकजा मुंडे इत्यादी नेत्यांना जमले म्हणजे त्यांनी जसे दोन पावले मागे सरून आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे जसे मान्य केले नेमके तेच एकनाथ खडसे यांना न जमल्याने त्यांना शेवटी भाजपा सोडावी लागली, उतारवयात नको तेवढा मानसिक ताण व त्रास सहन करावा लागतो आहे. ज्या महाआघाडीसाठी एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश घेतला तीच महाआघाडी आता त्यांना फार मोठा मानसिक त्रास त्या जळगाव जिल्ह्यात देते आहे म्हणजे खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर हा पक्ष अधिक बळकट करतील असे जे शरद पवारांना आणि त्यांच्या नेत्यांना वाटले होते नेमके विपरीत खडसे यांच्या येण्याने जळगाव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी मध्ये घडते आहे. अलीकडे जळगाव शहरातल्या राष्ट्रवादी मध्ये विशेषतः मराठा गटाचे जे फार मोठे राजीनामा नाट्य घडले त्यातून राष्ट्रवादीने स्वतःचे मोठे नुकसान व खडसे यांना शह असे समीकरण घडवून आणले आहे. हे राजीनामा नाट्य सरत नाही तोच दस्तुरखुद्द एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर या बालेकिल्ल्यात तेथल्या शिवसेनेच्या आमदाराने म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी दुसरा मोठा झटका थेट त्यांच्या या महाआघाडीच्या मोठ्या नेत्याला म्हणजे खडसे यांना दिला आहे. पहिला झटका तर मोठा होता म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी थेट खडसे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच कन्येला म्हणजे रोहिणी खडसे यांना आमदारकीला पराभूत करून तसेही खडसे यांचे जिल्ह्यातील व मतदारसंघातील महत्व बऱ्यापैकी खिळखिळे करून ठेवलेले होते आणि आता तर अगदी अलीकडे खडसे व पाटील या द्वयीनीं महाआघाडी बळकट कारण करण्यात रस घेण्यापेक्षा तीच अधिकाधिक खिळखिळी करण्याचा सपाटा लावला आहे म्हणजे महाआघाडीच्या या आमदाराने चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांचे तब्बल 12 नगरसेवक पक्षांतर करून खडसे गटाकडून आपल्या गटात खेचले आणले आहेत…
विशेष म्हणजे शिवसेनेच्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे गटाचे खडसे याचे नेतृत्व मानणारे तब्बल 12 नगरसेवक मुक्ताईनगर व बोदवड पालिकेतून स्वतःकडे खेचले त्यावर तोडीस तोड उत्तर म्हणून याच एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदसरसंघातील सेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांना राष्ट्रवादीत आणून या नेत्याने आपल्याच महाआघाडीला विशेषतः शिवसेनेला मोठा झटका दिला आहे त्यामुळे भाजपा राहिली बाजूला पण खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आता राष्ट्रवादीचा देखील याच जळगाव जिल्ह्यातील पूर्वीचा भाजपा झाला आहे, खडसे आपलीच महाआघाडी व राष्ट्रवादी देखील खिळखिळी करण्यात अधिक मग्न आहेत असे चित्र निदान आज तरी निर्माण झाले आहे ज्याचा मोठा फायदा भाजपा घेऊ शकते. चोपडा हा विधान सभा मतदार संघ राखीव झाल्यानंतर आपल्याला संधी नाही हे बघून त्यावेळी स्थानिक प्रभावी नेते शिवसेनेचे कैलास पाटील यांनी थेट जळगाववरुन तेथल्या सुरेशदादा जैन यांना टक्कर देणार्या चंद्रकांत सोनावणे यांना आयात केले त्यांना सेनेची उमेदवारी दिली आणि मेहनत घेऊन त्यांना निवडून आणले आमदार केले पण दादा असलेले चंद्रकांत सोनवणे देखील जेव्हा चोपडा मतदार संघात स्वतःचे वेगळे असे अस्तित्व निर्माण करून मोकळे झाले विशेष म्हणजे दुसऱ्यांदा याच चंद्रकान्त सोनवणे यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे लताताई सोनवणे यांना देखील आमदार म्हणून निवडून आणले तेथे नेमके माजी आमदार कैलास पाटील मनातून मनापासून दुखावले आणि राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांना जाऊन अलीकडे बिलगले, पाटलांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला थोडक्यात हे असे पडापडीचे व पाडापाडीचे मोठे राजकारण खडसे यांच्या महाघाडीत येण्याने याच महाआघाडीत सतत घडते आहे ज्याचा मानसिक धक्का उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना बसला आहे. खडसे म्हणजे हम करेसो कायदा आणि हे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रभावी व पवारांच्या पाठीराख्या मराठा नेत्यांना व मराठा कार्यकार्त्यांना मान्य नसल्याने या जिल्ह्यात पुन्हा एकदा लेवा पाटील विरुद्ध मराठा पाटील अशी लढाई त्या महाआघाडीत जोरात सुरु झालेली दिसते ज्याचा फायदा बेसावध न राहता भाजपाने घेणे अधिक उचित ठरेल. गिरीश महाजन तसे घडवून आणण्यात कितपत यशस्वी ठरतात, बघूया…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी