आडनाव लहाने पण कीर्ती महान…
—पत्रकार हेमंत जोशी
न्यायधीश आडनावाचा माणूस मी कोर्टात पट्टेवाला म्हणून बघितला आहे. वयाच्या अगदी सत्तराव्या वर्षी मी छोटू या टोपणनावाची कितीतरी माणसे बघितली आहेत. आमच्या शेजारी थेट सोना नावाची बाई मोलकरीण म्हणून काम करते. माझ्या ओळखीच्या नागवेकर आडनावाच्या बाई कायम अंगभर कपडे घालून वावरतात. घरात समोरून साधे झुरळ आले तरी आमचे आधीचे शेजारी वाघमारे काका त्यांच्या तरुणाईने मुसमुसलेल्या मोलकरणीला बिलगून मोकळे व्हायचे. सुलोचना तिरळी बघते कोकिळा बाईंचा आवाज घोगरा आहे. श्रावण नावाच्या माझ्या पुण्यातल्या ओळखीच्या गृहस्थाने पत्नी सीतेच्या सान्गण्यावरून स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले होते. रामाची भूमिका गाजवणारा एक प्रसिद्ध अभिनेता फार पूर्वी वर्सोव्याला आमच्या मोहल्ल्यात राहायचा आणि संध्यकाळ झाली रे झाली कि अख्खा खंबा घेऊन बसायचा. या राज्यात एका नेत्याला ज्यांना त्यांच्या आयुष्यभर गांधी म्हणून ओळखले गेले त्याच नेत्याचा मुलगा दररोज आजही गटारात पडेपर्यंत दारू ढोसतो. थोडक्यात नावात आडनावात काहीही नसते अनेकदा त्यात टोकाची भिन्नता असते. डॉक्टरांना तात्याराव हे नाव त्यांच्या एकंदर शरीरयष्टीवरून तंतोतंत लागू पडते पण लहाने आडनाव त्यांना अजिबात न शोभणारे. आडनाव तेवढे लहाने पण माणूस जगभर गाजलेला डोळ्यांची डॉक्टरकी गाजवून सोडणारा हा पद्मश्री. या राज्यात डॉ. तात्याराव लहाने यांना न ओळखणारा माणूस विरळा किंवा पक्का माणूसघाणा. तात्याराव यांच्यावर आजपर्यंत प्रचंड छापून आले असल्याने किंवा अगदी सिनेमा देखील निघाला असल्याने येथे या ठिकाणी केवळ चार ओळीत मी लिखाण करणे म्हणजे ओटीत भेट म्हणून आलेल्या ब्लाउज पिसच्या भरवशावर मित्रवर्य उदय तानपाठक यास अंडरवेअर शिवून घे असे सांगण्यासारखे किंवा मुकेश अंबानी यांच्या द्वितीय मुलास, किती वाळलास रे, असे म्हणण्यासारखे किंवा उदय सामंत यांना त्यांच्या वडिलांनी अण्णा यांनी, केवढे रे केस वाढवून ठेवले जा हजामत करून घे, असे सांगण्यासारखे….
माझ्यासाठी गौरी गणपती आणि दिवाळी लक्ष्मी पूजन म्हणजे वर्षभरातले सर्वाधिक महत्वाचे सण म्हणजे मी कंजूष म्हणून ओळखल्या जात असतानाही आमच्या घरातल्या गौरी गणपतीला रात्री किमान एक वाजेपर्यंत त्यादिवशी जेवणावळी सुरु असतात पण कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे म्हणावा तसा हा दिवस मला आमच्या सर्वांच्या मनासारखा साजरा करता आलेला नाही तरीही यावेळी केवळ एका फोनवरून खुद्द पदमश्री डॉ. लहाने आमच्या घरी दर्शनार्थ आले आणि आम्हा सर्वांना अत्यानंद देऊन गेले. एखाद्याशी ओळख असो अथवा नसो डॉ. लहाने एखाद्याशी बोलतांना समोरच्याला उगाचच वाटत राहते कि एवढे मोठे तात्या मला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखीचे आहेत एवढे ते मनमोकळे आणि बोलताना क्षणार्धात समोरच्याला आपलेसे करून घेणारे. म्हणूनच मी ते घरी आले असतांना माझ्या एका देखण्या मैत्रिणीला गच्चीवर लपवून ठेवले होते, आर आर आबांची देखील वागण्या बोलण्याची पद्धत हि अशीच होती ते शरद पवारांची पहिले आणि शेवटचे मोठे असेट होते. माणसाने माणूसघाणे असू नये अशी माणसे देवाने आपल्याकडे लवकर ओढून नेलेली बरी. डॉ. लहाने गौरी गणपतीला आले आणि पुढल्या काही मिनिटात त्यांच्या समोर बसलेल्या साऱ्याच अनोळखींना जुन्या जवळच्या मित्रासारखे वाटले भासले. संपत्ती सौंदर्य सत्ता या साऱ्यांचा अस्त ठरलेला पण डॉ. लहाने कायम जमिनीवर घट्ट पाय रोवून असल्याने आजही ते त्यांच्या निवृत्तीनंतर सर्वांना भेटणाऱ्यांना हवेहवेसे असतात त्यांच्या सान्निध्यात काही क्षण निदान घालवावेत हे अगदी एखाद्या खडूस व्यक्तीला देखील सतत कायम वाटत राहते. सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी मग तो कोणत्याही पदावर असला तरी त्याने अधिकार प्राप्त होताच माजून जाऊ नये. त्याचे पुण्य मग पुढल्या पिढीला आपोआप मिळत राहते.अगदी वाकून नमस्कार डॉ. लहाने यांच्या वागण्या बोलण्याला आणि कर्तुत्वाला…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी
खालील फोटोत डॉ. लहाने समवेत विक्रांत, मी, यशस्वी बांधकाम व्यावसायिक अनिल कुलकर्णी व त्यांचे कर्तबगार चिरन्जीव ऋषी कुलकर्णी…