माझे विचार आजचा सुविचार
–पत्रकार हेमंत जोशी
अनेक बहुतेक ओळखणारे सारेच मला म्हणतात कि तुम्ही प्रत्यक्षात असलेल्या वयापेक्षा लहान तरुण आहेत असे सतत तुमच्याकडे फोटोत किंवा प्रत्यक्ष देखील बघतांना वाटत राहते. सौंदर्य आणि श्रीमंती याचा कोणालाही गर्व असता होता कामा नये हे झाले महत्वाचे पण वयापेक्षा अधिक तरुण राहायचे दिसायचे असेल तर सतत सगळीकडे सर्वांकडे आपण सकारात्मक नजरेनेच बघायला हवे, मी व्यावसायिक कर्तव्य म्हणून लिखाणातून टीका करतो पण नंतर मनात ज्यावर टीका केली किंवा ज्याने तुमचे वाईट चिंतले तुम्हाला अपमानित केले फसविले डिवचले दुखावले धोका दिला लबाडी केली पाठीत खंजीर खुपसला अशा कोणत्याही व्यक्तीविषयी माझ्या मनात राग द्वेष तिरस्कार चीड किंवा बदला घेण्याची अजिबात कधीही कोणतीही भावना नसते. याउलट मी घरचा असो कि बाहेरचा त्या त्या वेळी हाच विचार करतो कि आपले अधिक चुकले असावे म्हणून अमुक तमुक व्यक्तीने आपल्याला मानसिक त्रास दिला असावा. डोक्यात सतत चांगले काहीतरी घडवून आणण्याचे विचार त्यामुळे रात्री मी फार लवकर झोपतो आणि सकाळी खूप लवकर उठतो, काहीही झाले आणि कितीही काम असले तरी दिवसभरात शक्यतो सकाळीच एक तास फिरायला जातो आणि फिरायला जाणे जमले नाही तर घरी ट्रेड मिल आहेच. व्यसनांपासून दूर, शुद्ध शाकाहार आणि पंधरा दिवसातून एकदा कधीतरी जगातल्या महागड्या दारूचा एक पेग सतत पर्यटन आणि व्यावसायिक व्यस्तता, मन फ्रेश राहते त्यातून वयानुपरत्वे जडलेल्या रोगांवर मात करता येते आणि आपले अद्याप काहीच वय सरले नाही असे मनाला सतत वाटत राहते. असे म्हणतात कि जे प्रकृतीविषयी जागरूक असतात किंवा जे लफ़डीबाज असतात ते कायम तरुण राहतात दिसतात, लफडी करण्याचे हे नक्की वय नाही आणि आपणहून संधी चालून आली तर सोडायची पण नाही. जबरदस्तीने साखर कोणी तोंडात टाकली तर ती कडू लागत नाही आणि गोडव्याचा आनंद घेणे त्यात वाईट ते काय ? गम्मतीचा भाग सोडा पण आजपासून तुम्ही देखील चिडचिड करणे किंवा मनात एखाद्याविषयी राग द्वेष बदला घेण्याची भावना ठेवणे हे सारे सोडून द्या. एखाद्याने केलेल्या उपकारांची जाणीव नक्की ठेवा किंवा अमुक एखाद्याने त्रास दिला कि त्याचे वाईट होईल वाटोळे होईल असेही कधी कोणलाही म्हणू नका कारण श्याप परमेश्वराचे लागतात आणि आपण देव नक्की नाही. माझ्यासारखे अति हळवे नक्की राहू नका पण इतरांच्या मनाला त्रास होईल असे कधीही वागू नका अन्यथा देवाची काठी पाठीत बसल्याशिवाय राहत नाही, मनाला पाझर फुटेल किमान असे तरी आपले वागणे बोलणे असावे म्हणजे तारुण्य नक्की तुमच्याकडे चालून येईल आणि भोग भोगणे अधिक सोयीचे होईल. पूर्वी फियाट कार्स असायच्या त्या बाहेरून चकचकीत दिसायच्या पण प्रत्यक्षात हॉर्न सोडून इतर सारे काही कसे वाजते हे त्या त्या फियाटच्या मालकालाच नेमके माहित असायचे, माझ्यासारख्या वयापेक्षा लहान दिसणाऱ्या किंवा वयापेक्षा अधिक तरुण वाटणार्या व्यक्तींचे हे असेच पूर्वीच्या त्या फियाट गाडीसारखेच नक्की असते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी