शॉकिंग ! मी वाचले ऐकले भोगले तुम्ही वाचले का ?
—-पत्रकार हेमंत जोशी
गेले काही दिवस लिखाणाचा मूड लागत नव्हता, नेहमी तेच ते, म्हणाल तर कंटाळा आला होता म्हणाल तर आळस चढला होता पण सतत ४१ वर्षानंतर आजही नेहमीच्या उत्साहाने लिखाण करावेच लागते कारण दर महिन्याच्या ५ आणि २० तारखेला माझ्या ऑफ द रेकॉर्ड या पाक्षिकाचे हजारो अंक मला वर्गणीदारांना आणि पाठीशी भरभक्कमपणे उभे असलेल्यांना पोस्टामार्फत पाठवावेत लागतात त्यामुळे लिखाण हे मंथली पिरियड्स येण्या आधी काही तास होणाऱ्या पोटदुखी सारखे असते जे सहन करावेच लागते. मला दिवसभरात सांगणारे अनेक भेटून म्हणतात कि तुम्ही आत्मचरित्र लिहा, मला देखील ते नक्की केव्हातरी एकदा लिहायचे आहे पण हिम्मत यासाठी होत नाही कि माझ्याकडून आजतागायत कधीही खोटे लिखाण झाले नाही आणि तद्दन आत्मचरित्र तर केवळ आत्मस्तुती करणारे बहुतेकवेळा स्वतःची खोटी स्तुती किंवा इतरांची विनाकारण निंदा करणारे असते जे माझ्याकडून अजिबात घडणार नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे काही प्रमाणात माझे आजवरचे लिखाण जे तुम्ही बारकाईने वाचले असल्यास ते देखील जणू माझ्या आत्मचरित्राचा एक भाग असतो, असे मला येथे मुद्दाम नमूद करायचे आहे कारण माझे लिखाण हे कोणत्याही साहित्य प्रकारातले नसते तेवढा मी विद्वान देखील नाही तर माझे लिखाण हे तुमच्याशी मी प्रत्यक्ष बोलतो आहे पद्धतीचे बोलीभाषेतले असते, वाचकहो, मी सत्य तेवढे लिहीन भलेही त्यात माझी किंवा माझ्या काही जवळ असलेल्यांची बदनामी झाली तरी. बघूया सत्य तेवढे लिहिण्याची हिम्मत अंगात केव्हा संचारते ती, महत्वाचे म्हणजे आत्मचसरित्रात जे तुमच्या अगदी जवळचे असतात त्यांचाच प्रामुख्याने उल्लेख येतो त्यामुळे अशा जवळच्या मंडळींचे आलेले नेमके अनुभव कथन करण्याची हिंम्मत माझ्यात येईल का, हा देखील माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. माझे आत्मचरित्र किती व कसे सत्य आणि कडवट असेल त्यावर माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगून आत्मचरित्र विषय तूर्त बाजूला ठेवतो…
दहावीनंतर दारिद्र्यावर मात करण्यासाठी झटपट काय करता येईल त्यावर दूरदृष्टी असलेले वडील म्हणाले विषय तुझ्या साठी खूप खूप कठीण आहे पण तू इंग्रजी शॉर्टहँड शिक कारण चांगली व पटकन सरकारी नोकरी त्यामुळे तुला मिळू शकते आणि मी काही झाले तरी यश मिळवायचे मनाशी खूणगाठ बांधून खेड्यातून थेट अकोला शहरात शॉर्टहँड शिकायला आलो, रमेश मराठे यांचा शॉर्टहँड क्लास स्वच्छ ठेवणे त्यांची बोलणी खाणे आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून उत्तम तेही फुकटात शॉर्टहँड शिकणे, माझा दिनक्रम सुरु झाला. माझी राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था जुन्या शहरात नातेवाईक मधुकरराव वैद्य यांनी केली, वैद्य दाम्पत्य मला पोटच्या मुलासारखे वागवायचे, ते पहिल्या माळ्यावर राहायचे आणि खालच्या माळ्यावर त्यांचे चुलत भाऊ राहायचे ज्यांना सुहास नावाचा अनौरस भाचा होता जो मनोहर पांडे नावाच्या श्रीमंत गृहस्थाकडून वैद्य यांच्या घरातील तरुणीच्या पोटी तिने लग्न न करता तेही त्याकाळी जन्माला घातला होता, सुहासला आपल्या अनौरस बापाकडून प्रचंड मालमत्ता मिळालेली होती त्यामुळे त्याचे वागणे अतिशय उन्मत्त असे होते. माझे चांगले चालले होते हे त्या सुहासला सहन होत नव्हते, काही महिन्यानंतर याच सुहासने कुठलेसे निमित्त काढून एक दिवस सर्वांदेखत माझ्या थोबाडात ठेऊन दिली वरून आमच्या इमारतीतुन चालता हो, असेही हा अनौरस सुहास मला म्हणाला, त्याच्या दादागिरीपुढे मला तेथून लगेच बाहेर पडावे लागले मात्र निघतांना मी त्याला एवढेच म्हणालो, एक दिवस मी तुला नक्की खूप पुढे जाऊन दाखवीन, पुढे काय घडले तो इतिहास तुमच्यासमोर आहे पण सुहासचे मात्र काय झाले, हाही इतिहास आणि वर्तमान लक्षात घेण्यासारखे आहे. सुहासने बाप कमाईवर स्वतःचा कसला तरी व्यवसाय सुरु केला ज्यात त्याने सारे काही गमावले आणि तो रस्त्यावर आला. आज हाच सुहास पाण्डे नावाचा अनौरस गृहस्थ अचलपूर येथे माधुकरी मागून किंवा तोडकी मोडकी भिक्षुकी करून कसेतरी दिवस काढतो आहे, महत्वाचे म्हणजे त्याचे अर्धे शरीर अर्धांगवायूने पीडित झाल्याने अक्षरश: लुळे पडले आहे. पण वाचकांनो हेही लक्षात ठेवा कि मी एक बोट एकेकाळी उन्मत्त असलेल्या सुहास मनोहर पांडे नावाच्या अनौरस गृहस्थाकडे दाखवत असतांना माझी तीन बोटे स्वतःकडे आहेत हे मी देखील विसरता कामा नये म्हणजे मी जर सुहास पद्धतीचे उर्मट वागणे कंटिन्यू केले असेल तर तो देव मला देखील नक्की सोडणार नाही त्यामुळे सुहास किंवा त्याच्यासारखे माझ्या आयुष्यात आलेले असे नालायक किती वाईट हे येथे सांगण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा मला माझ्या यशाची रेषा मोठी काढता येईल का माझे लक्ष किंवा प्रयत्न त्याकडे असतात असतील. असे नालायक सुहास प्रत्येक गरीबाच्या आयुष्यात येत असतात जे तुमच्या आमच्या मनावर हृदयावर खोलवर जखम करून निघून जातात, हरकत नाही, आपल्यासाठी तो मोठा अनुभव असतो, आपण दुबळे म्हणून त्या त्यावेळी अशा नीच लोकांकडून थोबाडात खाऊन घेतो तो अपमान सहन करतो पण एक दिवस आपलाही येईल हि जिद्द मनात ठेऊन पुढे पाऊल टाका, यश नक्की मिळेल. अत्यंत महत्वाचे म्हणजे, कधीही एखाद्या गरीबाच्या गरिबीच्या थोबाडात मारू नका कारण त्या गरिबांचे शाप तुमचाही एक दिवस नक्की सुहास करतील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी