फाल्तुक फंडे भगिनी मुंडे : भाग दुसरा : पत्रकार हेमंत जोशी
एखादा कार्यकर्ता सुरुवातीला सामान्य असतो पण आक्रमक असतो त्यामुळे या आक्रमकतेतून तो पुढे नेता होतो पण जेव्हा तो मोठा नेता होतो अमुक एका पदावर आरूढ होतो त्यानंतर तो लगेचच आपल्यातल्या आक्रमकतेचा गैरफायदा फक्त आणि फक्त पैसे कमावण्यासाठी करतो जे अत्यंत दुर्दैवी आहे. गप्पांच्या ओघात एक बडे पोलीस अधिकारी मला तेच म्हणाले कि नेत्यांच्या पायावर कितीतरी पैसे अनेक ठेवून जातात त्यांना एक्स्ट्रॉ भ्रष्टाचार करण्याची खरे तर गरजच नसते पण विकृत मोह त्यांना आवरत नाही. नेत्यांनी जर मर्यादित स्वरूपात काळी कमाई केली तर अधिकाऱ्यांना देखील वचक असतो बसतो आणि तेही मग चांगली कामगिरी करवून दाखवू शकतात. खरे आहे हे. या राज्यातला कोणताही आक्रमक नेता नजरेसमोर आणा, तुमच्या ते लक्षात येईल कि या सर्वांनी आपल्या आक्रमकतेचा गैरफायदा केवळ पैसा मिळविण्यासाठीच करवून घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात मला हे जाणवले कि अचानक रत्नागिरी जिल्ह्यातले भास्करराव जाधव सभागृहात अत्यंत आक्रमक झाले आहेत थोडक्यात त्यांना हे कदाचित उद्धव यांना दाखवून द्यायचे आहे कि तुमच्याकडे कोकणात त्या उदय सामंत व्यतिरिक्त मी पण आहे म्हणजे मला जर तुम्ही संधी दिली तर मी पण उदय सामंत यांच्या चार पावले पुढे आहे. झाले काय भास्कर जाधव हे नक्कीच एकेकाळी कोकणातले काय राज्यातले लोकमान्य नेते म्हणजे ज्या दोघांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी कानाकोपऱ्यात नेली त्यापैकी एक बबनराव पाचपुते आणि दुसरे नक्कीच भास्करराव जाधव पण या दोघांच्या धरसोड वृत्तीने त्यांचा राजकीय घात केला अनेकदा पैशांचा मोह पण या दोघांना आवरला नाही आणि कुठल्याही एका पक्षात जर भास्करराव जाधव टिकले राहिले असते तर आज उदय सामंत यांच्या कितीतरी पुढे निघून गेले असते, आज ते फारसे कुठेही नाहीत, नशीब ते यावेळी आमदारकीला निवडून आले त्याचवेळी उदय कासव गतीने मोठ्या खुबीने प्रत्येकाशी मधुर संबंध ठेवून कुठल्या कुठे निघून गेले. विशेष म्हणजे यादिवसात एकाचवेळी अनेकांना म्हणजे बाळ माने विनोद तावडे आणि भास्करराव जाधव या एकमेकांचे जवळचे नातेवाईक असलेल्यांना तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे मध्येच पालकमंत्री म्हणून घुसलेल्या अनिल परब आणि त्यांना खूप जवळचे असलेल्या विनायक राऊत यांना देखील उदय सामंत यांनी मिळविलेले यश पचेनासे नक्की झालेले आहे पण हे सारे नेते एकीकडे आणि उदय यांची काम करण्याची अनोखी पद्धत एकीकडे त्यामुळे ते थेट मातोश्री वरील प्रत्येक कुटुंब सदस्यांचे लाडके आवडते आहेत, थेट उद्धव यांचे गळ्यातले ताईत आहेत त्यांनाही फार जवळचे आहेत म्हणजे उद्धव यांना उदयजींना कडेवर घेऊन मिरवून व फिरवून आणावेसे वाटते त्याचवेळी उदय जणू तारुण्याच्या बाबतीत आपल्याही पेक्षा दोन वर्षांनी लहान म्हणून आदित्य यांना देखील उदय यांना बघताच उचंबळून भडभडून येते. वरकरणी उदय एखाद्या लहान मुलासारखे बागडणारे, जमिनीवर जणू गडाबडा लोळणारे पण जेव्हा केव्हा राजकीय चाली त्यांच्यावर थेट चाल करून येतात हेच उदय त्या आपल्या जादूभरी किमयेने लीलया परतवून लावतात. आराम करणे त्यांना ठाऊक नाही, साहेब झोपले आहेत किंवा बाईसाहेबांबरोबर आराम करीत पहुडले आहेत असले निरोप बाहेर वाट पाहणाऱ्यांना कधी ऐकावे लागत नाहीत त्यामुळे जो त्यांना भेटेल त्यांचे पटकन काम होते आणि उदय विरुद्ध घरचे दारचे सारे तरी उदय पुरून उरतात, हसत खेळत कामांचा रेटा पुढे घेऊन जातात…
जी चूक धनंजय मुंडे करीत नाहीत म्हणजे फारसे कधी आगाऊ बोलत नाहीत नेमक्या बोलण्याच्या खडसे पद्धतीच्या चुका प्रीतम कमी पण पंकजा अधिक करतात आणि त्यांनी व त्यांच्या बापाने कमावलेली पुण्याई व सिम्पथी विनाकारण क्षणार्धात गमावून बसतात, दिल्लीहून परतल्यानंतर त्या असेच चुकीच्या पद्धतीने मीडियासमोर बोलल्या आणि नरेंद्र मोदी जे बोलले म्हणजे तुम्ही खूप बोलता ते येथे परतताच पुन्हा एकवार सिद्ध केले. पंकजा म्हणाल्या कि माझे नेते फक्त शाह आणि मोदी म्हणजे राज्यातल्या इतर नेत्यांना त्यांनी कस्पटासमान मानले असा सरळ अर्थ त्यातून निघतो आणि पुन्हा एकवार त्या राज्यातल्या इतर नेत्यांचे प्रेम आदर सिम्पथी सारे काही गमावून बसतात. हे साऱ्यांनाच मान्य आहे कि मोदी आणि शाह त्यांचे नेते आहेत पण राज्यात मुनगंटीवार शेलार लोढा दानवे गडकरी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस इत्यादी भाजपामध्ये असे काही नेते आहेत ज्यांच्या प्रेमाशिवाय पाठिंब्याशिवाय सहकार्याशिवाय प्रीतम आणि पंकजा यांना सत्तेत म्हणा मतदारसंघात म्हणा पक्षात म्हणा पुढे निघून जाणे शक्य आहे म्हणून त्यांनी वाट्टेल ते बोलण्याची चूक करून अप्रत्यक्ष आपल्या नको त्या बोलण्याचा फायदा विरोधातल्या भावाला करवून देऊ नये. राजकारणात योग्य वेळी आवश्यक तेवढेच बोलायचे असते, नेता मग तो कोणत्याही पक्षातला असो ज्याने वायफळ बडबड केली किंवा आपल्याच नेत्यांना ज्यांनी फाट्यावर मारले असे उथळ नेते मग झपाट्याने बाजूला फेकल्या गेले, कोणतेही असे नाव नजरेसमोर आणा आणि माझे वरील वाक्य पडताळून पहा. धनंजय याने तुम्हाला आधी आमदारकीला पराभूत केले नंतर ते महाआघाडीत मंत्री होताच त्यांनी आपला मतदार संघ अधिक बळकट केला त्यावर पकड घट्ट केली त्यामुळे यापुढे धनंजय यांचे महत्व कमी करून पुन्हा सत्तेत कोणत्याही मार्गाने येणे त्यासाठी पंकजा यांना राज्यातल्या इतर प्रभावी नेत्यांचे सहकार्य घेणे खूपच गरजेचे आहे त्यांनी निदान यापुढे तरी बेरजेचे राजकारण करावे आणि आधी आपले स्थान पक्षात व मतदार संघात अधिक बळकट करावे…
क्रमश: हेमंत जोशी