एकनाथ खडसे इतरांना पडसे : पत्रकार हेमंत जोशी
अनेक कुटुंब वक्तशीर साचेबद्ध जीवन जगण्यात स्वतःला धान्य समजतात म्हणजे संध्याकाळी सात ऐवजी साडे सात वाजता जरी ते जेवायला बसले तरी त्यांना काहीतरी मोठा गुन्हा हातून घडल्याचा फील येतो. माझ्या ओळखीचे शिवाजी पार्क परिसरात गोखले कुटुंब आहे, एके सकाळी कुटुंब प्रमुख गोखले हृदय विकाराच्या झटक्याने गेले तरी घरातल्या इतर सदस्यांनी वॉक घेण्याचे टाळले नाही, रीतसर फिरून आले त्यानंतर नेहमीच चहा त्यानंतरच इतर गोखले पुढल्या तयारीला लागले. पुण्यातल्या नरवणे काकांना तर थेट यमराजाने येऊन सांगितले कि मी तुला उद्या सकाळी उचलतोय म्हणून काकांनी बायकोला सांगितले कि मी उद्या नसेल शेवटच्या प्रवासात असेल तेव्हा माझा भात लावू नको त्यावर नरवणे काकू म्हणाल्या काळजी नको तुमच्या पिंडांना उपयोगी पडेल. येथे त्या गमतीदार पत्रकार मित्राचे नाव सांगत नाही पण हा पठ्या मधुचंद्राच्या पहिल्या राती देखील आधी भीमरूपी आणि मारोती स्तोत्र वाचूनच नंतर पलंगावर आरूढ झाला होता किंवा माझ्या ओळखीतली एक मैत्रीण नेहमीसारखी संध्याकाळी तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराला एकांतात भेटून आली नंतरच ती नवऱ्यासंगे हनिमून साठी काश्मीरला निघाली. माझा एक मित्र एवढा देवभोळा आणि हनुमान भक्त आहे कि त्याने मधुचंद्र सुद्धा हनुमंताच्या मंदिरात बांधलेल्या धर्मशाळेत साजरा केला. आमच्या गावात एक मुख्याध्यापक होते प्रचंड शिस्तीचे म्हणजे त्यांनी आठवड्यातून पाच ऐवजी चुकून सहा वेळा बायकोची पप्पी घेतली तरी ते देवासमोर उभे राहून आपल्या हातांनी स्वतःच्या थोबाडात मारून मोकळे व्हायचे. हातून मोठी चूक घडली म्हणून त्यादिवशी संध्याकाळी उपवास करायचे. नाहीतर माझा बाप, पप्पी घेण्यासाठी प्रसंगी भिंतीवरून उडी मारून शेजारच्या घरी रात्री बेरात्री कडी वाजवायचा. आवडायची मला त्याची हि हिरोगिरी. सकाळी ज्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा सांगायला तो जायचा संध्याकाळी त्यांच्याच घरी चिकन खायला जायचा. त्याचा बिनधास्त स्वभाव माझ्यात अनेकदा डोकावतो. फादर्स डे निमित्त आज त्याची आठवण झाली आणि पटकन डोळ्यात अश्रू तरळले. राजकारण व्यवसाय नोकरी किंवा काहीही डावपेच न खेळता क्षेत्र मग ते कोणतेही असो त्यात नक्की यशस्वी होता येते असा माझा ठाम विश्वास आहे पण या तत्वावर एकनाथ खडसे यांचा अजिबात विश्वास नसावा त्यांच्या या सततच्या डावपेच खेळण्याने जळगाव जिल्ह्यातील विशेषतः खान्देशातील राजकारण ढवळून निघाले आहे, शरद पवारांनी उगाचच या संपलेल्या नेत्याला नवसंजीवनी दिली आणि राष्ट्रवादीत आणले असे आता जळगाव जिल्ह्यातले राष्ट्र्वादीतले जे मूळ पुरुष आहेत त्यांना मनापासून वाटायला लागले आहे. माझा पुढला व्यापक लेख नेमका जळगाव जिल्ह्यातल्या ढवळून निघालेल्या राजकारणावर लिहिल्या जाणार आहे, अवश्य वाचावा…
क्रमश: हेमंत जोशी