कोरोना कारणाने यावेळी नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही, त्याआधीच्या नागपूर अधिवेशनादरम्यान मी एका सकाळी राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी फेरफटका मारत असतांना सहजच राज्यमंत्री संजय राठोड यांच्या बंगल्यावर पोहोचलो, संजय बाहेर पडले होते पण विशीतली चुणचुणीत तरुणी एका घोळक्यात उभी राहून लोकांच्या समस्या ऐकून घेत होती, कुतूहलापोटी मी तिची विचारपूस केली, म्हणाली मी पूजा लहू चव्हाण, बीड जिल्ह्यातली भाजपा कार्यकर्ती आणि हो आमच्या बंजारा समाजाच्या समस्या पण सोडविण्यात आनंद घेते त्यात संजय राठोड आमच्या समाजाचे माझ्या खूप जवळचे त्यामुळे मी बंजारा समाजाच्या पण अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करते, मला कौतुक वाटले. तू राहते कुठे त्यावर ती म्हणाली आजतरी येथेच थांबलेली आहे मग पुन्हा केव्हातरी एकदा मला ती मुंबईत मंत्रालयात राठोड यांच्याच कार्यालयाबाहेर भेटली, गोड हसली. अशीच पुढे जा मी तिला कौतुकाने म्हणालो आणि पुढे गेलो. आणि ७ तारखेला मन सुन्न करणारी बातमी कानावर आली कि पूजाने ती ज्या ठिकाणी पुण्यात अलीकडे राहत होती त्या पॉश महागड्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. डोके बधिर झाले आणि पहिला विचार हाच मनात आला कि घरची आर्थिक परिस्थिती अतिशय सामान्य जेमतेम असतांना पूजाला या महागड्या इमारतींमधल्या सदनिकेत राहणे कसे परवडले म्हणजे कोण्या मंत्र्याची हि सदनिका आहे कि अन्य एखादा तिच्या जवळचा मंत्री या सदनिकेचे नियमित भाडे अदा करायचा, कि ती स्वतः कोणत्या आर्थिक उत्पन्नावर सदनिकेचे भाडे भरायची, तपास करणाऱ्यांना जर हे आत्महत्या कि खून प्रकरण खरेच मनापासून शोधायचे असेल तर तपास येथूनच सुरु करावा लागेल…
पूजा लहू चव्हाण हिने आत्महत्या का केली त्यावर फारशी चौकशी न करता तिचा अंत्यविधी पण पार पडला आणि जणू काही घडलेच नाही या अविर्भावात ज्या मंत्री संजय राठोड यांची ती अतिशय जवळची कार्यकर्ती होती किंवा त्यांच्या समाजाची ती उगवता तारा होती, त्यावर काहीही हालचाल संजय राठोड यांनी केली नाही आणि जणू काही घडलेच नाही पद्धतीने ते त्यांच्या कामाला लागले असावेत. पण मी मात्र मनातून अस्वस्थ होतो त्यामुळे मी हा खून कि आत्महत्या प्रकरण भाजपा नेत्यांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अतुल भातखळकर यांच्या कानावर घातले कदाचित तोपर्यंत त्यांना या खून कि आत्महत्या आणि जर आत्महत्या तर का, हे प्रकरण फारसे माहित नसावे पण १० फेब्रुवारीला हे अतिशय गंभीर प्रकरण मी त्यांच्या कानावर घातले आणि धावपळ सुरु झाली. बघूया, महाआघाडीच्या सत्तेत नेहमीप्रमाणे हेही प्रकरण दडपले जाते कि महत्वाकांक्षी कळीला म्हणजे पूजाला न्याय मिळतो. जी तरुणी वयाच्या केवळ १८ व्या वर्षी थेट मुंबई गाठून लोकांच्या समस्या सोडविते थेट नेतृत्व करते मंत्र्याकडे जाऊन लोकांच्या समस्यांचा पाठपुरावा करते ती धाडसी बोलकी महत्वाकांक्षी धडाकेबाज बंजारा तरुणी शंभर टक्के नक्कीच आत्महत्या करेल अजिबात मनाला पटणारे नाही. एक मात्र नक्की तिच्या जवळ असलेल्या मोबाईलचा योग्य दिशेने तपास होणे गरजेचे आहे म्हणजे तिचा नंबर कोणी व का ब्लॉक केला होता तिला भेटणे तर दूर पण साधे बोलणे देखील कोण व का टाळत होते, पोलिसांनी दबाव झुगारून शोध घेणे येथपासून सुरु केले कि आपोआप तिची झालेली व होणारी फसवणूक नक्की उजेडात येईल…
मला सर्वप्रथम नागपूरच्या नवराष्ट्र न्यूज नेटवर्क ने प्रसिद्ध केलेली पूजा लहू चव्हाण आत्महत्या कि खून हि बातमी पाठवण्यात आली त्यात त्यांनी स्पष्ट लिहिले आहे सांगितले आहे कि आत्महत्या केलेल्या पूजा हिचे विदर्भातील एका मंत्र्यांशी अफेअर होते आणि अलीकडे तर थेट वन मंत्री संजय राठोड यांच्याकडे बोट दाखविल्या जात आहे याचा सरळ अर्थ असा कि पूजा आत्महत्या कि खून प्रकरण नक्की नेमके प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संजय राठोड यांच्याभोवताली घुटमळते आहे कदाचित प्रेम प्रकरणातून घडलेले आहे अर्थात याविषयी लिखाण करण्यापूर्वी मी जेव्हा राठोड यांचे खासगी सचिव रवींद्र पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला त्यांनी मला सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली पण जेव्हा मी त्यांना काही नेमके पुरावे सांगितले मग हेच रवींद्र पवार पोपटासारखे बोलायला लागले ज्यात त्यांनी पूजा लहू चव्हाण कशी सतत मंत्र्याच्या जवळपास वावरणारी, मला मनापासून कबूल केले. माझी ती कार्यकर्ती होती तिच्याशी माझे प्रेम संबंध नव्हते हे सिद्ध करून वास्तविक राठोड यांनी त्यांच्या समाजाच्या या दिवंगत धडपड्या कार्यकर्तीला निदान मृत्यूपश्चात तरी न्याय मिळवून द्यावा कारण कदाचित मोठ्या दबावापोटी सारे काही इत्यंभूत माहित असून देखील लहू चव्हाण व त्यांचे धास्तावलेले कुटुंब काहीही बोलायला तयार नाही त्यामुळे संशयाचे वातावरण प्रखरतेने बळावले आहे. केवळ पहिल्या माळ्यावरून खाली उडी मारल्यानंतर जेथे साधी जखम देखील होत नाही तेथे या पूजाला कोणी मद्य प्रश्न करवून आधी खून करून वरून फेकून तर दिलेले नाही, महाआघाडी सरकारात निदान या अति गंभीर प्रकरणाचा तरी नेमका व योग्य तपास करायला व्हायला हवा…