मी शाळेत असतांना जरा अतीच होतो, अजूनही आहेच, पण तेव्हा मला आठवते त्याप्रमाणे शाळेतला, गावातला, कदाचित
पंच्क्रोशीतला सर्वाधिक आगावू विद्यार्थी म्हणून माझी अगदी सहज गिनीज बुकात नोंद झाली असती. मला पंडितराव पुराणिक म्हणून शिक्षक होते, आता ते निवृत्त आहेत. माझ्या आगावू स्वभावाचे आणखी एक गुपित सांगतो, मी पत्रकार म्हणून अभिनेता गोविंदासारखे वागलो, म्हणजे गोविंदाने काय केले, त्याने स्वत:चा असा अभिनय कधी केलाच नाही, त्याने इतर नावाजलेल्या, गाजलेल्या अभिनेत्यांची सतत हुबेहूब नक्कल केली, आणि तो प्रचंड यशस्वी झाला, मी पण तेच केले,
ज्यांच्या मी जवळून या ना त्या निमित्ताने संपर्कात आलो किंवा किमान त्यांनी केलेले लिखाण वाचले त्या सर्वांची म्हणजे भाऊ तोरसेकर, अनिल थत्ते, व.पु. काळे आणि आचार्य अत्रे यांच्या लिखाणाची, इत्यादी मान्यवर लेखकांची भ्रष्ट नक्कल केली आणि माझी गाडी निकल पडी. हे सारे लिखाणातले ‘ दिलीपकुमार ‘ होते, मी ‘ राजेंद्रकुमार ‘ झालो, आणि तुम्हाला ते ठाऊक आहेच, दर्शक राजेंद्रकुमारच्या सिनेमाला अधिक गर्दी करायचे…..
एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो, मला जे वाटते ते तुम्हालाही वाटते का,बघा, म्हणजे मला असे वाटते माझे जे अतिशय बुद्धिमान आई वडील होते,ते आज हयात नाहीत पण माझ्यासारख्या अल्पशिक्षित मुलाकडून ते वर स्वर्गात बसून लिहून घेत असावेत, अन्यथा जेमतेम दहावी पास माणसाला, विविध संदर्भ घेऊन उभ्या राज्याशी लिखाणातून पंगा घेणे अशक्य आहे.
नक्कीच आई वडिलांची अद्भुत शक्ती तुमच्याकडून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करवून घेत असावी, तुमचे मत अवश्य कळवा…तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आचार्य अत्रे यांचे दोन नातू माझे फेस बुक फ्रेंड्स आहेत, त्यातले एक हर्ष देशपांडे तर अमेरिकेतले अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत. अशी माणसे फेसबुक वर जरी फ्रेंड्स असलीत तरी वेगळे समाधान मनाला मिळते, आतून आनंद होतो….ज्यांची ज्यांची मी लिखाणात भ्रष्ट नक्कल करतो त्यातलेच एक माझे वर उल्लेख केलेले शिक्षक, श्रीयुत पुराणिक सर, आता ते जवळपास ८० आहेत पण मी त्यांच्या संपर्कात असतो, वडिलांशी गप्पा मारल्याचे समाधान मिळते. सर मला इंग्रजी शिकवायचे, एकदा मला त्यांनी विचारले, ज्या माणसाला ऐकू येत नाही, त्याला तू काय म्हणशील…? मी पडलो आगावू, पटकन उत्तरलो, काहीही म्हणा सर, त्याला कुठे ऐकू येते…..? याठिकाणी माझे दुसरे एक शिक्षक गोविंद देशपांडे असते तर त्यांनी माझा कान बधिर होईपर्यंत मारले असते पण पुराणिक सर स्वत: देखील विनोद सांगता सांगता अमुक एखादा धडा सोपा करून शिकवायचे, माझ्या या उत्तरावर ते दिलखुलास हसले आणि इतर विद्यार्थीही….अलीकडे खूप दिवसानंतर पुराणिक सरांना फोन केला असता ते म्हणाले, आपल्या शिक्षण संस्थने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली आहे आणि तालुक्यात गाजते आहे, खूप विद्यार्थी आहे, राज्यमंत्री रणजीत पाटील आमच्या पाठीशी उभे राहिले नसते तर हि शाळा उभी करणे कठीण गेले असते, मी मनोमन सुखावलो आणि मनातल्या मनात रणजीत पाटलांना धन्यवाद, अगदी मनापासून दिले. कारण आमच्या शाळेला आणि ती देखील रणजीत पाटीलांची मदत, हि बाब तशी एरवी मनाला फारशी हजम करणारी ठरली नसती कारण शाळा संघाची वरून बामणांची, आज जरी रणजीत, पाटील भाजपामध्ये असलेत तरी त्यांच्या घराण्याचा मूळ पिंड कॉंग्रेसचा, त्यामुळे सहसा अमुक एखादा कॉंग्रेस विचारांचा पाटील फारशा आस्थेने आमच्या शिक्षण संस्थेकडे बघत नसतो, पण रणजीत पाटील हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व त्यापलीकडे विचार करणारे, त्यांची आमच्या शाळेला त्या उदात्त विचारातून मदत झाली, त्यांचे आमच्या गावावर उपकार झाले….अमुक एखादे मंत्रिमंडळ नव्याने अस्तित्वात आले कि साधारणत: पहिल्या सहा महिन्यांत माझ्या ते लक्षात येते, मुख्यमंत्री नेमका कसा आहे आणि मंत्रिमंडळातील कुठल्या सदस्याचे काय भवितव्य असेल, आणि माझे अंदाज कधीही चुकलेले नाही, चुकत नाहीत, रणजीत पाटील हे अत्यंत, सर्वाधिक यशस्वी राज्यमंत्री असतील हे मी तुम्हाला पहिल्या सहा महिन्यातच लेखी म्हणालो होतो. नेमके घडले देखील तसेच, रणजीत पाटील राज्यमंत्री असूनही अतिशय लोकप्रिय आहेत, त्यांची काम करण्याची वेगळी अशी पद्धत आहे, जी सर्वांना भावते म्हणून त्यांच्याकडे लोकांचा, अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांचा, सर्व पक्षातल्या आमदारांचा, विविध विचारांच्या राजकीय नेत्यांचा, अडचणीत सापडलेल्या गावाकडल्या अगदी खेडूत लोकांचा, अधिकार्यांचा, प्रत्येक, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीचा अक्षरश: अवती भोवती लोंढा असतो, ते कुठेही असोत म्हणजे अकोल्यात त्यांच्या घरी किंवा कार्यालयात, येथे मंत्रालालयात किंवा त्यांच्या मुंबईतल्या घरी, किंवा अमुक एखाद्या जाहीर कार्यक्रमात, थोडक्यात रणजीत पाटील नजरेला पडले रे पडले कि त्यांच्या सभोवताली भीड इकठ्ठा होते,सतत सर्वसामान्य लोकांचा देखील गराडा असतो, शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत न थकता, न थांबता, रणजीत पाटील जातीने प्रत्येकाला अटेंड करतात आणि समाधान झाले कि चहा पाजून म्हणजे वर्हाडी आदरातिथ्य करून घरी जा आता, सांगतात. अनेकदा हे बघतांना असे जाणवते कि एखाद्या दिवशी रणजीतबाबू यांच्याकडे काम करणारे श्रीमान म्हस्के, चव्हाण, रुमाले इत्यादी कर्मचारी, अधिकारी बेशुध्द पडतात कि काय, कारण रणजीत पाटील यांना अंगात जणू समाजसेवा करण्याचा दैवी उत्साह संचारला आहे आणि तो त्यांच्या स्टाफच्या देखील अंगात शिरलेला असावा, त्यांना वाटत असावे, त्यातून ते त्यांच्याकडून देखील प्रचंड सहकार्याची अपेक्षा करतात आणि त्यांचा स्टाफ देखील अपेक्षाविरहित मिठाला जागतो….रणजीत पाटील हे तसे अकोला विदर्भातले अतिशय गाजलेले आणि नावाजलेले अस्थिरोग तद्न्य, त्यांची दररोजची डॉक्टर म्हणून प्रक्टिस काही लाखात असायची, पण त्यांच्या डोक्यात समाजसेवेचा किडा घुसला आणि सुखाचा जीव या अशा कटकटीत टाकून त्यांनी डॉक्टरी व्यवसायावर लाथ मारली, राजकारणात आले येथेही लगेच यशस्वी ठरले, पदवीधर मतदार संघातून निवडून आले, आमदार झाले आणि आता नामदारही…
अपूर्ण :