दोन तीन दिवस सतत मी माझ्या बेडरूम मध्ये शिरलो रे शिरलो कि दोन कावळे कर्कश ओरडून बेजार करायचे, खिडकीजवळ मी उभे राहण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करायचे,भटजींना फोन लावला, त्यांनी तुमचे पूर्वज अस्वस्थ आहेत म्हणून हे घडते आहे, सांगितले आणि उपाय सांगितले, खर्च सांगितला. जर मी अंधश्रद्धाळू असतो तर लगेच वेळ वय घालवून वर खर्च केला असता, जरा शोध घेतला, असे का घडते आहे, खरेच पूर्वज माझ्यावर नाराज असतील का, त्यावर, नंतर लक्षात आले, ते दोन कावळे म्हणजे तात्पुरते जोडपे होते, त्यांनी नुकताच पिल्लांना जन्म दिला होता, ती पिले माझ्या बेडरूमच्या वर जी पोकळी होती, तिथे खोपा करून ठेवली होती, मी त्या खोप्यावर हल्ला करेल त्या जोडप्याला वाटत होते म्हणून मी खिडकी जवळ जाण्याचा अवकाश, कावळे ओरडायचे…
ब्राम्हणांना त्यांच्या पूर्वजांनी जो सात्विक वारसा दिला, तो जपायला हरकत नाही पण या आधुनिक युगात थोतांड नको, लोकांना हे असे उगाचच काहीही सांगून पैसे मिळविणे नको. ब्राम्हण जगात जेथेही जातात, लाथ मारून पाणी काढतात, कुठल्याही क्षेत्रात यश मिळविणे त्यांना सहजशक्य असल्याने ज्यामुळे आपण बदनाम झालो, थट्टेचा विषय ठरलो, त्यापासून थोडेसे दूर जाणे केव्हाही उत्तम. अगदीच सारे सोडा म्हणजे भटजी, गुरुजी हा प्रकार बंद करा, म्हणू नये पण त्यातील जे काही प्रकार फसवे असतील, अशा प्रथा, असे प्रकार बंद व्हावेत. मित्रांनो, आम्हा ब्राम्हणांची एक गम्मत सांगू का, समजा अमुक एखाद्या तरुण भटजीचे महिन्याकाठी उत्पन्न लाखभर रुपये असेल, त्याला कोणीही पोटची पोरगी द्यायला तयार नसते पण अमुक एखादा तरुण एखाद्या खाजगी बँकेत अगदी कारकून म्हणून जरी नोकरीला असेल, त्याचे उत्पन्न जेमतेम
पाचपंचवीस हजारात असले तरी त्याच्या घरासमोर पोरींच्या पालकांची, मायबापांची रंग लागलेली असते. थोडक्यात, आजही आम्ही सारे ब्राम्हण नोकरी करणार्याला अगदी आनंदाने पोरगी देऊन मोकळे होतो पण उत्तम व्यवसायिक तरुणाला चिंता असते आपले लग्न होईल कि नाही आणि हे देखील घडायला नको. आधीच तसेही का कोण जाणे ब्राम्हण समाजात मुलींचे प्रमाण कमी आहे, त्यात तुम्ही इतर समाजातले, केवढ्या पोरींना गटवून घरी सून म्हणून नेलेले आहे. विशेषत: ग्रामीण भागातल्या ब्राम्हण व्यवसायिक तरुणांच्या लग्न समस्या मोठ्या गंभीर आहेत, फक्त ती मुलगी आहे, अशी खात्री पटली कि हे तरुण लग्नाला तयार होतात. एक गमतीदार प्रसंग आठवला. फार इस्ट ला असलेल्या देशांमध्ये गेल्यानंतर आंबट शौकिनांना अनेकदा हे कळतच नाही, समोरची व्यक्ती मुलगा आहे कि मुलगी, कल्याणकर आडनावाचा आमचा एक स्त्रीलंपट मित्र अनेकदा तिकडे जावून शेण खाउन येतो, एकदा तर संपूर्ण दिवस तो एका सुस्वरूप मुलीसंगे अख्खे Bangkok शहर फिरून आल्यानंतर त्याला रात्री फार उशिरा पलंगावर कळले कि ती मुलगी नाही, मुलगा आहे, मग सुटला हा सैरावैरा धावत…
ब्राम्हणांची थोडी तारीफ पण करून बघतो. आम्ही ब्राम्हण समाजातील इतरांच्या भूलथापांना शक्यतो कधीही बळी पडत नाही. या देशातले नेतृत्व हळूहळू लबाड आणि भ्रष्ट नेत्यांच्या हाती जाते आहे हे जेव्हा ब्राम्हणांच्या ध्यानात आले,विदर्भातील आम्ही ब्राम्हणांनी संघ आणि जनसंघाची स्थापना करून राजकारणात आणि समाजकारणात उडी घेतली. या देशातले पावित्र्य आणि संस्कार कायम जपले जावेत म्हणून गावोगावी त्याकाळी संघशाखा उघडून तेथे विविध जाती धर्माचे उत्तम स्वयंसेवक निर्माण केले. संघ जनसंघ हा केवळ शेठजी आणि भटजींचा पक्ष ओळखल्या जातोय हे जेव्हा ध्यानात आले, इतर समाजातील तरुण वर्गाला आकर्षित करून त्यांच्या हाती संघाने, जनसंघाने पुढे भारतीय जनता पक्षाने सत्तेची दोरी दिली, केवळ त्यातून आजचा कॉंग्रेस प्रमाणे भाजपा हा सर्वधर्मीय राजकीय पक्ष म्हणून पुढे आला असे म्हटल्यास वावगे ठरू नये….खरे सांगू का, इतर सरळमार्गी नसतात, असे आम्ही म्हणणार नाही पण ब्राम्हण हे नक्कीच सरळमार्गी असतात. त्यांना त्यांच्या विचारांचा, आचारांचा अभिमान असतो. पुढे जाऊन सांगतो, आमची जी तरुण पिढी अभक्ष आणि दारूच्या नादी लागलेली दिसते त्यातून अशा तरुणांच्या घरातील वातावरण अतिशय तणावाचे असते. पतिव्रता स्त्रीच्या पोटी जणू वेश्या जन्माला आली असे आम्हाला हि अशी पिढी घरात जन्मली कि मनापासून वाटते, आमच्यासाठी हा प्रकार जिवंतपणी नर्क भोगण्यासारखा ठरतो. स्वातंत्राचा गैरफायदा घ्यावा, लबाड ढोंगी भ्रष्ट नेतृत्वाला सलाम ठोकावा, आम्हाला कधीही वाटत नाही. तुकडोबा, अण्णा हजारे, संत तुकाराम इत्यादी भलेही दुसर्या ज्ञातीतले पण त्यांच्या सत्यकथा हमखास ब्राम्हण घराघरातून सांगितल्या ऐकवल्या जातात….हे खरे आहे कि आमच्या वागण्याला धर्माची, आचारांची, सुविचारांची चौकट असते आणि आपण बरे आपले काम बरे, हे वागण्यावर ब्राम्हणांचा जोर असतो. आपले काम अगदी शंभर टक्के अभ्यासाने पूर्ण करण्यावर ब्राम्हणांचा विश्वास असतो मग तो शिक्षक असो, वकील, डॉक्टर, व्यवसायिक किंवा कुठल्याही क्षेत्रातला असो, अगदी सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी देखील, आम्ही सारे ‘ अविनाश धर्माधिकारी ‘ असतो….