येथे सुरुवात एका लघुकथेने करतो.
हॅलो,
तहसीलदार कुरणे का
तुम्ही….?
पलीकडून फोन.
हो..हो..मीच कुरणे..
तहसीलदार दिवसभराचा
गल्ला मोजत म्हणाले.
पुन्हा पलीकडून आवाज.
अहो, मी गांधी वृद्धाश्रमातून
मिसेस देशपांडे बोलतेय..
आज वर्तमानपत्रातून हरविलेल्या
तुमच्या कुत्र्याची जाहिरात आणि
फोटो बघितला…
तुमचा टॉमी आमच्याच आश्रमात
आलाय कालपासून आणि तुमच्या
आईशी खेळतोय, सारखी मस्ती
करतोय…
आपण या आणि घेऊन जा बरे
तुमच्या कुत्र्याला….!!
बरे झाले मला मूलबाळ नाही,
मिसेस देशपांडे फोन ठेवता ठेवता
मनाशी म्हणाल्या…
आणि या अशा जीवन समस्या या राज्यात या देशात अनेकांसमोर ठाण मांडून असतात. देव दिसत नाही, साथीला सहकार्याला मदतीला कोणी नाही नेमका त्यावेळी मनाचा तोल जातो मन सावरायला आणि समोर कोणी दिसत नाही म्हणून जो तो बुवाच्या नादि लागतो. देव बदनाम होतो, बुवा मजा मारून मोकळा होतो….
प्रसंग काही वर्षांपूर्वीचा, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कृषी मंत्री शांत आणि सयंमी भाऊसाहेब फुंडकर, आमच्या खामगावचे, जेथे माझीही शेती आहे, एक दिवस त्यांच्या कुटुंबात नको ते घडले, त्यांचा 8-10 वर्षांचा पुतण्या शुभम अचानक खेळता खेळता बेपत्ता झाला, विदर्भातल्या बलाढ्य नेत्याचा पुतण्या शुभम असा एकाकी बेपत्ता व्हावा, अख्ख्या विदर्भात खळबळ माजली. पोलिसांची, कार्यकर्त्यांची सर्वांची शोधाशोध सुरु झाली. भय्यू महाराजांचा भाऊसाहेबांना बुवा भय्यूचा परमेश्वरी अवतार म्हणून फोन, भाऊसाहेब निश्चिन्त राहा, शुभमच्या जीवाला कोणताही धोका नाही, तो चार दिवसात नक्की परत येणार आहे आणि पुढले चार दिवस भय्यू महाराजांचे सतत हे असे भाऊसाहेबांना म्हणजे मंत्री फुंडकरांना आपणहून सतत फोन, काळजी करू नका, तो येतोय, त्याच्या जीवाला अजिबात धोका नाही. शेवटचा फोन जेव्हा भय्यू महाराजांचा भाऊसाहेबांना आला कि काळजी करू नका अगदी पुढल्या काही तासात शुभम सहीसलामत परत येतोय, हा आलेला फोन भाऊसाहेबांनी आदळून खाली ठेवला, कारण……
तेव्हा शुभमचे प्रेत त्यांच्यासमोर पडलेले होते, त्याचा नरबळी देण्यात आला होता. भय्यूमहाराजच्या या थापाड्या फोन्स आधी भाऊसाहेब देखील या बुवाचे भक्त होते, बुवाशी जवळीक साधून होते, पुढले काय ते भाऊसाहेबांना विचारले तर बरे होईल, अशा एक ना अनेकांना थापा, अशा किमान मोठ्या,धक्कादायक शंभर थापा मला तोंडपाठ आहेत, भय्यू महाराजांनी मला आव्हान दिले तर नक्की त्या मारलेल्या थापा मी पुराव्यांसहित नक्की मांडेन….
दुसरा एक किस्सा 2002 मधला, बहुदा तारीख 13 जून असावी. पावसाळी अधिवेशन सुरु होते आणि त्यावेळेचे विधान सभेतील विरोधी पक्ष नेते श्रीमान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार बाहेर पडून विलासराव यांच्या विरोधात मतदान करण्याची दाट शक्यता होती, मोठी नामुष्की त्यामुळे शरद पवार आणि विलासराव देशमुखांवर त्यातून ओढवली असती, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जवळपास सात आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला होता त्यामुळे काँग्रेस ने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी मतदानाआधी आपले आमदार बंगलोरला तर राष्ट्रवादीने आपले आमदार इंदोरला पंचतारांकित हॉटेल मध्ये हलविले होते. मंत्री असलेल्या अनिल देशमुखांना भय्यू महाराजांनी निरोप पाठवला, घेऊन या तुमच्या आमदारांना आमच्या वाड्यावर. अनिलबाबूंनी आमदारांना भेटीसाठी म्हणून साऱ्या आमदारांना घेऊन भय्यू महाराजांच्या बंगल्यावर आगेकूच केली, ते तेथे पोहोचले आणि केंद्रात मंत्री असलेल्या शरद पवारांना हे कळताच त्यांनी फोनवरून अनिलबाबूंची बिनपाण्याने केली आणि आमदारांना परत घेऊन या आत्ताच्या आता, फर्मान सोडले, अर्थात सारे आमदार लगेच हॉटेल मध्ये परतले. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्याच रात्री आपल्या आमदारांची रवानगी बंगलोरलाच केली. भय्यू महाराज नाजूक क्षणी काय गोंधळ घालतील, मला वाटते पवारांना कल्पना आली असावी आणि त्यांनी तो कठोर निर्णय घेतला…
आधीचे जनतेने आपणहून उपाधीत केलेले राष्ट्रसंत तुकडोजी मूर्तीपूजेला महत्व देणारे होते का, नाय नो नेव्हर. त्यांनी अडाणी अशिक्षित लोकांमध्ये जनजागृती आणली आणि जीवन कसे जगावे व कसे पुढे जावे हे शेतकरी शेतमजूर आणि इतर गोरगरिबांना शिकविले. हे भय्यू महाशय तर स्वतःच राष्ट्रसंत म्हणवून घेतात आणि त्यांच्या इंदोरच्या आश्रमात तर देवपूजेतून लुटालुटीला सतत प्राधान्य देतात. भक्तांकडून पूजेच्या तटाचे जे पैसे लुटले जातात ते कोणाच्या खिशात जातात न सांगितलेले बरे, विशेष म्हणजे पुन्हा पुन्हा तेच ते पूजेचे सामान आश्रमातून भक्तांना भरमसाठ भावाने विकल्या जाते.
मस्त धंदा हा बुवाबाजीचा…..अपूर्ण..