यावेळी मुख्यमंत्र्यांसहित मंत्री आणि राज्यमंत्री मिळून विदर्भाची संख्या दहा आहे, याआधी कित्येक वर्षे वैदर्भीय जनता सतत इंदिरा गांधींच्या प्रेमापोटी त्यांनी काढलेल्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठाम उभी राहत असे, निवडणुकीत हवा कोणाचीही असो, त्यादरम्यान इंदिरा किंवा राजीव गांधी यांचा झंझावाती दौरा आटोपला कि वारे बदलायचे आणि उमेदवार मग तो कोणीही असो, इंदिरा काँग्रेस हमखास निवडून यायची, अनामत रक्कम मोठ्या प्रमाणावर जप्त होणारा राजकीय पक्ष अर्थात आधी जनसंघ होता नंतर भारतीय जनता पक्ष…
पण मोठ्या प्रमाणावर साथ देऊनही विदर्भातून मुख्यमंत्र्यांसहित दहा दहा मंत्री राज्यमंत्री असे कधीही झाले नाही, उमेदवार विदर्भातून निवडून यायचे, विदर्भाच्या भरवशावर अनेकदा केंद्रात आणि राज्यात गांधी घराणे सतत सत्तेवर यायचे पण सत्तेत मोठा वाटा मिळाला असे कधीही घडले नाही, विदर्भातल्या नेत्यांची इकडे मुंबईत अवस्था राम और श्याम मधल्या राम सारखी गावंढळ व्हायची, इतर सारे वऱ्हाडातल्या नेत्यांकडे, मंत्र्यांकडे अडाणी, बावळट, अल्पसंतुष्टी, खेडूत, गावंढळ म्हणूनच बघायचे, यावेळी भाजप सत्तेवर आली आणि चित्र बदलले, मुख्यमंत्र्यांसहित दहा मंत्री आणि राज्यमंत्रीपद विदर्भाच्या वाट्याला आले, वरून सर्वांना पुरून उरणारा बुद्धिमान चाणाक्ष धडाकेबाज उत्साही दूरदृष्टी असलेला, राज्य खडान्खडा पाठ असलेला मुख्यमंत्री विदर्भातून राज्याला मिळाला. मुख्यमंत्री भाजपचा, विदर्भातला आणि ब्राम्हण असल्याने, प्रस्थापितांना सुरुवातीला वाटले, फारसे कठीण नाही याला कोपऱ्यात कचऱ्यासारखे उचलून फेकणे पण ते घडले नाही, तो राजकारणातला अमिताभ निघाला, खरा हिरो ठरला, विरोधक मग त्याच्या पक्षातले असोत वा राज्यातले फडणवीसांसमोर ते सारेच्या सारे समूह नृत्यात मेन हिरोच्या मागे नाचणारे दुय्यम दर्जाचे कलावंत ठरले, वाटले….
आता तो अडाण्यांचा विदर्भ राहिलेला नाही, खेड्यातून शहरात लग्नानंतर आलेल्या अर्धवट तरुणीसारखे आता विदर्भातले नेते बावळट भेदरलेले वाटत नाहीत. उद्या समजा देवेंद्र फडणवीस मोदींना ‘ पर्रीकर ‘ वाटल्यास म्हणजे मोदींना त्यांच्यात पर्रीकर दिसल्यास ते केंद्रात गेले तर फडणवीस यांच्यानंतरचा मुख्यमंत्री देखील विदर्भातला असेल, सध्या फडणवीस यांचा दोन व्यक्तींवर ठाम जाम विश्वास आहे, ते दोन आहेत सुमित आणि सुधीर….
सुमित म्हणजे सुमित वानखेडे आणि सुधीर म्हणजे वित्त आणि वनमंत्री श्रीमान सुधीर मुनगंटीवार. तू तो मेरी जान है, जान है, जान है असे देवेन्द्र त्यांच्या अमृताला म्हणतात कि नाही माहित नाही पण ते हे वाक्य नक्की त्या सुमित वानखेडे यांना म्हणत असतील कारण आपला सोबती किती विश्वासाचा आणि कसा अडचणीत न आणणारा असावा याचा उत्तम आदर्श सुमित यांनी घालून दिला आहे, सुमित
त्यांची सावली आहे, सखा आहे, असिस्टंट आहे, विश्वासू माणूस आहे, अत्यंत विश्वासातील आहे, सतत सोबतीला असणारा घरदार आणि भूक तहान विसरून देवेंद्र यांची सेवा करणारा आधुनिक हनुमान आहे…
सुरुवातीला असे वातावरण निर्माण करण्यात आले होते कि देवेंद्र फडणवीस यांची छळवणूक आणि अडवणूक करण्यासाठी श्रीमान नितीन गडकरी यांनी विदर्भातले आपले दोन हनुमान देवेंद्र यांच्या मंत्री मंडळात घुसवले आहेत, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे शिवाय इकडे खानदेशातून एकनाथ खडसे यांनाही फडणवीसांच्या अंगावर सोडण्याची गडकरी यांची खेळी होती, पैकी मुनगंटीवार आणि बावनकुळे दोघेही राजकीय दृष्ट्या चतुर निघाले ते नागपुरातले दत्ता मेघे निघाले म्हणजे एकाचवेळी दत्ताभाऊ यांनी घरात मुंबई आणि नागपूर दोन्ही खुश ठेवले तसे. गडकरी आमचे नेते पण मुख्यमंत्री देखील आमचेच, या भावनेने बावनकुळे आणि मुनगंटीवार दोघांनी भूमिका घेतल्याने, वाद झाले नाहीत,फक्त फडणवीस यांना अगदी उघड त्रास एकनाथ खडसे यांनी दिला, मंत्रिमंडळातून गच्छन्ति झाल्यानंतर देखील त्यांनी तो प्रयत्न केला असता पण खडसे यांची फार नाजूक आर्थिक प्रकरणे मुख्यमंत्र्यांकडे आहेत, थोडक्यात देवेंद्र यांच्या बाबतीत एकनाथ यांचा विरोध अधिक प्रखर झाला असताही पण ते घडले नाही जर खडसे यांच्याबाबतीत अनेक नाजूक प्रकरणांच्या फाईल्स माझ्याकडे आहेत तर त्या नक्कीच माझ्यापेक्ष अधिक प्रमाणावर मुख्यमंत्र्यांकडे आहेत, त्यावर शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. योग्य वेळी घाव घालण्यात त्या शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या फडणवीसांशी यापुढे पंगा घेणे म्हणजे आपला सध्याचा सुरेशदादा करून घेणे खडसे यांना ते नेमके माहित आहे. जसा वेळोवेळी सुरेशदादा जैन यांनी नको तेवढा मोठा पंगा या राज्यातल्या शरद पवार किंवा जळगाव जिल्ह्यातल्या अनेक ताकदवान नेत्यांशी घेऊन आपली राजकीय कारकीर्द काळीकुट्ट करवून घेतली, तेच पाऊल अनुभवी नाथाभाऊंनी उचलावे, आश्चर्य वाटते, त्यांनी विनाकारण स्वतःच्या पायावर धोंडा मारून अतिशय सामान्य आणि वादग्रस्त गिरीश महाजन यांना पुढे जाऊ देण्याची संधी दिली. खडसे यांनी अतिशय डिसेंट्ली मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या समवेत वागणूक ठेवायला हवी होती, ते वागणे अत्यावश्यक होते पण सत्तेची मस्ती फार लवकर खडसे यांच्या डोक्यात गेल्याने आणि पैशांना त्या भुजबळ तटकरे अजितदादा यांच्यासारखे अति महत्व दिल्याने खडसे यांनी आपणहून आपली राजकीय कारकीर्द आणि राजकारणातले अति उज्वल भवितव्य काळवंडून ठेवले. अनुभवातून सांगतो, अजूनही तितकीशी वेळ गेलेली नाही, खडसे यांनी, जे मी केले ते माझे चुकले, अशी प्रांजळ कबुली मुख्यमंत्र्यांकडे दिल्यास, पुन्हा त्यांना सत्तेतले अच्छे दिन येतील, बघून घेऊ, करवून दाखवू, हे म्हणण्याचे दिवस खडसे यांचे संपले आहेत कारण अमित शाह यांच्या तशा साऱ्यांना सूचना आहेत, खडसे यांना बाजूला ठेवा म्हणून, पण फडणवीस जर खडसे यांच्यासंगे शाह यांना समजावण्या गेले, फरक पडेल, शाह यांच्या डोक्यात गेलेला राग लुप्त होऊन खान्देशात पुन्हा एकदा खडसे नंबर एक ठरतील अन्यथा फारशी कुवत नसलेल्या
महाजन यांना सतत संधी मिळत राहील. खडसे यांनी त्या सुरेशदादा यांच्यासारखे गुर्मीत मस्तीत येऊन आड येईल त्या नेत्याशी पंगा घ्यायला नको होता, कधी गुलाबराव पाटील तर कधी सुरेशदादा, कधी गिरीश महाजन तर कधी ईश्वर जैन तर कधी थेट लोकप्रिय लोकमान्य मुख्यमंत्री, या नादात खडसे यांनी आजतरी आपले मोठे राजकीय नुकसान करवून घेतले आहे. खडसे यांचा राजकीय पाय खोलात दिसताच, गडकरी त्यांच्यापासून एवढे दूर पळाले कि जणू ते खडसे यांना ओळखत देखील नाहीत. जे खडसे यांनी केले ती चूक बावनकुळे किंवा मुनगंटीवार सारख्या राजकीय समज नेमकी कुवत माहित असलेल्या या मंत्र्यांनी केली नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना आज सुधीर आणि सुमित विश्वासातले वाटतात किंवा सुमित नंतर त्यांना सुधीर ची आठवण होते. विरोधक असूयेतून बोम्ब मारत असतांना याच फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडल्या ऊर्जा खात्याला मंत्री मंडळ विस्तारादरम्यान अजिबात हात घातला नाही वरून त्यांना अत्यंत वादग्रस्त असे उत्पादन शुल्क खाते सोपविले, तुम्हाला सांगतो, जे बदल मी तुम्ही त्यांना सोपवू, मला विश्वास आहे, बावनकुळे यांचा होरा, उत्पादन खात्यातील भ्रष्टाचार कमी करण्याकडे असेल….क्रमश: