विदर्भातले एक मंत्री आहेत कि होते, नेमके मला आता आठवत नाही,पण त्यांनी त्यांच्या कार्यालयातल्या एका तरुण मादक देखण्या स्टेनोला त्यांच्या बंगल्यातच राहण्यासाठी सोय करून दिली होती. बायको तिकडे नागपुरात आणि मंत्री तसेच स्टेनो इकडे बंगल्यात, चांगले चालले होते मंत्री महोदयांचे, कुणकुण लागली म्हणून एकदा अचानक त्यांची बायको बंगल्यात दत्त म्हणून हजर, मंत्री आणि स्टेनो सकाळचा चहा घेत बसले होते, हि कोण, पत्नीने विचारताच अगं हि माझी स्टेनो, उगाच अपसमज करून घेऊ नकोस, तसे काही नाही, कामासाठी म्हणून आली होती, अगदी बाळबोध आहे ती, मी बाहेर पडलो कि तू पण तिच्या घरी जाऊन बसत जा, वेळ निघून जाईल तुझा, बेरकी मंत्री बेमालूम बोलले…
पुढले पाच सहा दिवस दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. एकदा तर स्टेनोच्या घरातले लोणचे आवडले म्हणून मंत्री पत्नीने तिचे तोंड भरून कौतुकही केले, एक दिवस पुन्हा त्या नागपुरात निघून गेल्या. स्टेनो आणि मंत्र्याला रान मोकळे, चार दोन दिवसानंतर कुशीत शिरल्यानंतर स्टेनो त्या मंत्र्याला म्हणाली, एक सांगू का, माझी लोणच्याची बरणी दिसत नाही, कदाचित तुमच्या बायकोने….नाही ग तीने अलीकडे चोऱ्या करणे सोडून दिले आहे, तू म्हणते आहेस म्हणून बोलून बघेन मी तिच्याशी…सकाळ होताच मंत्र्याने बायकोला फोन लावला, अगं स्टेनोच्या घरातले लोणचे एवढे आवडले होते तर मागून घ्यायचे, तू बरणी घेऊन गेलेली दिसते, पूर्वी जशी माझ्या पॅन्टमधून पैसे काढून घ्यायची तशी….त्यावर झटक्यात मंत्री पत्नी म्हणाली, मी का म्हणून नेईन त्या सटवाईचीलोणच्याची बरणी, मी फक्त एक केले, निघायच्या दिवशी ती बरणी तिच्या बेडरूम मधल्या उशीखाली लपवून आले होते, तिचे तिकडे जाणे झाले असते तर बरणी लगेच तिच्या नजरेस पडली असती…तुम्हाला जे काय धंदे करायचे असतात ते करीत जा पण तुमचे कुठलेलंही वाईट कृत्य तुम्ही दोघांपासून लपवू ठेवणे अशक्य, तुमच्या पत्नीपासून आणि आम्हा पत्रकारापासून…..
श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुरुवातीला मंत्री म्हणून ऊर्जा खाते सोपविण्यात आले होते. बावनकुळे यांचे कुटुंब सदस्य आणि ते स्वतः देखील ऊर्जा खात्यात नामवंत कंत्राटदार असल्याने ते या खात्याचा आपल्या कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा करून घेतील अशी बोंब त्यांच्या राजकीय व पक्षांतर्गत विरोधकांनी सुरुवातीलाच मारली पण घडले नेमके वेगळे, वीज खात्यातील बदमाश लोकांचा कर्दनकाळ आणि मंत्री मंडळातील सर्वाधिक लोकप्रिय मंत्री म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवायला सुरुवात केली आणि त्यांच्या विरोधकांची बोलती बंद झाली. विशेष म्हणजे काम घेऊन येणार विरोधक कि मित्र, कुठल्या जातीचा आणि कोणत्या राजकीय पक्षाचा, ओळखीचा कि अनोळखी हे न बघता भेटेल त्याचे समाधान आणि भेटेल त्याचे काम तातडीने उरकण्याची त्यांची पद्धत राज्यातल्या राजकीय परिघात कौतुकाचा बिषय ठरली, आजच्या मंत्रिमंडळात बोटावर मोजण्याएवढे जे लोकमान्य आणि लोकप्रिय मंत्री राज्यमंत्री आहेत त्यात नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे अग्रस्थानी असल्यानेचमंत्री मंडळ विस्तारात आणि खडसे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर श्रीमान नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक असूनही केवळ काम करणारा मंत्री म्हणून अतिशय मोठे मन ठेवून मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना उत्पादन शुल्क हे आणखी एक वादग्रस्त खाते पदरात टाकले. कधी काळी विरोधक म्हणायचे, आहे ते ऊर्जा खाते मुख्यमंत्री बावनकुळे यांच्याकडून मंत्री मंडळ विस्तारानंतर काढून घेतील. उलटी बसली त्यांच्या विरोधकांच्या थोबाडात, खाते काढून घेणे नाहीच, वरून तसे वादग्रस्त, पण म्हणाल तर जबरदस्त असे उत्पादन शुल्क खाते बावनकुळे यांना देण्यात आले. माझ्या ओळखीची एक तरुणी होती, तिचे नेमके वर्णन करायचे झाल्यास, अनोळखी तिला भेटल्यानंतर विचारायचे, तुम्ही युगांडाच्या का? आणि आम्हाला हेच वाटायचे कि बेचारी कुवारीही मरनेवाली है, पण असे काही घडले नाही, तिचे योग्य वयात लग्न झाले, तिला देखणा आणि प्रचंड पैसे खाणारा सरकारी अधिकारी नवरा देखील मिळाला. ते तसेच बावनकुळे यांच्याबाबतीत घडले….
तुम्हाला, विरोधकांना, बावनकुळे यांच्याविषयी काय वाटते हे तसे महत्वाचे ठरत नाही, चाणाक्ष फडणवीसांना नेमके माहित असते, कोणासाठी कुठले पद योग्य आहे ते, स्त्रीरोग तज्ज्ञाला बाळंतपण कसे करतात हे दहावी नापास माणसाने शिकवू नये तसा हा फडणवीस व बावनकुळे या दोघं दरम्यान घडलेला प्रकार…
क्रमश: