संसार सुखी करण्याची तत्वे तशी फार सोपी आहेत, आम्ही ती उगाच खूप
विनाकारण कारण नसतांना गरज नसतांना आवश्यकता नसतांना कठीण
करून ठेवतो आणि आयुष्यभर एकमेकांशी या त्या कारणावरून भांडत
बसतो. घरी आल्यानंतर पाय चेपून दिले, पटकन खरकटी भांडी घासून
घेतली, घरात आल्या आल्या समोर पाण्याचा पेला भरून ठेवला, डोके
दुखत असेल तर प्रेमाने झंडू बाम चोळून दिला, पटकन वरणाला फोडणी
देऊन लगेच पाटपाणी करायला घेतले, सांगितल्यानंतर लगेच चहा करून
दिला, थोडक्यात अशी छोटी छोटी कामं नवऱ्याने केलीत, कोणतीही बायको
तिच्या नवऱ्यावर कधी चिडणार नाही रागावणार नाही संतपणार नाही भांडणार
नाही पण नवरे मंडळी जर जागच्या जागी गटारातल्या म्हशीसारखे एकाच
जागी बसून राहिलेत तर चीड राग संताप तो कुठल्याही बायकोला येणारच
कि. समस्त विवाहित पुरुषांनो, संसार म्हणजे गुढगाभर चिखलात चालणे
कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसता येत
नाही म्हणून वर सांगितलेल्या क्लुप्त्या लक्षात ठेवा तुमचा संसार नक्कीच
सुखाचा होऊन शेवटी इहलोकी तुम्ही मोठ्या आनंदाने जाल….
आणि बायकांनी देखील कधी कधी नवऱ्याला खुश ठेवायला हरकत नाही
म्हणजे कामे करून दमलेल्या नवऱ्याला, थोडे जेवून घेता का, ऐवजी थोडी
घेऊन जेवता का, असे विचारले तर बघा समस्त नवऱ्यांच्या घरकामाचा वेग
कसा आणखी वाढतो ते बघा…
अलीकडे माझ्या मित्राची बायको ड्रायव्हिंग स्कुल मधून कार चालवायला
शिकली, एक दिवस कौतुकाने मित्राने आपली गाडीची चावी तिच्या हाती
देऊन, ते फिरायला निघाले, हा तिच्या शेजारी ऐटीत बसला, पाच सात
किलोमीटर कार चालविल्यानंतर समोर ट्रक येताच तिने मित्राला विचारले,
अहो ब्रेक कुठे असतो आणि आता तो नेमका कसा मारायचा, नशीब तिने
ब्रेक समजून एक्सलेटरवर पाय जोरात मारला नाही, त्याने हँडब्रेक ओढला
ते वाचले, दुसरेदिवशी मित्राने कार विकली, संसार सुरळीत सुरु ठेवला.
एकदा याच मित्राची बायको त्याला काहीशा फणकाऱ्याने म्हणाली होती,
तुमच्या या कारचे ए. सी. चे बिल जर तुमच्या ऑफिस ऐवजी जर घरी
येणार असेल तर बंद ठेवत चला तुमचा तो ए.सी. का फेसी, मित्राने
कपाळावर आधी हात मारून घेतला मग कपाळाचा घाम पुसला….
आणखी एक युक्ती शासकीय अधिकारी असलेला माझा एक मित्र
कायम डोक्यात ठेवून वागतो त्यामुळे ना त्याचे बायकोशी भांडण होते ना
मैत्रिणींशी. तो मैत्रीण प्रेयसी असो अथवा बायको, त्यांना कायम सखे,
डार्लिंग, जानू, स्वीटी, हनी, लव्ह इत्यादी टोपण नावांनी त्यांच्याशी
बोलतो, संवाद साधतो, अगदी सव्वाशे किलो वजनाच्या पुरुषी चेहऱ्याच्या
बायकोला सुद्धा तो हनी किंवा ‘ माय मधुबाला ‘ म्हणतो, त्यामुळे बायकोशी
बोलतांना प्रेयसीचे नाव तोंडात येत नाही आणि प्रेयसीशी बोलतांना चुकूनही
बायकोची आठवण कोसो दूर पण तिचे नाव देखील तोंडात येत नाही त्यामुळे
बायको असो कि त्या त्या वर्षीची प्रेयसी, जी हाजीर ती त्याला घट्ट बिलगून
असते, हा केवळ माझाच, असे त्यांना वाटते त्यातून, सध्या हे महाशय
एसआरए प्रकल्पात तुडुंब खिसे भरताहेत….
असे म्हणतात जो नवरा घरी बायकोला खुश ठेवतो आणि जो नेता सर्वसामान्य
माणसाला, अगदी सामान्य मतदाराला खुश ठेवतो, प्रसंगी त्यांच्यातलाच होतो
असा, गर्दीत घोळक्यात लोकात आम जनतेत पब्लिक मध्ये रमणारा नेता, पुढारी
नेहमी पुढे पुढे जातो, अनेकदा, सतत, अगदी सहज, समोरचा विरोधक कितीही
तगडा असला तरी निवडून येतो. मला वाटते, असे फार कमी असतील ज्यांचा
राजकारणाशी थोडाफार संबंध आल्यानंतर त्यांची विनोद तावडे यांच्याशी भेट
झाली नाही कारण अगदी उघड आहे, तावडे घरी कमी आम जनतेत कायम अधिक
असतात, रमतात, याचा अर्थ त्यांचे घराकडे दुर्लक्ष आहे, असे अजिबात नाही पण
शरद पवार आशिष शेलार दिलीप वळसे पाटील, देवेंद्र फडणवीस इत्यादींनी केवळ
एक अपत्य, हा जो निर्णय घेऊन समाजाला अधिक वेळ दिला, देताहेत त्यातलेच एक
मंत्रीमहोदय श्रीमान विनोद तावडे. शिवाय त्यांच्या पत्नी वर्षाताई एकदम सक्षम,
कुठेही त्या कमी पडलेल्या नाहीत मग एकुलती मुलगी असो, एकत्र कुटुंब असो कि
समाजसेवेत स्वतःला झोकून देणे असो, छान चाललंय तावडे दाम्पत्याचं….
अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि निवडणुकीचा पंगा अंगावर घेण्याची तशी विनोद
तावडे, देवेंद्र फडणवीस किंवा आशिष शेलारांना अजिबात गरज नव्हती, या तिन्ही
मित्रांना नेहमीसारखे मागच्या दाराने आमदार होणे म्हणजे विधान परिषदेत जाऊन
बसणें त्यांना रुटीन होते, सहज शक्य होते, अजिबात अशक्य नव्हते, सोप्पे होते
पण त्यात त्यांनी अडकवून घेतले नाही, तिघांनीही थेट मतदारसंघातून आमदारकी
लढवली आणि जिंकून आले. हवा मग ती कोणाची असो किंवा नसो, ज्यापद्धतीने
विनोद तावडे त्यांच्या विधान सभा मतदारसंघात कामे करताहेत, बघून जो तो मतदार
हेच एकमेकांना सांगतो, यापुढे विनोद तावडे यांना पराभूत करणे प्रसंगी देवाला देखील
शक्य नाही कारण तावडे ज्या त्या मतदारांसाठी अगदी देवासारखे धावून येतात, धावून
जातात. मित्रहो, खरा माणूस तोच, जो विधान परिषदेकडे पाठ फिरवून थेट लोकात
जाऊन निवडणूक लढवतो, सलाम या अशा विनोद तावडे देवेंद्र फडणवीस किंवा
आशिष शेलारांसारख्या मर्द नेत्यांना, धाडसी नेतृत्वाला…