डॉ. तात्याराव लहाने सर जे जे इस्पितळाचे अधिष्ठाता आहेत राज्यातल्या मराठी माणसाला सांगण्याची तशी अजिबात आवश्यकता नाही एवढे डॉ. लहाने त्यांनी हाती घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमातून प्रसिद्ध पावलेले आहेत म्हणुनच त्यांना पद्म्श्री देऊन सरकारने देखील गौरविले आहे. डॉ. तात्याराव लहाने यांचा गट विरुद्ध डॉ. लहाने यांच्या विरोधकांचा एक गट असे वातावरणजे जे इस्पितळात आहे, राज्याच्या आरोग्य विभागात आहे, खासकरून संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागाशी संबंधित सारे म्हणजे दोन्ही गटातले डॉक्टर्स किंवा या खात्याशी संबंधित कंत्राटदार पत्रकार अधिकारी कर्मचारी एकमेकांवर कायम चिखलफेक करतात, बदनाम करत असतात, विविध पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे दोन्हीही गट एकमेकांची लफडी कायम बाहेर काढतात, उकरून काढतात. एक पत्रकार मला म्हणाला, डॉ. लहाने यांनी डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर ज्या लाखो लोकांना गॉगल चष्मे किंवा लेन्स साहित्य लागते ते सारे साहित्य डॉ. लहाने ज्यांच्याकडून विकत घेण्यास भाग पडतात त्या साहित्याचे दुकान डॉ. लहाने यांची मैत्रीण का सखी का कलीग डॉ. रागिणी यांच्या भावाच्या दुकानातून ते घ्यायला भाग पडतात. आधी मी त्या पत्रकाराचे सांगणे शांतपणे ऐकून घेतले आणि ऐकून झाल्यावर डॉ. लहाने यांना थेट फोनवर हा प्रकार खरा आहे का, विचारले त्यावर त्यांनी जे विस्तृत सफाईदार उत्तर दिले अर्थ हाच निघाला कि डॉ. रागिणी यांच्या भावाचे किंवा कुठल्याही नातेवाईकाचे असले कोणतेही दुकान नाही किंवा व्यवसाय नाही. हे सारे मी मुद्दाम डॉ लहाने यांच्याशी त्या पत्रकारांसमोर भ्रमणध्वनीच्या स्पीकरवरून बोलत होतो, त्यांचे बोलणे संपल्यानंतर मी त्या पत्रकाराला एवढेच म्हणालो, आत तू बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, मला नाही वाटत तो पत्रकार पुरावे मला पाठवू शकेल…
अनेकदा नेमके हेच घडते आम्हा पत्रकारांच्या बाबतीत कि अमुक एखाद्याचा बदला घेण्यासाठी आमच्यातल्या आक्रमक पत्रकारांचा शिडीसारखा असा उपयोग करून घेतला जातो आणि आमचा असा दुरुपयोग करून घेतल्या जातोय हे ठाऊक असतांना देखील आमच्यातले अनेक पाप करून मोकळे होतात कारण त्यांना सुपारीचे त्यांच्या ऐपतीपेक्षा अधिक पैसे मिळालेले असतात, नेमके हे घडता कामा नये….राज्यातल्या बिशेषत: राजकीय परिघात काम करणाऱ्या वार्ताहरांचें, पत्रकारांचे असेच काही गट आहेत, संघटना आहेत, एकमेकात त्यांचे प्रचंड हेवेदावे आहेत. एकमेकांना बदनाम करण्यासाठी किंवा माहिती आणि जनसंपर्क खात्यातील कुरापती बाहेर काढण्यासाठी ह्या अशा संघटनांचे पदाधिकारी आमच्यातल्या आमच्यासारख्या आक्रमक बेधडक पत्रकारांना त्यातून भरपूर खाद्य पुरवीत असतात. माझा मुलगा विक्रांत देखील या राज्यातला नामवंत पत्रकार आहे, पैसे न खाणारा तो एक देशभक्त पत्रकार आहे, साहजिकच त्याच्या खांद्यावर देखील अनेकदा बंदूक ठेवून चाप ओढण्याचा प्रयत्न केला जातो, अलीकडे मी त्याला म्हणालो, जेव्हा केव्हा तुझ्यावर एखादे संकट येईल तेव्हा या संघटनेतला एस एम देशमुख असो किंवा यदु जोशी असो किंवा अन्य कुठलाही वा कोणताही पत्रकार वार्ताहर असो, मला नाही वाटत त्यांच्यातला कोणी तुझ्या मदतीला येईल म्हणून कायम सावधगिरी तू बाळगायला हवी, अमुक एखादा सांगतो कि तमुक वाईट, त्यावर कुणावरही वैयक्तिक लिहून मोकळा होऊ नको, एखाद्या पत्रकाराची भूमिका चुकीची असेल, लिखाण दिशाभूल करणारे असेल किंवा त्याने अमुक एखादी सुपारी घेतली असेल, दलाली करतांना तो आपल्याकडे असलेल्या अस्त्राचा दुरुपयोग करीत असेल तरच मग समोरचा कोणीही कितीही स्वतःला मोठा समजणारा किंवा प्रभावी समजणारा असो, प्रसंगी कुठलेहि प्रभावी वृत्तपत्र तो स्वतःच्या बोटावर नाचविणारा असेल थोडक्यात तो पत्रकारितेतील मोठा पैलवान जरी असला तरी त्याला भर चौकात लोळवून मोकळा हो, आणि तुझ्या वयाच्या मित्रांना देखील तेच सांग….
आपली पत्रकारिता चुकीच्या वागणाऱ्या लोकांवर तुटून पडणारी असावी, सुपारी घेऊन समोरच्याला बदनाम करणारी नसावी, हेच मी त्याला सांगतो, विशेष म्हणजे तो माझे ऐकतो. इतर सरकारी खात्याच्या प्रमाणात राज्याचे माहिती आणि जनसंपर्क खात्यात काही अधिकारी जे पैसे खातात ती अगदीच चिरीमिरी असते, किरकोळ आर्थिक फायदा फार तर त्यांना त्यातून होतही असेल, त्यांच्यात मानकरसाहेब किती खातात आणि भुजबळसाहेब काय करतात, किंवा अजय आंबेकर यांची बेहिशेबी मालमत्ता किती, त्यावर कधीही लक्ष देऊ नये असे मला वाटते. मात्र अति होत असतांना तुमच्याकडे एखाद्या माहिती खात्यातल्या अधिकाऱयांचेही पुरावे हाती आले तर प्रसंगी कोणालाही सोडू नये, या भूमिकेवर मी ठाम असतो. एक मात्र नक्की, जनसंपर्क खात्यातले सारेच आपल्या जपलेल्या वैक्तीतक संबंधांवर शासनाची अनेकदा चांगली प्रसिद्धी घडवून आणतात…
सांगण्याचा उद्देश हाच कि पत्रकारांनी आपल्या खांद्यावर लेखणीरूपी बंदूक ठेवण्यासाठी कधीही कोणालाही परवानगी देऊ नये जर पत्रकारांना आपली पत्रकारिता मान ताठ ठेवून पत्रकारिता करायची असेल. नेमके पुरावे हाती आले कि समोरचा मग कोणीही असो, माझे अनुकरण करा, अशा राज्यबुडव्या माणसाला नक्की लेखणीतून आडवे तिडवे घ्या.हे लिखाण संपवितांना एक गम्मत सांगतो, अलीकडे मी माझ्या मालकीच्या BMW कार सहित माझा एक फोटो फेस बुक वर अपलोड केला, अनेकांच्या त्यातून भुवया उंचावल्या म्हणून सांगतो, या राज्यातला मी पहिला पत्रकार कि मी माझ्या मालकीची महागडी कार
80 च्या दशकात मंत्रालयात घेऊन येत असे, आम्ही दोघे पत्रकार त्यावेळी मंत्रालयात आमच्या कार्स एकमेकांच्या बाजूला पार्क करीत असू, दुसरे पत्रकार महाशय होते, श्रीमान अनिल थत्ते, विशेष म्हणजे 80 च्या दशकात मंत्रालयात आम्हा पत्रकारांना देखील कार पार्किंग साठी दोन जागा राखीव होत्या, ज्या पुढे शासनाने काढून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांची कार मंत्रालय गेटच्या आत घेतल्या गेलेली नाही, आम्हाला आमच्या गाड्या आता दूर कुठेतरी उभ्या कराव्या लागतात त्याचवेळी दलालांच्या कार्स मात्र थेट आत सोडल्या जातात. नंतर 90 च्या दशकात मात्र तुटपुंज्या पगारावर नवशक्ती दैनिकात नोकरी करणाऱ्या अरविंद भानुशाली यांची जीप देखील माझ्या गाडी शेजारी पार्क व्हायला लागली….