ऑकटोबर २०१६ च्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या वित्त विभागाने ईडी च्या प्रमुखास बोलावून लेखी आणि तोंडी सांगितले कि या देशात ज्या नेत्यांच्या कुटुंबात २५ पेक्षा अधिक कंपनीज आहेत, आधी त्यांची यादी तयार करा, नंतर त्यांच्या कंपन्यांची सखोल चौकशी करून नेमका अहवाल आमच्याकडे पाठवा. ईडीकडे अमुक एखाद्या व्यक्तीची तक्रार पुराव्यांसहित असेल तरच माहिती असते, उठसुठ आर्थिक गुन्हे करणाऱ्यांची यादी किंवा माहिती त्यांच्याकडे नसते. सुरुवातीला त्यांना आयकर खात्यावर अवलंबून राहावे लागते. केंद्राकडून सूचना
मिळाल्यानंतर ईडी ने आपल्या राज्यातील असे कोणते प्रमुख नेते आहेत कि ज्यांनी अलिकडल्या २५ वर्षात उलटसुलट धंदे करून विविध कंपन्या उभ्या केल्या, त्यावर माहिती जमा करायला सुरुवात केली, असे करतांना ईडी ने ज्या दोन नेत्यांवर या राज्यात आपले लक्ष केंद्रित केले त्यापैकी एक नव्या मुंबईतले बडे नेते होते आणि दुसरे नेते श्री नारायण राणे होते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.राणे यांची ईडी मार्फत चौकशी सुरु आहे, हि बातमी लीक झाली, नव्या मुंबईतल्या त्या नेत्याचे नाव गुलदस्त्यात राहिले कारण चौकशी करावी असे त्या नेत्याने केलेल्या कुठल्याही व्यवहारात आढळले नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे ईडी साठी जेव्हा राणे यांच्याविषयी माहिती गोळा करायला आयकर खात्याने सुरुवात केली, आयकर खात्याला वेगळ्या पद्धतीने सांगावयाचे झाल्यास, भडकविण्यात केंद्राशी कायम जवळीक राहिलेल्या मुंबईतील एका नारद वृत्तीच्या विशेष म्हणजे काँग्रेसच्याच नेत्याने राणे यांच्या विरोधात उलट सुलट माहिती देण्याचा हीन प्रयत्न केला, याच पद्धतीने ईडीच्या अधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून देखील राणे यांच्या विषयी आर्थिक गैरव्यवहारांवर काही माहिती मिळते का, त्यावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांनीही, आमच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही, सांगून कानावर आणि तोंडावर हात ठेवले. पण राणे यांनी प्रत्यक्ष भेटून जेव्हा मुख्यमंत्र्यांना, माझी अशी काही चौकशी सुरु आहे का जेव्हा विचारले, त्यावर मात्र फडणवीस यांनी मौन बाळगणे पसंत केले. आपल्यापेक्षा अमुक एखादा नेता मुंबईत पक्षातल्या नेतृत्वात सरस ठरत असेल तर त्यांचे असे हलकट पद्धतीने पंख छाटण्यात काँग्रेस चा तो गोरागोमटा कपाळकरंटा नेता तसाही बदनाम आहे,म्हणून घरातले, नात्यातले नेते देखील त्याची साथ सोडून बाहेर पडले आहेत किंवा संजय निरुपम त्यावर विविध सत्यकथा सांगून तुम्हाला भारावून सोडतील….
मधले ते एक माझगावचे प्रकरण वगळता राणे यांची जी कधी उघड तर कधी गुप्त पद्धतीने चौकशी सुरु आहे, भुजबळ यांच्यासारखे अडचणीत येतील असे राणे यांच्या बाबतीत ईडीला काहीही आढळलेले नाही अशी माझी माहिती आहे. अत्यंत महत्वाचे असे कि मी नेहमीच सांगतो, आपले संबंध सतत सर्वदूर सर्वांशी मधुर असावेत. समोर एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी जरी आला तरी तो जणू क्लास वन अधिकारी आहे, असे माझे त्याच्याशी विथ रिस्पेक्ट बोलणे असते कारण समोरचा माणूस तुम्हाला काय माहिती देऊन जाईल किंवा कुठे मदतीला धावून येईल सांगता येत नाही म्हणून अमुक लहान तमुक मोठा पद्धतीने लोकांशी वागू नये. नारायण राणे यांना यावेळी तोच अनुभव आला. राणे राजकारणात पडण्यापूर्वी ते आणि त्यांचा हनुमान विजू विचारे आयकर खात्यात नोकरीला होते हे तुम्हाला सांगणे म्हणजे मंत्री विष्णू सावरा यांना त्यांचा स्टाफ लुटतो किंवा दरदिवशी बेवकूफ बनवून मोकळा होतो हे सावरा यांच्या दोन्ही मुलांना सांगण्यासारखे…..
आयकर खात्यात नोकरी करीत असतांना राणे हे विजू विचारे यांचे हनुमान होते पण पुढे राणे नोकरीतून बाहेर पडले आणि जसजसे सत्तेच्या राजकारणात मोठे होत गेले, राणे पुढे आणि विजू विचारे यांनी मग कोणताही कमीपणा न मानता राणे यांचा हनुमान होणे पसंत केले. वैशिष्ट्य म्हणजे राणे भलेही या राज्याचे एक दिवस प्रमुख झाले, मुख्यमंत्री झाले पण ते आयकर खात्यातील त्यांच्या मित्रांना, तेथील अधिकाऱ्यांना किंवा कोणालाही विसरले नाहीत, आयकर खात्यातील कोणत्याही पदावरील व्यक्ती आजही किंवा ते मंत्री किंवा मुख्यमंत्री असतांनाही थेट पोहचत असे,आणि नारायण राणे त्या मंडळींची अडचण तेथल्या तेथे लगेच सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात त्यातून त्यांच्या या सकारात्मक संबंधांचाच त्यांना यावेळी फायदा झाला, ईडी ने त्यांची चौकशी सुरु केली आहे आणि त्यात कोण कसे मातीचे तेल ओतते आहे, आयकर खात्यातील त्यांच्या मित्रांनी त्यांना नेमकी माहिती दिली, राणे सावध झाले. मी जे राणे यांना ओळखतो, त्यावर हेच सांगता येईल, चौकशी भलेही होऊन जाऊ द्या पण राणे यांचा भुजबळ किंवा तटकरे होईल असे दूरदूरपर्यंत वाटत नाही. परदेशात राणे कुटुंबाचा कोणताही व्यवसाय नाही आणि गुंतवणूक देखील नाही….