लोकसभा निवडणुकीत जी साथ आणि साद या राज्यातल्या मतदारांनी
नरेंद्र मोदी यांना दिली ती तशी सुरेख साथ एकेकाळी हे राज्य दिवंगत
इंदिरा गांधी यांना देत असे, त्यातल्या त्यात अख्खा विदर्भ तर अतिशय
ताकदीने इंदिरा गांधी यांच्या पाठीशी उभा असे. त्याकाळी विदर्भात
इंदिरा काँग्रेस समोर इतर पक्ष अगदीच क्षुल्लक पिल्लू वाटायचे. पण
वातावरण बदलत गेले आणि इंदिरा लाट गायब झाली मोदी लाट या
विदर्भात मोठ्या कष्टातून आली. अख्य्या विदर्भात राष्ट्रवादीचे अस्तित्व
असून नसल्यासारखे आहे आणि गेलेली पत पुन्हा मिळविण्याचा सांघिक
प्रयत्न काँग्रेस मधल्या कोणत्याही नेत्यांकडून होतांना दिसत नाही…
अलीकडे नागपुरात माजी मंत्री नितीन राऊत भेटले. सिगारेट पिणार्याला
जर शोधूनही माचीस सापडली नाही तर तो जसा वैतागतो किंवा बिअर
ढोसणार्याच्या बाटलीचे जर झाकण उघडायला वेळेवर ओपनर सापडले
नाही तर तो जसा वेडापिसा होऊन अख्खे घर अंगावर घेतो, प्रसंगी
दाताने झाकण उघडण्याचा प्रयत्न करून एखादा दात पडून घेतो किंवा
चद्दर बदलू हॉटेल मिळाले नाही तर कातावलेला प्रियकर जशी झुडपे
शोधत फिरतो, ते तसे काहीसे वैतागाने मला नितीन राऊत यांच्या
बोलण्यातून जाणवले. अर्ध्या तासात किमान शंभर वेळा त्यांनी त्यांच्या
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची शाब्दिक चड्डी सोडली, अनेक
वेळा राऊतांनी चौव्हाणांनां अक्षरश: उघडे पाडले, नागडे केले. त्यांचे सांगणे
खूपसे चुकीचे होते असे म्हणता येणार नाही. श्रीमान अनंत घारड नामक
एका सामान्य नेत्याचे चव्हाण कुटुंबाशी खूप खूप वर्षांपासून घरोब्याचे
संबंध आहेत, पूर्वी घारड दिवंगत शंकरराव चव्हाण यांना जवळचे होते
त्यानंतर ते लेकराच्या देखील जवळचे झाले. अनंतराव जे सांगतील तेच
अशोक चव्हाण नागपुरात करून मोकळे होतात. उद्या समजा घारड
म्हणालेत कि नागपुरातल्या गांधींच्या म्हणजे गिरीश गांधी यांच्या भोवती
२५ प्रदक्षिणा घाला, घारड यांनी सांगायचा अवकाश, अशोकराव गरागरा
फिरायला सुरुवात करतील. याच सामान्य नेत्याच्या सांगण्यावरून अशोक
चव्हाण नितीन राऊत यांना त्यांच्या उत्तर नागपूर या विधान सभा मतदार
संघात जेथे राऊत याआधी तब्बल तीन वेळा सतत आमदार म्हणून निवडून
आले आहेत तेथे विरोध करणारी माणसे काँग्रेस कडे खेचून आणताहेत,
नितीन राऊत यांचे उरले सुरले नेतृत्व आणखी कमकुवत करण्याचा प्रयत्न
करताहेत म्हणून राऊत हे जनार्दन चांदुरकर माणिकराव ठाकरे इत्यादींच्या
साक्षीने चव्हाणांवर तुटून पडले होते, सध्या ते चव्हाणांवर अतिशय चिडले
संतापलेले आहेत. जळीस्थळी त्यांना अनंत घारड आणि अशोक चव्हाण
हि जोडगळी दिसते आहे, त्यातून ते डोक्यावरचे केस उपटून घेताहेत….
मागल्या अंकात नागपुरातल्या अतुल लोंढेंवर मी लिहिल्यानंतर त्यांचा
फोन आला, टीका केल्यानंतरही ते अतिशय संयमाने माझ्याशी बोलले.
जी शंका माझ्या मनात होती, तीच त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे
वादग्रस्त आणि पराभूत नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या वृत्तीला
स्वभावाला आणि दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी पक्ष
सोडून सेक्युलर विचारांची पार्शवभूमी असलेल्या काँग्रेस मध्येच त्यांनी
प्रवेश केला, सहज शक्य असूनही त्यांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय
घेतला नाही असे त्यांच्या बोलण्यातून आले. तरीही त्यांच्या या निर्णयाला
माझे समर्थन नाही कारण ज्या शरद पवार आणि राष्ट्रवादीने अतुल लोंढे
यांना यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या पवारांना त्यांनी राजकीय
अस्ताला चाललेल्या अनिल देशमुखांना कंटाळून पक्षांतर करायला नको
होते पण ते घडले नाही, बोलण्यातून परिपकव वाटणाऱ्या लोंढेचा हा
निर्णय काहीसा अपरिपकव वाटला. कालपर्यंत त्यांच्या मनगटावर
घड्याळ होते आता लोंढे राहुल गांधी यांच्या हातात हात देऊन मोकळे
झाले. काहीसे अति लाडावून ठेवलेल्या अनिल देशमुख आणि शेठ
प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातल्या राष्ट्रवादीची पार द्रौपदी करून सोडली.
आता तर विदर्भातली राष्ट्रवादी साक्षात लंकेची पार्वती दिसायला वाटायला
लागली आहे. या दोघांच्या संधीसाधू नेतृत्वाला कंटाळून दत्त मेघे असोत
कि गिरीश गांधी किंवा संजय खोडके असोत कि अतुल लोंढे ज्यांच्या
नेतृत्वाचा उपयोग विदर्भातली राष्ट्रवादी वाढविण्यात झाला असता, पण
ते घडले नाही, या दोघांच्या विचित्र वागण्यातून विदर्भातली नागपुरातली
राष्ट्रवादी क्षयग्रस्त झाली. माजी शहर अध्यक्ष अजय पाटील देखील
अनिल देशमुख यांच्या सासुरवासाला खूप कंटाळले आहेत. त्यांच्यासमोर
अनिल देशमूख हे नाव काढण्याचा अवकाश, लगेच क्षणार्धात त्यांचा
आनंदी चेहरा बदलतो आणि काही क्षणानंतर बघणार्याला वाटते गेल्या
सहा महिन्यांपासून अजय यांना अतिसाराची लागवण झालेली आहे कि
काय, फारसे आश्चर्य वाटणार नाही जर उद्या कानावर आले कि अजय
पाटील यांनी देखील पक्षांतर केले…
भविष्यात भलेहि विदर्भात फोफावलेल्या भाजपाची पीछेहाट होईल पण
त्यांच्या संपण्याचा फायदा निदान राष्ट्रवादीला मिळेल असे आता अजिबात
वाटत नाही कारण शरद पवार विदर्भात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतांना
दिसत नाहीत आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत कि शेतातले बुजगावणे,
नेमके काळात नाही. सडपातळ सुनील यांना पवारांनी ट्रिपल एक्सेल गाऊन
घालायला दिल्यासारखे त्यांच्या ढिसाळ नेतृत्वाकडे बघून वाटते…..