अधिकाऱ्यांची ऐशीतैशी २ : पत्रकार हेमंत जोशी
(For the first part pls log on to www.vikrantjoshi.com)
संकटे सर्वांवरच येतात पण सरळमार्गी माणसे संकटात संयमी वागतात,सतत वाममार्गाने पैसे मिळविणारे मात्र लहान सहान संकटातही कोलमडून पडतात, घाबरून आणि गोंधळून जातात. साधारणतः सहा महिने झाले असतील त्या घटनेला, आयकर खात्यात मी काही माहिती घ्यायला गेलो होतो, गप्पांच्या ओघात तेथला नेहमीचा परिचयाचा अधिकारी म्हणाला, मंत्रालयात अमुक एका सचिवांचा स्वीय सहाय्यक असलेल्या अलोक ( येथे नाव बदलले आहे ) ओळखता का, मी त्यावर, होय, म्हणालो, तो चांगल्या परिचयाचा आहे, आता भलेही तो सचिवांचा पीए असेल पण मी त्याला मंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे तो पीए होता, तेव्हापासून ओळखतो. त्याने आडमार्गाने कमाई चांगली केली आहे. त्यावर आयकर अधिकारी पुढे म्हणाला, त्या अमापसमाप कमाईतून त्याने त्याच्या दोन्ही मुलांना महागडे शिक्षण दिले, अलीकडे त्याच्या मुलीचे त्याने लग्नही लावून दिले, पण लग्नानंतर त्याची मुलगी वर्ष दोन वर्षातच सासरच्यांशी, नवऱ्याशी न पटल्याने माहेरी निघून आली त्यानंतर तुमच्या या मित्राने तक्रार केली कि मी मुलींसाठी आजतागायत अमुकतमुक भव्य खर्च केला, तो मला परत मिळावा. मुलाचा बाप हुशार निघाला, त्याने आमच्याकडे तक्रार केली कि नोकरीत येण्यापूर्वी कफल्लक असलेल्या अलोकने एवढी प्रचंड संपत्ती कोठून आणि कशी जमा केली आहे, विशेष म्हणजे मुलीच्या सासर्याने अलोकने जमा केलेल्या अमाप संपत्तीचे सारे पुरावे देखील सादर केल्याने आयकर खात्याला उत्तर देतांना अलोकची कमरेखालची जागा प्रचंड फाटली आहे, असे तो आयकर अधिकारी मला म्हणाला….
त्यानंतर अलोक मला एकदा मंत्रालयात भेटल्यानंतर हा किस्सा मला माहित आहे जेव्हा मी त्याला सांगितले, त्याचा चेहरा पडला, त्याला वाटले, मी त्याच्या या भानगडींचा गैरफायदा घेईन, घाबरवून सोडेल, मी आता पैसे मागेल त्याला वाटले पण माझी हि अशी पैसे लुबाडण्याची, ओरबाडण्याची, मिळविण्याची पद्धत नाही अन्यथा दररोज घरी येतांना मी किमान दहा लाख रुपये आणले असते, पैसे खूप मिळविले असते पण पत्रकारिता हातची निघून गेली असती. तो ढसाढसा रडत होता, मी आयकर खात्यातल्या मित्राला त्याच्यासमोर फोन करून एवढेच म्हणालो, अलोकला सांभाळून घे, त्याला त्याच्या लुटमारीची आधीच मोठी सजा मिळालेली आहे, पोटची पोरगी माहेरी निघून आल्यानंतर बापाला हा प्रसंग जिवंतपणी नरकात धाडणारा असतो…
इगतपुरीला साक्षात रांडांबरोबर ड्रग्स घेऊन नाचणारी विविध शासकीय अधिकाऱ्यांची मुले, आणि इतर अनेक दरक्षणी वाममार्गाने खोऱ्याने पैसे मिळविणारे कल्याणकर सारख्या नालायक अधिकाऱ्यांच्या घरातले, कुटुंब सदस्य यात काहीही फरक नसतो. सुनील पाटील यांना परवाच्या इगतपुरीच्या प्रसंगात देवाने न वाजणारी छडी मारली, तुम्हा आम्हाला ती मागेपुढे कधीतरी एक दिवस नक्की बसणार आहे हे शासकीय अधिकाऱ्यांनो, नेमके ध्यानात ठेवा, आणि जेव्हा तुम्हाला आम्हाला आमच्या पापातून देवाची छडी बसत असते तेव्हा आजूबाजूला टाळ्या पिटणारा सामान्य माणूस त्यावेळी साक्षात यमराज म्हणून आपल्याला भासत असतो. मी नेहमीच म्हणतो, निदान पैसे खाणाऱ्या पुढाऱ्यांना थोडाफार खर्च तरी असतो पण हे हलकट थर्डग्रेड पैसे खाणारे शासकीय प्रशासकीय अधिकारी रांडांवर देखील दलालांच्या पैशांनी
मौजमजा करतात, हे असे मस्तवाल अधिकारी घरी भाजी देखील आपल्या पगारातून विकत घेत नाहीत, कसे म्हणून हे स्वर्गात जातील, हे सारेच सार्वजनिक बांधकाम खात्यातले गांगुर्डे होऊन जिवंतपणी नरकयातना भोगून मोकळे होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त हिम्मत दाखवावी, मी प्रशासकीय खात्यात ‘ देशमुखी ‘ गाजविणाऱ्या प्रभाकर यांच्यासारख्या अतीभ्रष्ट, मालामाल १०० शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्यांना यादी देतो, त्यांना वठणीवर आणा, क्षणार्धात तुम्ही योगी आदित्यनाथ यांच्यापुढे निघून जाल. सांगतांना याक्षणी डोळ्यात यासाठी अश्रू दाटलेले आहेत कि हे राज्य आघाडीच्या काळात ज्या अधिकाऱ्यांनी लुटले, लुबाडले, ते सारेच्या सारे अधिकारी सुरुवातीचा चारसहा महिन्यांचा कालावधी वगळता पुन्हा जात आणि पैशांच्या भरवशावर युती सत्तेत आल्यानंतर पुन्हा क्रीम पोस्टवर जाऊन बसले आहेत, विशेष म्हणजे विविध मंत्री आणि राज्यमंत्र्यांकडे वेश्यांच्या भूमिकेत, फक्त आणि फक्त रोकड देणाऱ्यांची एखाद्या वेश्येसारखी सतत वाट पाहणारे, मंत्र्यांचे केवळ दलाल म्हणून वावरणारे आधीचे पीए आणि पीएस आजही आहेत तेथेच आहेत, मंत्री बदलले, मंत्र्यांचा रंडीछाप स्टाफ बदलला नाही. सारेच भ्रष्ट अधिकारी बांधकाम खात्यातल्या अधीक्षक अभियंता त्या राजा जवंजाळ सारखे नालायक आणि करप्ट आहेत. अहो, जो राजा जवंजाळ पुणे पनवेल टोल प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे, त्याला जर युती सरकार ज्या विभागात न्यायालये येतात, तेथला प्रमुख म्हणून नेमून मोकळे होणार असतील तर आपली केस कशी निकालात काढायची, पुढले काहीही सांगण्याची राजाला गरज नाही. येनकेनप्रकारेण सतत जेथे पैसे ओरबाडायला मिळतात तेथे पोस्टिंग करवून घेणे हे या राजा जवंजाळ नामें बांधकाम खात्यातील अति
भ्रष्ट अधीक्षक अभियंत्याचे काम आहे आणि यावेळीही त्याने ज्या कार्यक्षेत्रात मुंबईतले न्यायालये येतात तेथे गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे मुंबई इलाका बांधकाम विभागात अतिशय महत्वाचे पोस्टिंग करवून घेतलेले आहे, उद्या त्या टोल प्रकरणातून राजा जवंजाळ निर्दोष सुटल्यास मला कवडीचेही आश्चर्य वाटणार नाही, कारण या राज्यातले सारेच भ्रष्ट अधिकारी म्हणजे राजा जवंजाळ सारखे हिडीस रूप, सरकार मग ते कोणतेही असो, फडणवीस यांना उल्लू बनवून ते सारेच पूर्वीसारखी मजा मारताहेत, मराठींना लुटताहेत, देवेंद्र तुम्ही आदित्य बना, आम्हाला न्याय मिळवून द्या….