लोकसत्ता आणि लोकमत ४ : पत्रकार हेमंत जोशी
एकीकडे सागर हिरमुखेची पहिली बातमी देणारा किंवा आमदार रमेश कदम यास थेट तुरुंगाची हवा चाखायला पाठवणारा लोकमतचा यदु जोशी आणि त्याचवेळी प्रफुल्ल पटेल सारख्या महाभ्रष्ट नेत्याचे उद्दात्तीकरण करणारे लोकमत किंवा त्याचे संपादक, हा परस्पर विरोधाभास बघितला कि आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे,पद्धतीने लोकमत दैनिकाची वाटचाल सुरु आहे कि काय असे वारंवार मनाला वाटते. शरद पवार हे देशाचे आणि सुरेशदादा जैन हे जळगाव जिल्ह्याचे मान्यवर नेते, पण या दोघांचेही एकच चुकले त्यांनी चुकीची माणसे सभोवताली निवडली आणि त्यांनाच मोठे केले आणि येथेच पवार आणि जैन दोघेही बदनाम झाले. अर्थात पवारांची जैन यांच्याशी तुलना नाहीच किंबहुना पवारांना जैनांच्या पारड्यात तोलणे म्हणजे वसंत डावखरे यांची तुलना टिळकांचे वारसदार दिवंगत जयंतराव टिळकांशी करण्यासारखे. एक मात्र नक्की काँग्रेसच्या अतिबिलंदर नेत्यांशी पुरून उरण्याच्या नादात शरद पवारांना प्रफुल्ल पटेलांसारखी बदमाश लबाड भ्रष्ट मंडळी हाताशी धरून राजकीय वाटचाल करावी लागली आणि येथेच पवारांची डोकेदुखी वाढली, सारेच त्यांना आजही घाबरतात पण दूरही ठेवतात….
प्रफुल्ल पटेल सत्तेत येईपर्यंत जगभर एअर इंडियाचा केवढा दबदबा होता, पण पटेलांनी हवाई वाहतूक मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नको ते झाले आज देशभरातल्या विमानतळावर फक्त आणि फक्त खाजगी विमाने व्यवसाय करतांना दिसतात आणि एअर इंडियाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती डबघाईला आणण्याचे महा षडयंत्र पटेलांनी यशस्वी केले. या अशा नतद्रष्ट नेत्यावर जेव्हा लोकमत मधून दिनकर रायकर आधी मुलाखत घेतात नंतर पटेल महान कसे सांगून अग्रलेखही लिहितात, दर्डा किंवा रायकरांच्या या विषवृत्तीवर आम्ही मराठींनी नक्कीच तिखट प्रतिक्रिया द्यायला हवी…माझा प्रश्न दिनकर रायकर यांच्यासारख्या बुजुर्ग अनुभवी संपादकाला, पत्रकाराला आहे कि त्यांना ठाऊक आहे प्रफुल्ल पटेल हा पैसे खातांनाकिती खालची पातळी गाठणारा माणूस आहे मग त्यांचे उदात्तीकरण का आणि कशासाठी, मोठ्या खपाच्या दैनिकाने या अशा हलकट अमराठी माणसाचे कौतुक तेही मराठी वाचकांसमोर करावे, रायकर तुमची लेखणी एवढी का म्हणून घसरली. आज राज्यात किंवा देशभरात युपीए सरकारची दोन्हीकडे सत्ता गेल्यानंतर सुदैवाने प्रथमच असे घडते आहे कि वाहणारे वारे भ्रष्टाचाराविरोधात सुरु झाले आहे, नेमक्या या अशा वातावरणात म्हणजे श्रीखंड खातांना रायकर तुम्ही मध्येच पटेलांसारख्या भ्रष्ट नेत्यांचे कौतुक करून विष्ठा खाल्ली, तुम्हाला ते निदान मनातल्या मनात तरी वाटते का ? रायकर तुम्ही तुमच्या मुलाखतीमधून आणि अग्रलेखातून पटेलांना कसे उंचीवर नेले तो संदर्भ मी माझ्या पाक्षिकात जोडणार आहेच पण प्रसंगी नोकरीवर लाथ मारायची वेळ आली तरी शेटजी मालकाची वाट्टेल तशी तळी उचलण्याचे पाप निदान आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी करू नका, तुम्हाला हात जोडून विनंती. आज एअर इंडिया चे पाप श्रीमान प्रफुल्ल पटेल त्यांच्या त्यावेळेच्या मनमोहनसिंह सरकारवर फोडून मोकळे होताहेत पण हे पाप नेमके पटेलांचे कसे हे समजण्याएवढे आम्ही खुळे असे पटेलांना वाटते हेच या लोकशाहीचे दुर्दैव आहे…