फुक्काची बदनामी २ : पत्रकार हेमंत जोशी
असे म्हणतात, लेखणी पुस्तक आणि स्त्री दुसऱ्याच्या हातात गेली कि आपल्या हाती पुन्हा लागत नाही. म्हणून या तिन्ही गोष्टी कधीही चुकीच्या हातात पडू नये याची दक्षता घ्यावी. दैव योगाने जर या तीन गोष्टी परत मिळाल्या तर त्या मोडलेल्या, फाटलेल्या किंवा भ्रष्ट झालेल्याच असतात. अलीकडे असे का कोण जाणे पण वारंवार वाटायला लागले आहे कि लोकमत दैनिक ज्या ज्या लेखणीतून उतरते, निघते त्यातल्या लेखण्या चुकीच्या माणसांच्या हातात स्थिरावल्या आहेत कि काय कि लोकमतच्या मालकाच्या नियतीमध्ये खोट आहे. आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही हे जे वृत्तपत्रे काढणाऱ्या किंवा विविध वाहिन्यांशी संबंधित लोकांना वाटते, तेच चुकीचे आहे किंबहुना आमच्यातले जे नेमके बदमाश किंवा ब्लॅक मेलर आहेत त्यांना हुडकून काढून वठणीवर आणण्याचे काम या समाजातल्या डोळसांचे आहे आणि ते त्यांनी करावे, चांगल्या पत्रकारांचा त्यास पाठिंबा असेल. नागपुरात मे अखेरीस नागपूरकरांचे अतिशय लाडके आणि केंद्रीय मंत्री श्रीमान नितीन गडकरी यांचा षष्ट्यब्दपूर्ती गौरव खूप खूप धुमधडाक्यात करण्यात आला. या कार्यक्रमात पैशांची नाही पण लोकांची श्रीमंती अधिक दिसून आली म्हणजे प्रत्येक नागपूरकराला त्यादिवशी असे वाटले कि हा माझ्या घरातल्या व्यक्तीचा सत्कार सोहळा आहे, प्रचंड गर्दी ओसंडली, हीच ती माणसांची श्रीमंती. सत्कार गडकरींचा आणि सत्काराचे नियोजन दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या आणि मोस्ट पॉप्युलर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांच्या हाती म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, हे तिघे एकत्र, नेमके जे घडायचे तेच घडले, गडकरी यांचा हा सत्कार सोहळा सुपर ड्युपर हीट झाला, विशेष मेहनत नागपुरातले गांधी गिरीश गांधी यांनी घेतल्याने सोहळा विलोभनीय होणे आलेच, तेच झाले….
बावनकुळे आणि फडणवीस या दोघांनाही पैशांची नव्हे माणसांची श्रीमंती दाखवायची होती त्यात हे दोघेही असे हलकट नाहीत कि सोहळा गडकरींचा आहे का मग घ्या देणग्या त्यांच्या नावाने म्हणजे १० रुपयांच्या देणग्या गोळा करायच्या, त्यातले ३-४ रुपये खर्च करून उरलेले खिशात टाकायचे, त्यांची हि अशी वृत्ती अजिबात नाही, तुम्हा सर्वांनाच ते माहित आहे, त्यामुळे खर्चाला फाटा पण कार्यक्रम देखणा म्हणून गिरीश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश गांधी फॉर्म्युला वापरण्यात आला म्हणजे कमी पैशात अधिक देखणा असा हा गडकरी यांचा सत्कार सोहळा पार पडला….दैनिक लोकमत ची ती जुनी स्टाईल आहे म्हणजे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, सत्कार गडकरींचा आहे का मग घ्या विशेषांक काढून, चार पैसेही बक्कळ मिळतात वरून गडकरी, फडणवीसांकडून शाबासकीही. नेहमीच्या पद्धतीने म्हणे मग मुख्यमंत्र्यांना थ्रू बावनकुळे विचारण्यात आले, विशेषांक काढायचा आहे, खूप खर्च आहे, त्यावर दोघांचेही अर्थातच हात वर, दोघांच्याही खिशात पैसे नव्हते आणि लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या, देणगीदारांच्या खिशातून पैसे काढायचे नाहीत, त्या दोघांचेही आधीच ठरलेले, तसेही गडकरींचा सत्कार सोहळा त्यात प्रमुख सहभाग या राज्यातल्या, नागपुरातल्या अतिशय लोकप्रिय लोकमान्य आणि लोकाभिमुख मुख्यमंत्री आणि मंत्री म्हणजे फडणवीस आणि बावनकुळे, गर्दी होणार, कार्यक्रम हिट होणार, हे जणू ठरलेलेच, मग अवास्तव विनाकारण खर्च करून बदनामी ती का म्हणून ओढवून घ्यायची, त्यामुळे खर्चाला कात्री पण सत्कार सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला…
देणग्या जाहिरातींचे तेवढे जमवून द्या, गडकरींवर विशेषांक काढायचा आहे, लोकमत म्हणाले, ते शक्य नाही, तेवढ्याच तडफेने चंद्रशेखर बावनकुळे यांचेही उत्तर आले, लोकमतशी पंगा, बावनकुळे नको तेथे नडल्याने, घडायचे तेच घडले. नेमके काय घडले, पुढल्या भागात….