अफलातून राज्यपाल : पत्रकार हेमंत जोशी
जे कॉमन आहे किंवा इतरत्र वाचकांना वाचायला मिळते ते लिखाण करायचे नाही हे जे आचार्य अत्रे ग. वा. बेहेरे यांनी ठरविले होते त्याच पावलांवर पाऊल ठेऊन मी अनिल थत्ते आणि पत्रकार महर्षी भाऊ तोरसेकर आम्ही तिघांनी ठरविले होते त्यापैकी १९९० च्या दशकानंतर दुर्दैवाने अनिल थत्ते यांचे लिखाण फारसे वाचण्यात आले नाही किंवा मी स्वतःला या मान्यवरांच्या रांगेतला एक असे अजिबात समजत नाही पण साधारणतः ३० वर्षांपूर्वी पत्रकार मित्र उदय तानपाठकने माझी पहिल्यांदा भाऊ तोरसेकर यांच्याशी पहिल्यांदा ओळख करून दिली पुढे ओळखीचे रूपांतर जिव्हाळ्यात झाले आणि त्यांचे लिखाण वाचता वाचता ऐकता ऐकता मन भरून पावले. उद्या मला जर एखाद्याने विचारले कि एकांत असलेल्या बेटावर सोबत कोणाला घेऊन जायला आवडेल म्हणजे एखाद्या भरगच्च सेक्सी मादक अभिनेत्रीला कि भाऊंना त्यावर क्षणाचाही विचार न करता मी म्हणेन, भाऊंच्या सहवासात गप्पा स्वर्ग तेथेच गवसला. अलीकडे भाऊंचे भाजपाच्या स्टेजवर मोदी नेमके कसे यावर भाषण झाले आणि काही नालायकांनी कमेंट्स केल्या, भाऊंना विधान परिषद सदस्य व्हायचे आहे तर. अर्थात ज्या भाऊंनी सहज शक्य असतांना पैशांना लाथ मारून आयुष्य एका चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत सहकुटुंब काढले त्यांना भाऊ नेमके समजणे महाकठीण. पत्रकार भाऊ तोरसेकर आणि त्यांचे बुद्धिमान पण अत्यंत साधे सरळ जीवन जगणारे छोटे कुटुंब त्यावर पुन्हा कधीतरी…
आज दिनांक २२ सप्टेंबर मंगळवार रोजी मी आणि भाऊ माननीय राज्यपालांच्या भेटीला गेलो होतो, अर्थात आम्हाला या अफलातून भन्नाट पारदर्शी राज्यपालांविषयी म्हणाल तर आकर्षण होते म्हणाल तर कुतूहल होते. जवळपास ४५ मिनिटे एवढी प्रदीर्घ भेट झाली, बोलणे नेमके काय झाले ते येथे सांगणे अशक्य पण बहुतेक वेळ मी आणि राज्यपाल भाऊंचे बोलणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. माननीय राज्यपालांच्या भेटीतला मी मुद्दाम काढलेला एक विषय मात्र येथे गुपित न ठेवता सांगतो पण तत्पूर्वी एक आठवण सांगतो. १९८७ दरम्यान अभिनेत्री स्मिता पाटीलचे बाळंतपणात निधन झाले. येथे नाव सांगत नाही पण एका फार मोठ्या नेत्यांबरोबर मी शिवाजी पार्क मैदानावर स्मिताच्या अंत्यदर्शनाला गेलो. त्यानंतर जवळपास ३-४ महिन्यानंतर खार परिसरात जेथे स्मिताचे वडील शिवाजीराव पाटील राहायचे त्यांच्या घरी याच नेत्यांबरोबर प्रत्यक्ष सांत्वन करण्याकरिता गेलो. थोड्यावेळाने लहानग्या प्रतीकला विद्याताई बाहेर घेऊन आल्या. त्या आईविना प्रतीक ला बघून आम्हा दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटले आम्ही चक्क रडून घेतले. पुढे प्रतीक जसजसा मोठा व्हायला लागला कधीतरी तो राज बब्बरच्या जुहूच्या बंगल्यातून बाहेर पडतांना दिसायचा. ३-४ वर्षांपूर्वी नागपूरचे गिरीश गांधी घराब्याचे नाते म्हणून जे गिरीश गांधी गेल्या ३० वर्षांपासून दरवर्षी स्मिता स्मृती विशेषांक नियमित काढतात जेव्हा शिवाजीरावांनी त्यांच्या घरी भेटायला गेले, काळजीच्या स्वरात शिवाजीराव म्हणाले, मी अस्वस्थ आहे कारण प्रतीकांच्या सवयी चांगल्या नाहीत…
आणि अलीकडे त्यावर स्वतः प्रतीक बब्बरने स्वतःच खुलासा केला कि तो वयाच्या १३ व्या वर्षांपासून ड्रग्स घ्यायला लागला आहे. वास्तविक एक उत्तम अभिनेत्रीचा आईविना मुलगा, अभिनेता म्हणून स्मितप्रतीकला नक्की दर्शकांनी खूप खूप डोक्यावर घेतले असते पण या डेंजर व्यसनाने प्रतीकचा घात केला, बघूया प्रतीक त्यातून केव्हा आणि कसा बाहेर पडून आपल्या डोळ्यांचे पारणे कसे फेडतो ते. नेमका हाच धागा पकडून मी माननीय राज्यपालांना म्हणालो कि आमच्या या महा महाराष्ट्राला ड्रग्सच्या पसरणाऱ्या विळख्यातून तातडीने बाहेर काढायला रा. स्व. संघाला सांगा. जेथे उत्तम संस्कार हमखास केले जातात असे संत महाराज कीर्तनकार प्रवचनकार आणि रा. स्व. संघासारख्या देशप्रेमी,हिंदुप्रेमी संघटना इत्यादींनी अतिशय तातडीने या ड्रग्स विरोधी मोहिमेत सहभागी होऊन उडता महाराष्ट्र होणार नाही असे काहीतरी उत्तम कार्य घडवून आणायला हवे. जेव्हा काही वर्षांपूर्वी हिंदुतर धर्मांधांनी महाराष्ट्रात किंवा अख्ख्या देशात, हिंदुस्थानात व्यापक धर्मांतर घडवून हिंदूंना बाटवायला सुरुवात केली होती त्यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी वीर सावरकर यांच्यासारखे कडवे समाज पुरुष किंवा रा. स्व. संघ इत्यादी पुढे सरसावले आणि त्यांनी जसे फार मोठ्या प्रमाणावर होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यात बरेचसे यश मिळविले तेच आता यापुढे ड्रग्स विरोधी मोहिमेत अग्रेसर असणाऱ्यांना व्यसनाधीनता रोखण्याचे आणि नव्या पिढीला व्यसनमुक्त करण्याचे किंवा व्यसनांपासून दूर ठेवण्याचे कार्य हाती घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा हिंदूंचा ह्रास शंभर टक्के मोठ्या प्रमाणावर होणार आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी