एकनाथ खडसे जरा धीरेसे : पत्रकार हेमंत जोशी
भलेही काँग्रेसचे, काँग्रेसच्या नेत्यांचे आचार किंवा आचरण त्यातल्या अनेकांचे चांगले नसेल पण काँग्रेसचे विचार मात्र संपू नयेत तसेच शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा अजेंडा जरी कॉमन असला तरी सेनेचे मराठी माणसाच्या हक्कासाठी जे सुरुवातीला लढणे झगडणे होते ते कायम टिकावे असेच राज्यात साऱ्यांना अगदी मनापासून वाटते पण उद्धव ठाकरे या एकेकाळच्या किंवा आत्ता आत्ता पर्यंतच्या अत्यंत यशस्वी अशा शिवसेना प्रमुखाला कोठून अवदसा आठवली आणि त्यांनी मातोश्री बाहेर पडून म्हणजे आपण राजा आहोत, हे विसरून ते थेट प्रधान झाले म्हणजे राजाने स्वतःचे स्वतःच्या हातानेच डिमोशन करून घेतले हे सत्य आहे. ना काँग्रेस च्या लक्षात आले ना शिवसेनेच्या लक्षात आले कि शरदबाबू यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले, शरदबाबूंनी एकाचवेळी या राज्यातली काँग्रेस आणि शिवसेना त्या दोघांनाही सत्तेचे गाजर दाखवत संपवून टाकले असे निदान आजचे तरी स्पष्ट नक्की चित्र आहे. एकाचवेळी बायको मिळाली पण घटस्फोटित देखणी उफाडि मेहुणी देखील कायमस्वरूपी बहिणींबरोबरोबर तिच्या सासरी अगदी हनिमून पासूनच राहायला आली, हे असे शरद पवारांच्या बाबतीत शिवसेना व काँग्रेसचे झाले घडले. यापुढे या राज्यात पुढल्या अनेक वर्षांसाठी फक्त आणि फक्त शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मानणारे सत्तेत दिसले तर निदान मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही आणि त्याचसाठी मी उद्धवजींना हे वारंवार सुचवतो आहे कि त्यांनी सध्याच्या अतिशय सडक्या अशा सरकारमधून थेट बाहेर पडावे आणि शिवसेनेची विसकटलेली घडी नीट बसवावी…
गेल्या काही दिवसात पुन्हा एकवार भाजपा नेते एकनाथजी खडसे यांची राजकीय फडफड आणि शिवसेना नेते संजयराऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रदीर्घ चर्चा करणे हे दोन विषय चवीचा करमणुकीचा किंवा थोडाफार राजकीय खळबळीचा विषय ठरले त्यापैकी एकनाथ खडसे यांचा आता सिनेमातला प्रदीप कुमार झाला आहे म्हणजे सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट च्या जमान्यात प्रदीप कुमार हिरो होता नंतर त्याच्या अभिनयाच्या दिसण्याच्या मर्यादा दर्शकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला लीड भूमिका मिळेनाशा झाल्यावर तो पॉट भरण्यासाठी वाट्टेल त्या भूमिका स्वीकारू लागला. पण नाही म्हणायला त्याने आधी धडपड नक्की केली कि पुन्हा एकवार लीड भूमिकेत सिनेमे करता येतील का पण ते शक्य नव्हते कारण देखण्या तगड्या धर्मेंद्र सुनील दत्त फिरोज खान राज कुमार राजेंद्र कुमार यांचा जमाना सुरु झाला होता त्यामळे प्रदीप कुमार रहमान यांच्यासारख्या आजोबा दिसणाऱ्या वाटणाऱ्या हिरोंची धडपड आपोआप थांबली, संपली तेच राज्याच्या राजकारणात, जळगाव जिल्ह्यात, खान्देश परिसरात आणि भाजपा वर्तुळात एकनाथ खडसे यांचे नेमके हे असेच झालेले आहे त्यांनी राजकारणात आणि भाजपा मधेच प्रदीप कुमार यांच्यासरख्या मिळतील त्या भूमिका स्विकारुन शांत राहावे गप्प बसावे त्यातच त्यांचे मोठे राजकीय हित साधल्या जाईल म्हणजे त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर देखील त्यांच्या सुनेला बायकोला मुलींना आणि इतरही नातेवाईकांना भाजपामध्ये सत्तेमध्ये काहीतरी नक्की स्थान मिळत राहील अन्यथा खडसे यांनी हि अशीच गडबड व बडबड सुरु ठेवली तर त्यांना आणि सुरेशदादा जैन यांना जैन हिल्स वर एकत्र बसून टाळ पिटून दिवस घालवावे लागतील. कधीकाळी जळगाव जिल्ह्यात कायम नेते म्हणून आघाडीवर असलेले बसलेले सुरेशदादा ज्यांना त्यांचा राजकीय आत्मविश्वास नडला आणि ते बाजूला फेकल्या गेले तशी वेळ आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर येऊ नये असे जर एकनाथ खडसे यांना वाटत असेल तर त्यांनी सुरेशदादा यांना जशी पक्ष बदलण्याची अत्यंत वाईट होती तशी सवय लावून घेऊन भविष्यातले मोठे राजकीय नुकसान करवून घेऊ नये असे निदान मला तरी वाटते…
नेत्यांनी राजकारणात नितीन गडकरी व्हायचे असते म्हणजे राजकारणातली पडती बाजू दिसायला लागल्यावर चार पावले मागे येऊन गप्प बसायचे असते अशाने होणारे मोठे राजकीय व आर्थिक नुकसान टाळता येते. राजकारणात तसेही प्रत्येक बहुतेक नेत्यांना आपले आर्थिक नुकसान करवून घ्यायचे नसते त्याचे त्याला मग फार वाईट वाटते आणि एकनाथ खडसे तर राजकारणातील अर्थकारणात माहीर नेते म्हणून ओळखल्या गणल्या जातात त्यांना असे आर्थिक व राजकीय नुकसान करवून घ्यायचे नसेल तर राजकारणातल्या या प्रदीप कुमारने निदान काही काळ शांत बसावे नंतर पुन्हा आपल्या पक्षात राजकीय पकड आणि विश्वास निर्माण करून शरद पवार यांच्यासारखे उतार वयात देखील राजकीय फिनिक्स पक्षी होऊन झेप घ्यावी. आपले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन फार भले होणार आहे या भ्रमात एकनाथ खडसे यांनी राहू नये जसे एकेकाळी शरद पवार यांच्याच सोबत जाऊन सुरेशदादा जैन यांनी मोठे राजकीय नुकसान करवून घेतले होते. जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज आणि मराठा नेते हे सुरेशदादा जैन या मारवाड्यासमोर किंवा एकनाथ खडसे या लेवा पाटील असलेल्या म्हणजे मराठ्यांना न चालणाऱ्या नेत्यांसमोर झुकावे वाकावे असे शरद पवार यांना कधीही सहन होणारे नाही सहन झाले नाही त्यामुळे अस्वस्थ शरद पवार यांनी जसा राजकारणात सुरेशदादा जैन यांचा पार लोचा करून ठेवला तीच वेळ ते नक्की एकनाथ खडसे यांच्यावर आणून शरद पवार नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसून मोकळे होतील. अर्थात मी सांगितले आणि एकनाथ खडसे यांनी ऐकून राष्ट्रवादी मध्ये जाण्याचे रद्द केले असे नक्की होणारे घडणारे नाही पण एकाचवेळी लेवा, गुजर आणि मराठा पाटील या तिघांवरही जर एकनाथ खडसे यांना राजकीय पकड अशीच कायम ठेवायची असेल तर त्यांनी जीर्ण होत चाललेल्या आपल्या शरीराला डोक्याला विनाकारण अधिक ताप देऊन त्यांचे ज्या आपल्या स्वतःच्या खडसे कुटुंबावर मोठे प्रेम आहे त्या खडसे कुटुंबाचे आणि स्वतःचे होणारे राजकीय नुकसान टाळावे. दिवस योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांचे आहेत जसे एकेकाळी भाजपामध्ये दिवंगत प्रमोद महाजन यांचे स्थान होते कारण नरेंद्र मोदींच्याच तसे मनात आहे कि या दोघांना राष्ट्रीय नेते म्हणून वरच्या रांगेत आणण्याचे तेव्हा खडसे यांनी केव्हाही चार पावले मागे येणे त्यांच्यासाठी हिताचे आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी