बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी
ज्या वेगाने बुवा बाबा महाराज तुरुंगात चालले आहेत म्हणजे आसाराम गेले, राम रहीम गेले, उद्या शासनाच्या आणि लोकांच्या मनात आले तर अनिरुद्ध बापू, नरेंद्र महाराज, भय्यू महाराज असे अनेक जातील मग आस्था वाहिनीचे, सिधा प्रसारण जेल से ही होगा…
अनिरुद्ध बापू उच्चशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, त्यामुळे नेमके काय करावे काय करू नये कुठे पुढे जावे कुठे मागे यावे कुठे थांबावे त्यांना तंतोतंत कळते, अलिकडल्या चार दोन वर्षात बुवा बाबा चले जाव, चळवळीला जोर आल्याने या अनिरुद्ध बापूने आपले मांडलेले दुकान आणि थोतांड बऱ्यापैकी मागे घेतले, अन्यथा चळवळीतल्या लोकांनी ठरविले होते, बापूंचा गणपती बाप्पा मोरया करायचाच. अमुक एखादा बुवा बाबा नकळत अज्ञानातून जमलेल्या भक्तांना कितीपट उल्लू बनवू शकतो त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनिरुद्ध बापू, त्याने आपल्या भक्तांवर अशी काही जादूची कांडी फिरविली होती कि पूर्वी कसे एका पाठोपाठ ज्युबिली सिनेमे देणारा राजेंद्रकुमार वास्तविक दिलीपकुमारच्या अभिनयाची हुबेहूब नक्कल करणारा, पण पुढे पुढे तो दर्शकांच्या गळ्यातला असा काही ताईत झाला कि दर्शकांना वाटू लागले होते, दिलीपकुमारच त्या राजेंद्रकुमारची नक्कल करतो. बापूंच्या बाबतीत नेमके तेच घडले म्हणजे त्यांच्या भक्तांना पुढे पुढे असे वाटू लागले होते बापू हे शिर्डीच्या साईबाबांचे अवतार नसून शिर्डीचे साईबाबा हेच बापूंचे अवतार आहेत. उल्लू बनविणारा तेवढ्या ताकदीचा पाहिजे, मग असे भोळे भक्त या बुवा बापू महाराजांना परमेश्वराचा अवतार नव्हे साक्षात परमेश्वर मानून मोकळे होतात…
मला अशा पुरुषांची मनापासून कीव येते कीव यासाठी करावीशी वाटते कि ते आपल्या घरातल्या तरण्या आणि सुंदर स्त्रियांना या अशा बुवा महाराजांच्या दरबारी कुठलाही विचार न करता पाठवून मोकळे होतात, नंतर पश्चाताप करून उपयोग नसतो, मुकाट्याने झालेला अत्याचार आणि झालेली फसवणूक सहन करावी लागते. तो बापू किमान उच्च शिक्षित असल्याने भेटणाऱ्याशी विविध विषयांवर डिबेट तरी करण्याच्या लायकीचा आहे, अर्थात लायकी असूनही आपल्या बुवाबाजीवर आमच्यासारख्यांशी डिबेट करण्याची त्याची हिम्मत होत नाही तो भाग वेगळा पण नरेंद्र किंवा भय्यू तर तेथेही कमी पडतात कारण नरेंद्र तर एकदम अडाणी जेमतेम शिकलेला आहे आणि भय्यू महाराज आपण स्वतः काय बोलतो, त्यांचेच त्यांना काळात नाही, मार्केटिंग फंडा मात्र या साऱ्यांचा एवढा जबरदस्त कि राम रहीम यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार्या या अशा तद्दन बदमाश बुवांच्या पायाला जेव्हा या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती स्पर्श करून मोकळे होतात, अंगाची अशावेळी रागाने लाही लाही होते…
अलीकडे गौरी ब्रम्हे नामें माझ्या एका फेस बुक फ्रेंड ने पोस्ट केलेला एक किस्सा दाद द्यावा असा किंवा डोळ्यात अंजन घालणारा. ती लिहिते, ‘ कराडला आमच्या शेजारी पाटील आडनावाचे कुटुंब राहायचे. त्यांच्या पूर्ण कुटुंबावर नरेंद्रमहाराजांची कृपा होती. त्यांच्यावर या नरेंद्रमहाराजांचा एवढा पगडा होता कि त्यांनी बंगल्याचे आणि नातवाचेही नाव नरेंद्र ठेवले होते. एके रात्री या महाराजांचे बिंग फुटले आणि काय आश्चर्य पुढल्या एक दोन दिवसात, पाटलांनी अक्षरांमधला सु काढला, बंगल्याचे आणि नातवाचे नव्याने नामकरण करून सुरेंद्र ठेवले…”
मी तुम्हाला नेहमीच सांगत आलोय कि मला या असल्या बुवा बाबांची कधीही भीती वाटत नाही, भीती वाटते ती त्यांच्या भक्तांची. ते त्यांना देव मानतात, आणि कोणत्याही भक्ताला आपल्या देवाचा झालेला अपमान सहन होत नाही, मी समजा गणपती भक्त असेल आणि उद्या जर गणपतीची एखाद्याने टिंगल टवाळी केली तर….तेच या बुवा बाबांच्या नदी लागलेल्या अजाण आणि अज्ञानी भक्तांचे, मोठे कठीण असे काम असते त्यांना यांच्या मगर मिठीतुन सोडविण्याचे…प्राध्यापक राजा आकाश यांनी एके ठिकाणी फार छान लिहून ठेवले आहे, ‘ एखाद्या व्यक्तीला असलेल्या चिंता, अडचणी, दुःख सुरुवातीला तो आपल्या जवळच्या लोकांशी, मित्रांशी, कुटुंबाशी शेअर करतो पण ते त्याला या
समस्यांमधून कसे बाहेर पडायचे, हे सांगायला असमर्थ ठरतात. शिवाय एखाद्याचे रडगाणे वारंवार ऐकून घ्यायला कुणाला आवडत देखील नाही. त्यातून त्या व्यक्तीची हतबलता वाढते व तो मार्ग शोधू लागतो. बुवा, बाबांच्या मार्केटिंगमुळे त्याच्या सहज जाळ्यात अडकतो. ‘ आकाश म्हणतात तेच शंभर टक्के सत्य आहे. येणारे किंवा आलेले नैराश्य या अशा भंपक बिलंदर बदमाश बुवा मंडळींकडे व्यक्त न करता, उलट कोणतीही लाज न बाळगता जर आपण मानसोपचार तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेतला तर नालायक बुवा मंडळींकडून होणारी फसवणूक सहज टाळता येते. अत्यंत महत्वाचे म्हणजे अलीकडे यांच्यातल्याच एका भामट्या बुवाच्या मुलीला बापाच्या विविध विकृत कृत्यातून नैराश्य आल्यानंतर तिने सरळ मानसोपचार तद्न्य असलेल्या माझ्या एका मित्राला गाठले, त्याच्याकडून उपचार करवून घेतले, मार्गदर्शन घेतले, आज ती सुखी आहे, जे तिने केले ते तसे आपणही करायला हवे…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी