पाजी बुवाबाजी : पत्रकार हेमंत जोशी
१९८७ जून दरम्यान मी कायम वास्तव्यासाठी मुंबईत आलो, आल्या आल्या एका वेगळ्याच पहिल्या वाहिल्या संकटाला सामोरा गेलो, तोपर्यंत पत्रकारितेत येऊन वास्तविक ६-७ वर्षे उलटलेली होती पण मानहानीचा दावा तत्पूर्वी कधी माझ्यावर दाखल झालेला नव्हता. येथे मुंबईतल्या विविध दैनिकातून त्याकाळी जोशी आडनावाचे भविष्य सांगणारे गृहस्थ तुमची कोणतीही समस्या गायत्री मंत्राच्या उपासनेने हमखास दूर करतो, अशी जाहिरात करून खूप पैसे लोकांकडून उकळायचे. मी ते थोतांड बाहेर काढले, जोशींनी जोशींवर लिहिले, मग त्या जोशींनी या जोशींवर मानहानीचा, अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. हा अनुभव नवीन होता. त्यादरम्यान माझ्यावर संकटाच्या मालिका सुरु होत्या, वयाने अगदीच लहान त्यात अत्यंत कटकटीची आणि मोठी कौटुंबिक जबाबदारी खांद्यावर होती, आयुष्यात कोणताही प्रसंग आला तरी घाबरून कोलमडून गांगरून जायचे नाही, ठरविलेले होते. न्यायालयात खटला सुरु झाल्यानंतर एक दिवस माझ्या वकिलाला बाजूला सारून मी नेमके काही सांगू का, न्यायाधीशांना विचारले, ते हो म्हणाले आणि मी बोलायला सुरुवात केली..त्यांना म्हणालो, मी ब्राम्हण आहे, मौंज झाल्यानंतर गायत्री मंत्राची उपासना करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे मला वडिलांनी सांगितले होते, त्यामुळे मौंज झाल्यानंतर मी गायत्री मंत्राची उपासना सुरु केली नक्कीच त्याचे मला अनेक चांगले अनुभव आले, हा मंत्र इच्छापूर्ती करणारा आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण ह्या मंत्राच्या उपासनेमुळे मला व्यक्तिगत फारतर माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल, हे जोशी महाशय तर गायत्री मंत्राच्या भरवशावर सरळ सरळ लोकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी, समस्यां सोडविण्याचे कंत्राट घेऊन मोकळे होतात आणि हे असे शक्य असेल तर मला माधुरी दीक्षित मनापासून आवडते, मी न्यायालयाकडे एक लाख रुपये जमा करतो, आणि हे मागतील तेवढी मुदत त्यांना देतो, त्यांनी माझ्यासाठी उपासना करावी तेवढी माधुरी दीक्षित मला बायको म्हणून आणून द्यावी. आणि येथे खटला संपला, अर्थात मी निर्दोष सुटलो…
शरद उपाध्ये असोत कि जितेंद्रनाथ महाराज किंवा अन्य कोणीही, या बुवाबाजीच्या नादि लागून आपले आयुष्य अधिक अडचणीचे करून ठेवू नका. आपल्या राज्यात खरे साधू संत महाराज असतीलच तर त्यांनी या राज्यातील फसव्या महाराजांची यादी जाहीर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. माझ्या एक असे लक्षात आले आहे कि या अशा बुवांच्या भोवती अक्षरश: पेड एजंट्सची यंत्रणा असते. बाबा म्हणजे चमत्कार, बाबा म्हणजे परमेश्वरी अवतार, बाबा म्हणजे अमुक देवाचे थेट अवतार, बाबा म्हणजे साक्षात साईबाबा, बाबा म्हणजे थेट दत्ताचे अवतार असे विविध प्रचार आणि प्रसार हे नेमलेले एजंट भक्तांच्या रूपात विविध माध्यमे वापरून पद्धतशीरपणे करतांना दिसतात, विशेषतः त्यांच्यासाठी विविध वाहिन्या उत्तम मार्ग आहे, तेथून या अशा बुवांना अतिशय झपाट्याने प्रसिद्धी मिळते, भक्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. या अशा भामट्या बुवांच्या आश्रमातून प्रसारित करण्यात येणारे साहित्य अवश्य नजरेखालून घाला, त्यात अमुक एक बुवा बाबा साक्षात परमेश्वर कसे त्यांचे चमत्कार कोणते, हमखास पटवून सांगितलेले असते, अडचणीत सापडलेल्यांना नेमके हे असे लिखाण वाचायला देतात आणि माणसे भक्त होऊन जाळ्यात अडकतात, परमेश्वरी शक्तीला प्रसंगी बाजूला सारून या तद्दन चालू बुवांच्या नदी लागून अडचणी वाढवून घेतात, आर्थिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर नाडले जातात….
हे बघा मी काही बुवाबाजीच्या विरोधात चालविण्यात येणाऱ्या आंदोलनातला एक स्वयंसेवक नाही केवळ पत्रकार आहे. मी श्याम मानव नाही, नरेंद्र दाभोलकर नाही, ज्ञानेश महाराव नाही, राजा आकाश नाही, अनिल अवचट नाही, पुरुषोत्तम आवारे पाटील नाही, मुक्ता दाभोलकर नाही, अतिशय सामान्य पत्रकार आहे पण हे माहित आहे कि या राज्यातली ९० टक्के बुवाबाजी फसवी आहे, लबाड आहे, लुटारू आहे, पाखंडी, बदमाश, हलकट, नालायक आहे त्यात आमचा सामान्य माणूस अडकून पडू नये म्हणून सततचे हे लिखाण सुरु आहे. लोकांकडून सक्तीने वर्गण्या जमा करायच्या आणि गणपतीच्या दहाही दिवसात मध्यरात्र उलटली कि जुगार खेळायला सुरुवात करायची, त्यातून सामान्य माणूस देवापासून दूर होऊन या अशा भामट्या बुवांच्या नादी लागत चाललाय कि काय, शंका मनाला चाटून जाते…
मागेही मी एकदा जाहीर सांगितले होते कि मी आणि माझे कुटुंब आता हयात नसलेल्या पण बेळगाव निवासी कलावती आई यांचे शिष्यत्व पत्करलेले आहे, त्यांच्या चमत्कारावर नव्हे तर विचारांवर आधारित आम्ही सारे वागण्याचा प्रयत्न करतो, त्यातून काही चांगले अनुभव आले आहेत, अगदी मनातले सांगतो, मी उभ्या आयुष्यत माझ्या पत्नीचे काहीही एक ऐकले नाही, त्याला कारणे वेगळी आहेत पण तिने सांगितलेले एक काम तेवढे केले, आम्ही सारे कलावती आईचा गुरु मंत्र घेऊन मोकळे झालो आहोत. पण कुटुंबाच्या शपथेवर सांगतो कि कलावती आई चांगल्याम्हणून इतर सारे वाईट, असे अजिबात नाही, मी अगदी मनापासून शेगाव किंवा शिर्डीला जातो, संत मला वावडे नाहीत, भामट्या बुवांचा मात्र मी नक्की कर्दनकाळ आहे. आश्चर्य म्हणजे कलावती आईचे असे एकमेव मंदिर या जगात असावे जेथे हात जोडायला येणाऱ्यांनी जर पैशांची बात केली किंवा पैसे ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तेथल्या तेथे अडविले जाते….
दाभोलकरांनी जे म्हटले आहे तेच एक सत्य आहे, बुवाबाजी हा बरकीतिला आलेला एक धंदा आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये हे वाक्य बुवाबाजीला फार चपखलपणे लागू पडते. माणसे जणू फसायला बसलेलीच असतात. अत्रे म्हणाले होते तेच खरे आहे, बुवा, बाबा, महाराज म्हणजे वासनांचे स्वार्थाचे लोभीपणाचे लंपटपणाचे व्यभिचाराचे जणू धगधगते कुंडच, परंतु आमची सारी अक्कल जणू त्यांच्यासमोर लुळी पडते..
जाता जाता : अलीकडे असेच एक बुवा मी जेथे पोहायला जातो त्याठिकाणी म्हणजे जुहूच्या पाम ग्रोव्ह हॉटेलमध्ये सहकुटुंब पोहायला त्यांनी सुरुवात केली होती, पोहताना आधी काही दिवस त्यांच्या थापा ऐकून घेतल्या, नंतर एक दिवस माझी खरी ओळख सांगितली, काही अंक त्यांना वाचायला दिले, आणि काय आश्चर्य, दुसर्या दिवसापासून हे बाबा गायब, त्यांचे पोहणे बंद, आमचे त्यांना पाहणे बंद, आजतागायत..
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी