हे करून बघा : पत्रकार हेमंत जोशी
इतरत्र जे सहसा आढळत नाही ते आपल्याकडे वारंवार सतत दरक्षणी बघायला, अनुभवायला का मिळते, नेमके काळत नाही. म्हणजे जगात असे कोठेही नाही कि हॉटेलात शिरलेले ग्राहक इतरांच्या ताटाकडे प्लेट कडे बघत आपली जागा पकडते आणि वेटरला ऑर्डर देतानाही चक्क त्या तमुक टेबलावरला पदार्थ कोणता, हमखास विचारून मग ऑर्डर सोडते, किती हे लाजिरवाणे, पण तरीही आम्ही मराठी आणि भारतीयही हे असे करतो, मॅनर्स सोडून वागतो..
खाजगी आयुष्यात मी सांगतो ते सोडून तर बघा म्हणजे दुसऱ्याला टोमणे मारणे किंवा घरी दारी लहान मोठा न बघता समोर आलेल्यांना घालून पाडून बोलणे. दुसऱ्यांच्या कायम चुका काढण्यात स्वतःला धान्य समजणे, विशेष म्हणजे दुसऱ्याला यश मिळाले रे मिळाले कि आपल्या पोटात दुखते, त्याने दहा मिळवलेत का मग आपण वीस मिळविण्याचा प्रयत्न करू हा साधा सरळ सकारात्मक विचार का म्हणून आपल्या डोक्यात घोळत नाही…कायम आपण बघतो अनुभवतो कि दुसऱ्याच्या संपत्तीवर आणि परस्त्रीवर सतत आपण घारीसारखी नजर ठेवून असतो, चान्स मिळाला रे मिळाला कि दुसऱ्याची संपत्ती व स्त्री भारतीयांनी पळवलीच म्हणून समजा. दुसऱ्याची कागाळी करणे किंवा दुसऱ्यांच्या दुख्खात कायम आपले सुख मानणे किंवा दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणे किंवा दुसर्यांशी सतत स्वतःची तुलना करणे, अत्यंत चुकीचे आहे…
साधे सोपे सरळ असे आयुष्याचे हे गणित आहे कि अमुक एखादी गोष्ट आपल्याकडे कमी असते दुसर्यांकडे ज्यादा दिलेली असते, पण जे अधिक मिळालेले आहे त्यावर समाधान न मानता कायम दुसऱ्यांविषयी असूया बाळगणे त्याने आपलेच नुकसान होते,प्रकृती स्वास्थ्यावर मनातल्या द्वेषातून मोठा परिणाम होऊन अनेक व्याधी विनाकारण आपण लावून घेत आलो आहे असे माझे मत आहे, तुमचेही तेच मत नक्की असेल….दुसऱ्याच्या ताटातला लाडू भारतीयांना हमखास मोठा वाटतो, मग आपण स्वतःला दुसऱ्याच्या ताटातला लाडू हिसकावून घेण्यासाठी गुंतवून घेतो, मात्र हे लक्षात ठेवा, आपण जेव्हा दुसरीकडे गुंतवून घेतो, अशावेळी आपल्याही ताटातल्या लाडूकडे एखाद्याचे मन गेलेले असते, पश्चाताप होतो कारण आपली ती मनोवृत्ती नाही कि दुसर्यांचा लाडू आपण खाणे आणि आपला लाडू दुसऱ्याला देणे, समझ गये ना आप? दुसर्याशी सतत स्पर्धा नसावी, आपला दर्जा वाढवावा. दुसऱ्यांशी स्वतःशी तुलना करू नये आणि सतत स्पर्धा देखील करू नये. हृदयविकार असलेला माणूस कसे म्हणून पी. टी उषाच्या पुढे मी धावायलाच हवे हा विचार करतो. अहो, जे सनी लिओनीला जमले ते विनोद तावडेंना नक्कीच जमणार नाही आणि जे लपून छपून समजा विनोद तावडेंना जमेल ते उद्या नक्कीच सनी लिओनीला जमणार नाही. अनेक वाईट गोष्टी माणसाने व्यक्तिगत आयुष्य जगतांना सोडून द्याव्यात. इतरांच्या सतत फालतू चौकशा करणे किंवा दुसऱ्याला कमी लेखून मीच फक्त कसा श्रेष्ठ हे इतरांना सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे तसे. चुकीचेच आहे. माझा आवाज डिट्टो लता सारखा आहे हे आपणहून सांगून लोकांना आपल्यावर हसण्याची संधी दिल्यापेक्षा, लोकांना म्हणू द्या कि तुम्ही डिट्टो लता किंवा आशा किंवा उषा आहात…
अहंकार गर्व उर्मट स्वभाव खोटा अहंकार स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पना, इतरांविषयी त्यांच्या पाठी वाईट बोलणे, कागाळी करणे, खोटे नाटे सांगणे हे सारे सोडून द्या, नेमकी वस्तुस्थिती सांगून मोकळे व्हा, खोटे सांगून मिळणारे यश हमखास क्षणभंगुर ठरते हे कायम लक्षात ठेवा. माझ्यासारखा फक्त मीच असेही सांगत सुटणे सोडून द्या, हे सोडले नाही तर लोक मान वाळवून तुमच्यासमोरून निघून जातात. इतरांना वेड्यात काढणे किंवा मीच तेवढा कसा हुशार सतत सांगण्याचा प्रयत्न करणे हे सारे दुर्गुण शरीरातून तडकाफडकी काढून टाका त्यातच साऱ्यांचे हित आहे, असते…घरात बाहेर मित्रपरिवारात नातेवाईकांमध्ये बोलतांना केवळ मीच ज्ञानी हुशार बुद्धिमान आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो थोडक्यात सभोवतालच्यांना कमी हीन दर्जाहीन लेखणे किंवा भोवताली असलेल्या प्रत्येकाला वेड्यात काढणे चुकीचे आहे. सुरुवातीला तुमची हि अशी अतिहुशारी लोकांची करमणूक करते पण एकदा का लोकांच्या हे लक्षात आले कि हा बसता उठता समोरच्यांना वेड्यात काढतो, घालून पडून बोलतो, मुर्खात काढतो, मीच तेवढा शहाणा समजून सभोवताली उद्धट वागतो, या अशा वागण्याने माणसे दूर जातात, मोस्ट व्हिमजिकल अशी समजूत करवून घेऊन कायमचे दूर होतात. मित्रांनो, चांगले द्या चांगले मिळेल. वाईट दिले तर वाईट होईल, थोडक्यात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..
अमुक एखादी व्यक्ती चतुर बुद्धिमान बोलकी मेहनती तल्लख अभ्यासू जाणकारबहुगुणी सावध माणसे जोडणारी चुणचुणीत गुणाढ्य कुशाग्र बुद्धीची असली कि काय घडू शकते त्यावर अलीकडेच प्रशासकीय अधिकारी म्हणून बढती मिळालेल्या राजेश नार्वेकर या प्रशासकीय अधिकाऱ्याचे उदाहरण देतो. नार्वेकर अगदी अलीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून रुजू झाले आहेत, सिनियर मोस्ट पद त्यांना त्यांच्या वागणुकीतून पदोन्नती मिळताच पटकन मिळाले आहे. परमेश्वराने त्यांना जणू हि दिवाळी-दसर्याची भेट पाठविली आहे. या पोस्टवर येण्यासाठी अनेक सिनियर्स प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होती, स्पर्धेत होती, नार्वेकर म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांमधले कालचे पोर तरीही त्यांना हे महत्वाचे आणि मानाचे पद मिळाले आणि त्यांना हे मिळलेले पद इतर कोणत्याही स्पर्धकांच्या डोक्यात गेले नाही कारण नार्वेकर यांचे सर्वांशी सभयतेने आणि आश्वासक वागणे. पूर्वी ते याच मुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून काम करीत असतांना प्रवीण परदेशी किंवा मिलिंद म्हैसकर इत्यादी मान्यवर अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्य शैलीतून भावले होते, मी तर असे ऐकले आहे कि दस्तुरखुद्द मिलिंद म्हैसकरांनी राजेश नार्वेकर या पदासाठी कसे योग्य आहेत, मनापासून मुख्यमंत्रीनां सांगितले, अर्थात मुख्यमंत्र्यांचे तेच मत होते त्यामुळे प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळताच केवळ वर्षभराच्या आत नार्वेकर या अशा उच्चस्थानी सर्वगुण संपन्न असल्यानेच जाऊन बसले….
खरोखरी प्रशासकीय अधिकारी हे अनेकदा माझ्या कौतुकाचे आणि कुतूहलाचे विषय असतात. या राज्यात सर्वाधिक आव्हानात्मक पद पोस्ट कोणती असेल तर ते आहे मुंबई महापालिकेचे ‘ यशस्वी’ आयुक्त म्हणून काम करणे, जे सध्याच्या अजोय मेहतांना तंतोतंत जमले आहे. सतत, अगदी २४ तास या पदावर काम करणाऱ्यांना आव्हान असते. अजोय मेहतांचे उदाहरण द्यायचे झाल्यास त्यांना एकाचवेळी साऱ्याच्या सार्या राजकीय पक्षांचा या पक्षात काम करणाऱ्या विशेषतः गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांचा त्रास होतो, काम करवून घेण्यासाठी सतत दबाव येतो त्यात हाताखाली काम करणारे महापालिकेतले बहुतेक सारेच अति भ्रष्ट नालायक आणि हलकट, फार कमी देव माणसे महापालिकेच्या वर्तुळात आपल्याला आढळतात. अत्यंत आणीबाणीचे मुंबई महापालिकेचे वातावरण असते तरीही अजोय मेहता किती कुल राहून कामे करतांना ड्युटी निभावताना आपण सारे बघतो, एखादा भडक डोक्याचा असेल तर जागच्या जागी हृदयविकाराच्या झटक्याने देवाला बिलगून मोकळा होईल, चौफेर अभ्यास असणार्यांचेच हे काम आहे, अजोय मेहता येथे सर्वांना पुरून उरले आहेत, कौतुक वाटते. अधून मधून ज्यांच्याविषयी जाणून घेणे तुमचे औस्युक्य असते त्या प्रशासकीय अधिकार्यांविषयी मी नक्की आगळी माहिती देऊन मोकळा होईल. गुणांचा गौरव आयुष्यात कसा होतो, त्यावर हि दोन उदाहरणे येथे मांडली, खास तुमच्यासाठी वाचकांनो….
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी