पवारांचा पराजय : दिलीप माणगावे
पवार साहेब अदानी आणि अंबानी महाराष्ट्रात केंव्हाच आले आहेत. सहकारी आणि समाजवादी व्यवस्थेचा टराटरा बुरखा फाडणारी दैनिक पुढारी मधील दत्त इंडिया कंपनीची जाहिरात वाचा. दैनिक पुढारी या दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकात २० जानेवारीच्या अंकात श्री दत्त इंडिया या कंपनीची दोन पूर्ण पानी जाहिरात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील लुटीचा पर्दाफाश करणारी आहे.सरकारी संरक्षणाचा लाभ घेवून ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरंजामी पुढार्यांकडून होणारी लूट हा काही आता नवा विषय राहिलेला नाही.सांगली म्हणजे सहकाराची राजधानी. वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेला साखर कारखाना त्यांच्या हयातीत चांगला चालला.फक्त दादा या नावावर त्यांच्या वारसांनी अनेक वर्षे खासदारकी आणि आमदारकी मिळवली.दादांच्या नंतर एकेक संस्था डबघाईला आल्या….
साखर कारखाना त्यापैकी एक प्रमुख संस्था. या कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले.या कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. गेली अनेक वर्षे या कारखान्याच्या ऊस उत्पादकांना बिले मिळत नव्हती.कलकत्त्याच्या श्री दत्त इंडिया कंपनीने हा कारखाना १० वर्षासाठी चालवायला घेतला.रुपारेल आणि धारू हे खाजगी उद्योजक या कंपनीचे प्रमुख संचालक.कंपनीने सांगली जिल्हा बँकेचे कर्ज, शेतकऱ्यांची आणि कामगारांची जुनी देणी द्यायला सुरुवात करून कारखाना सध्यातरी चांगला चालवला आहे. याच कंपनीने न्यू फलटण शुगर हा राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचा बंद पडलेला कारखाना अवघ्या १४ दिवसांत सुरू करून करून रूळावर आणला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बंद पडलेला महालक्ष्मी दूध संघही या कंपनीने चालवायला घेवून दूध संकलन ५० हजारावरून दिड लाखावर नेले आहे.कंपनीने आता दररोज १० टन पावडर तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.ऊस, दूध कच्चा माल तोच.कामगार तेच.तीच मशिनरी.तीच तयार होणारी साखर.पॅकींगमधून पूर्वी प्रमाणे त्याच गाई म्हशींचे दूध मिळतंय…
पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी या संस्था डबघाईला आणल्या. ऊस उत्पादकांनी यांच्या चार पिढ्या खांद्यावर घेऊन नाचवल्या.यांच्या बापजाद्यापासून नातवंडांपर्यंत दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात सन्मानाने बसवले.शेतकऱ्यांचा फायदा काय झाला?डोक्यावर कर्ज.आणि हातात न मिळणार्या आरक्षणाची थाळी आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात विद्या मुरकुंबी,विल्मर, डालमिया, रूपारेल,धारू हे अदानी आणि अंबानींचे भाऊबंद कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट पुढार्यांनी बंद पाडलेले कारखाने आणि दूध संस्था विकत आणि भाड्याने घेऊन व्यवस्थित चालवत आहेत.याचे कारण काय?
आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. हा प्रामुख्याने मराठा समाज आहे. आजही आदरणीय शरद पवार साहेब या समाजाचे नेते आहेत.ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची कर्जबाजारी अवस्था त्यांना दिसत नाही काय? त्यांच्या गोतावळ्यातील माणसांनी शेतकऱ्यांची चालवलेली लूट पवार साहेब का नजरेआड करताहेत? दोन साखर कारखान्यात अंतराची अट घालून महाराष्ट्रातील औद्योगिक विकास का रोखला जातोय? पवार साहेब तुमच्या गोतावळ्याच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अजून किती दिवस गुलामगिरीत काढायचे?दिल्लीत जावून अदानी आणि अंबानी यांना विरोध करताय. पण कोल्हापूर, सांगली, सातारा या तुमच्या भागात काय चाललंय? मुरकुंबी, डालमिया,विलमर, रूपारेल,धारू या अदानी आणि अंबानी यांच्या भाऊबंदांनी तुमच्या साम्राज्यात केंव्हाच प्रवेश केला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील दूध संघांनी यशस्वीरीत्या दूध संकलन सुरू केले आहे….
भरपूर सूर्यप्रकाश,उष्ण आणि समशीतोष्ण हवामान, काटकसरीने वापरले तर पुरेसे पाणी अशी नैसर्गिक श्रीमंती असूनही महाराष्ट्रातील शेतकरी दिवसेंदिवस दारिद्री होतोय. पवार साहेब महाराष्ट्रात अदानी अंबानी केंव्हाच आले आहेत. त्यांच्यासाठी पायघड्या तुमच्याच अकार्यक्षम गोतावळ्याने घातल्या आहेत….
तात्पर्य : जातीचे, पक्षाचे,धर्माचे, प्रादेशिक अस्मितेचे बांध घालून शेतकऱ्यांचा विकास अडवता येणार नाही. पाणी जसे उताराच्या दिशेने वाहते.तसं प्रगती ही दारिद्र्याच्या दिशेने पळत सुटते. अदानी आणि अंबानींच्या नावाने खोटा कंठशोष करून काळाचे चक्र उलटे फिरवता येणार नाही. पवार साहेब तुमच्या आर्थिक धोरणांचा पराभव शरद जोशी, नरसिंहराव, मनमोहनसिंग यांनी केंव्हाच केला आहे. आता उरलाय तो केवळ राजकीय सांगाडा. तो ही आता फार दिवस टिकणार नाही…
दिलीप माणगावे, राज्य प्रवक्ता, रयत क्रांती संघटना