फडणविशीचा लेखाजोखा : पत्रकार हेमंत जोशी

फडणविशीचा लेखाजोखा : पत्रकार हेमंत जोशी 

अगदी अलीकडे राज्याचे अधिवेशन आटोपले. या पंचवार्षिक योजनेचे ते अखेरचे अधिवेशन होते, त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनेकांची भाषणे झालीत त्यात सत्ताधारी होते, विरोधात बसणारे देखील होतेच. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना आयते मिळत आल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा विधानसभेत प्रमुख विरोधी नेता म्हणून शरद पवारांना मोठी मदत होईल असे काहीही त्यांना करायचे नसते त्यामुळे त्यांनी केलेले भाषण म्हणजे अधिक पाणी मिसळलेल्या दुधासारखे ते म्हणाल तर पांचट वाटले म्हणाल तर बेचव होते. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द प्रभावी आणि यशस्वी नाही म्हणजे जयंत पाटील सोलो सभा घ्यायला गेले तर मला वाटते, ज्यांच्या सतरंजा किंवा सभेचे साहित्य पुरविण्याचे कंत्राट असेल तेवढे थांबतील आणि जमतील, इतर घरी बसून राहणे पसंत करतील…


भाषण कसे असावे आणि कसे करावे त्यात जसे दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, राज ठाकरे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आचार्य अत्रे, दिवंगत प्रमोद महाजन, खासदार अमोल कोल्हे, त्याच रांगेतले आपले मुख्यमंत्री देखील, त्यांनी त्यादिवशी या सभागृहातले या पंचवार्षिक योजनेतले काव्यमय केलेले अखेरचे भाषण तर भाजपाने सरळ सरळ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापरावे एवढे ते प्रभावी होते, अजिबात कंटाळवाणे नव्हते. पुनःपुन्हा ऐकावेसे वाटणारे ठरले, होते. नेमके भाषण खटकले ते एकनाथ खडसे यांचे. प्रेयसी सोडून गेलेला प्रियकर जसा रस्त्याने कपडे फाडून मोकाट फिरतो लोकांना हाती येईल ते फेकून मारतो वाट्टेल तसे बरळतो मोकाट सुटतो ते तसे भाषण एकनाथ खडसे यांचे वाटले. येनकेनप्रकारेण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस त्यांचे त्यादिवशी भाषणात टार्गेट होते त्यातून काहीही साध्य झाले नाही उलट फडणवीसांना अधिक सिम्पथी मिळाली, गिरीश महाजन यांना राजकीय फायदा मिळाला व खडसे यांचा नारायण राणे झाला, उघड वैताग करून राजकारणात काहीही साध्य होत नसते कारण नेत्याने स्वतःच केलेल्या चुकांतून सारे काही गमावलेले असते…


किडनी आणि नी ट्रान्सप्लांट केल्यानंतर एकनाथ खडसे यांचे प्रकृतिस्वास्थ्य तसे फारसे चांगले नसते. त्यांचे अलीकडे सुटलेले अवाढव्य पोट त्यांच्या अतिशय नाजूक तब्बेतीची ती साक्ष देते. मंत्रिमंडळातून बाहेर फेकल्या गेल्यानंतर तरी एकनाथ खडसे यांनी फडणवीस आणि भाजपा श्रेष्ठींशी जुळवून घेणे आवश्यक व त्यांच्यासाठी, त्यांच्या राजकीय वारासदारांसाठी ते मोठे फायद्याचे ठरले असते पण ते घडले नाही याउलट त्यांची लोकसभा निवडणुकीदरम्यान थेट शरद पवार यांच्याशी वाढलेल्या सलगीचीच अधिक चारचा रंगली होती ज्यातून राज्यातल्या जनतेचे मनोरंजन नक्की झाले पण खडसे यांचे भाजपामधले वर्चस्व आणि महत्व खूपच कमी झाले, मोठा फायदा विनाकारण गिरीश महाजन यांचा झाला…


www.vikrantjoshi.com



सत्तेत येण्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात किंवा या राज्यात भाजपा बांधणीत नक्की खडसे यांचा मोठा सहभाग पण कोणत्याही राजकीय पक्षात नेमके तेच असते कि एकदा का अमुक एखाद्या नेत्याला वाटायला लागले कि हे सारे काही माझ्यामुळे घडते आहे,घडले आहे कि तेथेच सारे संपते. ज्या पद्धतीने शरद पवार यांनी अजितदादा किंवा तत्सम नेत्यांना ते स्वतःला मोठे समजायला लागल्यानंतर त्यांचे महत्व कमी केले तेच शिवसेनेत तर फार मोठ्या प्रमाणावर घडले, छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे भास्कर जाधव कृष्णराव इंगळे, गुलाबराव गावंडे, इत्यादी काही नेत्यांना शिवसेना केवळ आमच्यामुळे मोठी आणि जिवंत, असे वाटायला लागले ते बाहेर पडले आणि बऱ्यापैकी राजकारणातून संपले पण शिवसेना मात्र वाढतच गेली हे असेच एकनाथ खडसे यांचे झाले आहे, होते आहे, त्यांना उगाचच वाटत राहते कि आपण केलेल्या आगपाखडीतून त्यांचे नेते घाबरतील आणि आपल्याला संधी देऊन मोकळे होतील पण असे अजिबात होत नसते, वर बसलेले पक्षश्रेष्ठी उलट या अशा प्रकाराला बघून गालातल्या गालात हसत असतात, गम्मत बघतात आणि संताप करणारा नेता मात्र एकाकी होतो किंवा बाजूला पडतो…


एखादी भांडखोर स्त्री कमी पाणी मिळाले कि कसे एकतर्फी एखाद्या समंजस शांत स्त्रीशी भांड भांड भांडते तिला अद्वातद्वा बोलून मोकळे होते त्यातून घडते असे कि सारी सिम्पथी त्या ऐकून घेणाऱ्या किंवा शांत बसलेल्या स्त्रीला मिळते आणि त्या परिसरातभांडणारी बाई भांडखोर म्हणून बाजूला पडते. हे असे त्यादिवशी सभागृहात घडलेले मी बघितले म्हणजे एकनाथ खडसे त्यांच्या पक्षाशी नव्हे तर केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून भांडत होते आणि फडणवीस हे सारे शांतपणे ऐकून घेत होते, कोणतेही प्रत्युत्तर त्यांनी वडिलांच्या या एकेकाळच्या मित्राला दिले नाही आणि खडसे यांचे हे असे नेहमीप्रमाणे चुकले. वास्तविक चंद्रकांतदादा पाटलांसारख्या बुजुर्ग नेत्यांनी एक सहकारी आणि मित्र म्हणून खडसे यांना तुम्ही स्वतःचे कसे राजकीय नुकसान करवून घेता आहेत, समजावून सांगणे अत्यंत गरजेचे असतांना, अनेकांना गम्मत बघायला आवडते आहे कि काय असे आम्हा त्रयस्थांना वाटायला लागलेले आहे…
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *