भाऊ मतदारसंघासाठी खाऊ : पत्रकार हेमंत जोशी

भाऊ मतदारसंघासाठी खाऊ : पत्रकार हेमंत जोशी 

वर्हाडी माणूस उठसुठ दरडोई कोणालाही भाऊ हे टोपणनाव उगाच लावत नाही, आमच्या या विदर्भातली काही माणसे उगाचच आपल्या नावापुढे ‘ राव ‘ टोपण नाव लावून मोकळे होतात पण ते जर लोकांनी बहाल केलेले नसेल तर असे टोपणनाव मग टिंगल टवाळकीचा देखील विषय ठरतात उगाचंच ते एखाद्याला गोविंदराव, रामराव, श्यामराव असे म्हणतांना दिसणार नाहीत, एक मात्र आहे कि आमच्याकडे जावयाला उठसुठ ‘ राव ‘ जोडले जाते म्हणजे अशोकराव कुठे गेले आहेत, विचारले कि अशोकरावांची पत्नी आतून ओरडून सांगते ते सायकल घेऊन चक्कीत दळणाला गेले आहेत, इकडे काय तर राव टोपणनाव तिकडे काय तर हाती कुठलाच वाळा नाही, अशी गम्मत तिकडे विदर्भात फार बघायला मिळते.पण ज्यांना आपणहून आम्ही वर्हाडी अमुक एखादी पदवी टोपणनाव बहाल करतो तेव्हा मात्र एकप्रकारे त्या व्यक्तीचा मान असतो सन्मान केलेला असतो उदाहरण द्यायचे झाल्यास नागपुरात सुमती सुकळीकर या उभे आयुष्य रा.स्व. संघाला वाहून घेतलेल्या विदुषी महान व्यक्ती होत्या त्यांना सारा अख्खा विदर्भ सुमतीताई नावाने ओळखायचा, ताई म्हणजे मोठी बहीण त्यांना बहाल केलेली एकप्रकारे सन्माननीय पदवी होती, मानाचे बहाल केलेले टोपणनाव होते…


राज्याचे अर्थमंत्री वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांना ‘ भाऊ ‘ हि पदवी हे टोपणनाव त्यांनी स्वतःच स्वतःला चिकटवलेले नाही जसे काही पुरुष त्यांच्या बायकांनी त्यांना रोमान्स करतांना रेडहॅण्ड पकडले कि स्वतःच स्वतःच्या थोबाडात पाच सात मारून घेतात किंवा रंगांचमीला काही तरुण स्वतःच स्वतःवर रंग टाकून उगाच लोकांना सांगत सुटतात कि त्यांना अमुक एका तरुणीने लाडात येऊन रंगविलेले आहे वास्तवात त्यांचे थोबाड रंगविण्याचा त्या मुलींचा इरादा असतो तर सुधीर मुनगंटीवार यांचे हे असे नाही कि त्यांनी आपणहून भाऊ पदवी चिकटवून घेतलेली आहे, अजिबात नाही, हि सन्मानिका त्यांना त्यांच्या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांनी कुटुंबांनी बहाल केलेली उत्स्फूर्त पदवी आहे, भाऊ म्हणजे सुधीरभाऊंच, असे समीकरण तिकडे मतदार व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यात उत्स्फूर्तपणे जोडले गेलेले आहे…


www.vikrantjoshi.com


भाऊ म्हणजे मोठा भाऊ, कुटुंबाचा प्रमुख, साऱ्यांचा आधारस्तंभ, प्रसंगी स्वतः त्याग करणारा, इतरांसाठी धावून येणारा तो मोठा भाऊ. सुधीरभाऊ हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघाला आपले स्वतःचे कुटुंब मानतात म्हणून ते प्रत्येकाच्या सुखदुःखात न सांगता मोठा भाऊ नात्याने धावून जातात, त्यांच्या पाठीशी ढालीसारखे खंबीर गंभीर उभे राहतात, हे त्यांनी मुद्दाम ठरवून केलेले नाटक नसते तर सहकार्य करणे मदतीला धावून जाणे मुनगंटीवार यांच्यासाठी रुटीन असल्याने त्यांच्या मतदारसंघात साऱ्याच लोकांनी त्यांना ‘ सुधीरभाऊ ‘ मनापासून मारलेली हाक आहे, बहाल केलेला तो एकप्रकारे सन्मान आहे. असलाच एखादा विरोधक किंवा अगदी शाळेत ते असतांना त्यांच्या बेंचवर शेजारी बसणारा देखील, जो तो त्यांना सुधीरभाऊ म्हणूनच आवाज देतो, हाक मारतो. आपल्या हक्काचा व हट्ट करण्याचा वडीलधारी म्हणजे त्यांचा सर्वांचा लाडका सुधीरभाऊ. होय, जणू त्या सर्वांच्या कुटुंबातला एक सदस्य, मोठा भाऊ, सुधीरभाऊ मुनगंटीवार…


सुधीरभाऊंना लोकांचा कंटाळा नाही आणि लोकांना त्यांचा अजिबात कंटाळा आलेला नाही, त्या दोघांचेही नवपरिणीत जोडप्यासारखे आहे असते म्हणजे सुधीरभाऊ जनतेला घट्ट कवटाळून आहेत तर त्यांचे सारे मतदार त्यांना पक्के प्रेमाचे मोठ्या भावाचे आलिंगन देऊन आहेत. त्या दोघातले म्हणजे सुधीरभाऊ आणि मतदारातले हे एकमेकांवर सख्यामोठ्या भावासारखे जडलेले नाते आहे, अमुक एखादा मतदार भलेही सुधीरभाऊ यांच्या पेक्षा वयाने मोठा असतो तरीही तो किंवा जो तो मुनगंटीवार यांना फक्त ‘ सुधीरभाऊ ‘ या एवढ्याच नावाने टोपणनावाने ओळखतो आणि आवाज देतो. सुधीरभाऊ म्हणजे दुसरा तिसरा इतर कोणीही नाही सुधीरभाऊ म्हणजे लाडका मोठा भाऊ सुधीरभाऊ मुनगंटीवार. सुधीरभाऊंचे त्यांच्या मतदारांना मनापासून कायम सांगणे असते कि मतदानाच्या दिवशी सुटी दिलेली असते ती शेजारच्या जंगलात जाऊन पिकनिक साजरी करण्यासाठी अजिबात दिलेली नसते तर त्यादिवशी घराबाहेर पडून प्रत्येकाने मतदान करायचे असते, पुन्हा यावेळीही त्यांचे तेच साऱ्यांना, मतदारांना हात जोडून सांगणे, महत्वाचे मतदार तुम्ही, मतदान करा, तुमच्या या आवडीच्या पसंतीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने निवडून आणावे…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *