हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी

हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भलेही पहेलवान तयार होत नसतील पण शुद्ध हेतूचे कणखर मनाचे उत्तम बुद्धीचे जाज्व्ल्य हिंदुत्व ठायी ठायी रोमारोमात भिनलेले मनाने मजबूत असे शिस्तप्रिय स्वयंसेवक नक्की तयार होत असतात. आज मी नक्की संघस्वयंसेवक नाही पण त्या संस्कारातूनच घडल्याने वाढल्याने संघ नेमका काय असतो काय करतो काय घडवून आणतो हे मात्र मला नेमके ठाऊक आहे पाठ आहे माहित आहे ज्ञात आहे. नरेंद्र मोदी कोण आहेत, कोणीही नाहीत ते तर एक सामान्य कुटुंबातले होते पण संघस्वयंसेवकाला गरीब श्रीमंत असे वावडे असल्याने तेथे जे संपूर्ण जगात एकसारखे एकसारख्या संचाचे विचारांचे स्वयंसेवक तयार होत असतात त्यातलेच एक आहेत नरेंद्र मोदी. या अशाच संघ स्वयंसेवकांनी सतत ७०-७५ वर्षे एक दिलाने एक विचाराने पाऊल टाकले आणि आधी २०१४ आणि आता २०१९ मध्ये हिंदू राष्ट्राचे अप्रत्यक्ष स्वप्न साकारले, सत्यात उतरले. होय, मोदी नावाच्या संघ स्वयंसेवकाने हे काम केले…


जे तिकडे नरेंद्र मोदी यांनी केले तेच येथे या राज्यात देवेंद्र फडणवीस नामक संघ स्वयंसेवकाने उद्धव ठाकरे यांच्यासारख्या समविचारी लोकमान्य मित्रांना आधी विश्वासात नंतर हाताशी घेऊन करून दाखवले. जे मी सतत सांगत आलो आहे तेच खरे ठरले आहे म्हणजे इतरांचे भय फारसे बाळगण्याचे कारण नाही पण जोपर्यंत या राज्याचे या देशाचे राजकीय वर्तुळ शरद पवार सोडायला तयार नाहीत तोपर्यंत मग ते नरेंद्र मोदी असोत अथवा देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे किंवा तत्सम कोणीही, पवारांच्या रस्त्यात मार्गात आडवे येणाऱ्या प्रत्येकाने समोरचा विरोधक अतिशय स्ट्रॉंग आहे हे मनाशी विचार करूनच पाऊल टाकणे तेवढेच गरजेचे आहे. भलेही लोकसभेला पवारांना हवे तेवढे मनासारखे यश मिळाले नसेल पण राज ठाकरे नावाचा झंझावात विशेषतः शिवसेनेला पर्याय किंवा पवार विरोधकांना नाकात दम आणणारा नेता जनतेसमोर योग्य वेळी उभा केला तो दूरदर्शी चतुर शरद पवार यांनी, आणि राज ठाकरे हा धोकाअद्याप अजिबात टळला नाही याउलट तो विधानसभेला अधिक वाढलेला तुम्हाला दिसेल….


जेव्हा मोठे यश मिळते तेव्हा अधिक जबाबदारी वाढते हे जे निवडणूक निकालाच्या दिवशी फडणवीस म्हणालेत त्यामागे दडलेली शरद पवार राज ठाकरे यांच्यासारखी अचानक उद्भवणारी मोठी शक्ती नजरेसमोर आणूनच फडणवीसांनी ते वक्तव्य केलेलेआहे कारण पवार जेव्हा खवळतात तेव्हा ते अतिशय धोकादायक असतात आणि यश प्राप्त करवून घेण्या कीवा त्यांना जे मनात असते प्रत्यक्ष उतरविण्यासाठी ते अशावेळी वाट्टेल त्या, थोडक्यात कोणत्याही थराला जातात, जाऊ शकतात, हा इतिहास आहे, त्यामुळे पवार थोडेफार शरीराने थकले असतील पण त्यांची जिद्द आणि वृत्ती आजही जशीच्या तशी शाबूत आहे आणि ते प्रसंगी कसे डेंजरस त्यांनी आपल्या घरीच यावेळी दाखवून दिले आहे त्यांनी या लोकसभा निवडणुकीनिमित्ते काहीशा बेभान झालेल्या अजित पवार यांचाच राजकीय खिमा आणि जवळपास खात्मा केला आहे….


याची जाणीव मी आधीच्या माझ्या एका लेखात रोहित पवार यांच्याविषयी उल्लेख करतांना वाचकांना करवून दिलेली आहे. अजित पवारांना लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मावळ या दादांच्या लाडक्या लोकसभा मतदारसंघात अडकवून ठेवले, पुत्रप्रेमाने आंधळे झालेल्या अजितदादांना त्यांनी इतरत्र कोठेही बरोबर घेतले नाही, सुप्रिया सुळे यांना संगतीला घेण्याची त्यांना गरज नव्हती पण भविष्यात पवारांच्या घराण्याचा पुरुष जातींमधला वारसदार म्हणून शरदरावांनी सतत रोहित यांना बरोबर घेणे होते आणि आज देखील तेच घडते आहे. अजितदादा यांचे महत्व कमी केले आहे किंवा कमी झाले आहे रोहित पवार यांचे थेट सुप्रिया सुळे यांच्यासारखे राजकीय इम्पॉर्टन्स शरदरावांनी वाढवून ठेवले आहे. त्यामुळे पुढल्या काही वर्षात अजित पवार जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नये कारण अजितदादांनी तशी तयारी सुरु केल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे….


तर असे हे अतिशय धूर्त कोणत्याही क्षणी बेसावध विरोधकांना चारी मुंड्या चीत आणि चिट करू शकणारे, करणारे शरद पवार. त्यांच्याशी यापुढे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना युतीचे नंबर वन नेते म्हणून सामना करायचा आहे. विधानसभा निवडणूक अगदीच तोंडावर आहे आणि देशात जवळपास सर्वत्र मोदी लाट असतांना ज्या शरद पवार यांनी येथे या राज्यात युतीच्या नाकात दम आणून आणि नाकावर टिच्चून पाच खासदार निवडून आणले. ते अजिबात लेचेपेचे नसलेले, न झालेले शरद पवार येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत आघाडीची सूत्रे नक्की स्वतःकडे घेऊन फार मोठे आव्हान युतीसमोर उभे 

करतील हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. जे एकेकाळच्या त्यांच्या राजकीय वंशाला, अजितदादा पवार या पुतण्याला राजकारणातून नो व्हेअर करू शकतात ते शरद पवार कधी जातीचे तर कधी विविध क्लुप्त्यांचे जाळे युतीसमोर पसरवून विशेषतः त्यात देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि युती कसे अलगद अडकतील याची काळजी घेतील. लोकसभेपेक्षा विधान सभा निवडणूक युतीला अधिक जड जाणार आहे त्यास्तव मोठी तयारी करणे युतीला अतिशय गरजेचे आहे, आवश्यक आहे…

तूर्त एवढेच.


 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *