रा. स्व. संघ : काल आज आणि उद्या : २ : पत्रकार हेमंत जोशी


रा. स्व. संघ : काल आज आणि उद्या : २ : पत्रकार हेमंत जोशी 

आजवरच्या अत्यंत यशस्वी सरसंघचालकांपैकी एक श्री मोहन भागवत, म्हणून त्यांना सुचवावेसे वाटते कि जसे संघ आणि संघाशी संबंधित प्रत्येक फांदीमध्ये क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक विविध बदल घडवून संघाला जगभरात अधिक बलवान, शक्तिमान, आधुनिक, प्रखर, प्रभावी करून सोडले त्यांनी आपल्या निवृत्तीपूर्वी हेही नक्की करून सोडावे म्हणजे संघ स्वयंसेवक राजकारणात गेल्यानंतर सारे तत्व व सत्व बाजूला ठेऊन वेगाने भ्रष्टाचाराला जे जवळ करतो त्यापासून जर संघाला किंवा भागवतांना अशांना थांबवता रोखता आले तर त्यासारखे दुसरे यश नसेल कारण एकदा का संघाने या देशाला भ्रष्टाचारविरहित नेते दिले तर हिंदुत्व व हिंदुस्थान शंभर  टक्के अख्य्या जगाला मागे टाकेल पण भ्रष्टाचाराची हि कीड कोणत्याही परिस्थितीत राजकारणात यापुढे उतरणाऱ्या संघ स्वयंसेवकला लागता कामा नये. खबरदार! स्वतःच्या व कुटुंबाच्या भल्यासाठी वाममार्गाने पैसे मिळविलेत तर त्याक्षणी तुम्हाला संघ व भाजपापासून दूर करण्यात येईल असे जर भागवत किंवा संघ परिवाराकडून राजकारणात उतरणाऱ्या स्वयंसेवकाला सक्तीने व युक्तीने सांगितल्या गेले तर त्यासारखे दुसरे उत्तम काम नसेल. भागवतजी किंवा मोदीजी राजकारणात उतरल्यानंतर जवळपास साऱ्याच संघ स्वयंसेवकांनी भ्रष्टाचाराला आवळणे हे तुमचे आजचे मोठे अपयश आहे, राजकीय पक्ष सांभाळण्यासाठी निवडणूक लढण्यासाठी जे काय थोडेफार कारावे लागते ते ठीक आहे पण राजकारणातून श्रीमंत होण्याची जी स्पर्धा अलीकडे विशेषतः मुंडे महाजन गडकरी नेतृत्व उदयानंतर या राज्यात किंवा या देशात संघ वर्तुळात देखील वाढीस लागली ते चित्र अजिबात चांगले नाही हिताचे नाही देशाला बरबाद करणारे आहे जे संघाला न आवडणारे न परवडणारे आहे… 

राजकारणात उतरणारा स्वयंसेवक झपाट्याने बदलतो, मान्यवर नेता होताच वाममार्गाने पैसे मिळवायला लागतो त्यावर सारे संघ स्वयंसेवक किंवा संघाचे व संघाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते मनातून अतिशय अस्वस्थ असतात, विशेष म्हणजे असे नेते झालेले बहुसंख्य स्वयंसेवक आपल्या सहकाऱ्यांकडून देखील काम करून दिल्यानंतर पैशांची अपेक्षा ठेवतात, अत्यंत महत्वाचे म्हणजे या नेत्यांच्या सभोवताली संघ विरोधकांचाच अधिक घोळका पुढे जमा झालेला असतो त्याचवेळी स्वतः संघ स्वयंसेवकाला एकतर ताटकळत उभे राहावे लागते किंवा अपमानित होऊन काम न होता बाहेर पडावे लागते. कालपर्यंत घरचा डबा आणून आपल्या खांद्याला खांदा लावून संघात उत्कृष्ट कार्य करणारा हाच तो राजकारणात उतरल्या नंतर बदल झालेला स्वयंसेवक बघून संघातल्या इतरांना मोठा धक्का बसतो. याविषयी माझे लिखाण वाचून जगभरातल्या अनेक संघ स्वयंसेवकांच्या मला अप्रतिम प्रतिक्रिया आल्या. जळगावात माझे एक संघ स्नेही राहतात दीपक घाणेकर, ते व त्यांचे कुटुंबीय जसे यशस्वी उद्योजक आहेत तसे ते सारेच्या सारे संघ डिव्होटी आहेत त्यांच्या संघ कार्याला तोड नाही एवढे ते सारे कट्टर आहेत. दीपक घाणेकर पोटतिडकीने लेखी प्रतिक्रियेत म्हणाले, मुरलेल्या पत्रकारांसमोर लिहिण्याचे धाडस करत आहे, आपले संघासंबंधी लिखाण वाचले, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यावरच मीही एकदा असाच प्रश्न दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांना विचारला होता. तेव्हा ठेंगडीजींनी दिलेले उत्तर अजून लक्षात आहे. ते म्हणाले जर संघ स्वयंसेवक इतर क्षेत्रात विशेषतः राजकारणात उतरल्यानंतर संघ शाखेत येणे बंद करीत असेल तर त्याची अवस्था आपोआप पितळी भांड्यावर डाग पडल्यासारखी होते. राजकारणात काम करतांना पाय घसरण्याची शक्यता असते. राजकारणात राहून नियमित संघ शाखेवर गेल्यास असा स्वयंसेवक पूर्वीसारखा आधीसारखाच लखलखीत राहील. खरे आहे ठेंगडी यांनी घाणेकर यांना सांगितलेले कि नेता झाल्यांनंतर जर अमुक एखादा संघाची नाळ जर तोडणार नसेल तर बिघडण्याची किंवा मूळ प्रखर राष्ट्र प्रेम किंवा सुविचारांपासून फारकत घेण्याची शक्यता आपोआप मावळते… 

श्रीमान बळवंत देशमुख माझे फार पूर्वीपासून मित्र आहेत ते सरकारी अधिकारी होते आता निवृत्त झाले आहेत ते मराठा देशमुख आहेत आणि मला सर्वार्थाने मोठे करण्यात राज्यातल्या समस्त मराठ्यांचा मोठा हात आहे. याच बळवंत देशमुख यांचीही प्रतिक्रिया अशीच अत्यंत बोलकी आहे. ते लिहितात, आजचे तुमचे संघाविषयी लिखाण मेजवानीप्रमाणे वाटले. मनाला भावले व पटले. जोशीजी मी बाल स्वयंसेवक आहे आणि आपण सांगितलेला सिद्धांत तंतोतंत खरा उतरलेला आहे. अगदीच थोडे अपवाद सोडले तर राजकारणात उतरलेली संघातील मंडळी भ्रष्ट झालेली, संस्काराच्या विपरीत वागत असलेली मीही पाहतो आहे. काही वेळा ती अपरिहार्यताही आहे असे मला वाटते. मी गेली ४० वर्षे माझ्या नात्यातील आणि माझे ऐकणाऱ्या मराठा समाजातील तरुण तरुणींना हेच सांगतो कि, तुम्ही संघाच्या शाखेवर नियमित या आणि ब्राम्हण समाजातील मुलं मुलींशी घरांशी मैत्री करा. मी अगदी लहानपणापासून संघ पारिवारात आणि ब्राम्हण समाजात वाढलो आहे आणि नातेही जोडलेले आहे, एवढेच. बळवंत देशमुख म्हणतात ते नक्की खरे आहे कि ब्राम्हण म्हणजे संघ अपवाद एखादे पुण्यातले गाडगीळ पण १९८० नंतर संघ म्हणजे ब्राम्हण असे अजिबात राहिलेले नाही किंबहुना संघाने व्यापक विचार करून इतर ज्ञाती मधल्या तरुणांना संघातून पुढे आणले म्हणून संघ कार्य तेही जगभरात झपाट्याने वाढले आणि संघ स्वयंसेवक मोदी नावाने आडनावाने पुढे आले अगदी पंतप्रधान किंवा अमित शाह यांच्यासारखे प्रभावी व तेजस्वी देखील ठरले. ब्राम्हण आणि संघ हे दोन्ही विचार नक्की देशाला किंवा व्यक्तीला पुढे नेणारे आहेत पण आमच्यातही किंवा संघातही जर भ्रष्टाचाराला घुसण्याची संधी मिळत असेल तर अपेक्षा तरी कोणाकडून ठेवाव्यात ? 

क्रमश: हेमंत जोशी 

Comments 1

  1. Gamma Pailvan says:

    नमस्कार हेमंत जोशी!

    संघाची एक मोठी त्रुटी म्हणजे तिथे अध्यात्मिक साधना शिकवली जात नाही. शाखेत मानसिक संस्कार योग्य रीतीने केले जातात. मात्र त्यांतनं पुढे अध्यात्मिक बैठक पक्की करावी लागते. ती न केल्यास पाय घसरतो.

    आपण सारे भारतमातेचे भक्त आहोत हा भाव साधनेनेच दृढ होतो. इतर कशानेही नाही. आपण केलेली मदत लोकं विसरतात, पण साधनेचा संस्कार सहजासहजी पुसला जात नाही. सध्याच्या सरसंघसंचालकांस हे मान्य व्हावे. गोळवलकर गुरुजींची साधना अतिशय प्रखर होती. ते जसे अंतर्बाह्य साधक होते तसे साधक संघाने घडवले पाहिजेत. हे वेळखाऊ असलं तरी अशक्य खास नाही. संघाकडे तर त्यागी व कामसू कार्यकर्त्यांची भली थोरली सेना आहे. तिला अध्यात्मिक रीत्या सजग करणे, इतकंच बाकी आहे. हे काम खास संघाच्या ढंगात पार पाडता येईल. फक्त इच्छाशक्ती हवीये. ती सरसंघसंचालक मोहन भागवत यांना लाभो.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

Leave a Reply to Gamma Pailvan Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *