गुड बाय श्रीदेवी : पत्रकार हेमंत जोशी

गुड बाय श्रीदेवी : पत्रकार हेमंत जोशी 

तो एक योगायोग असावा म्हणजे २४ फेब्रुवारीला श्रीदेवी अचानक आपल्यातून निघून गेली कायमची, तेही दुबईत, तीही दुबईत आणि मी देखील दुबईतच होतो. फेब्रुवारी मध्ये दुबईत फूड इंडस्ट्रीशी संबंधित फार मोठे जागतिक स्तरावरचे प्रदर्शन असते, ते बघायला आलो होतो आणि बातमी कानावर आली, श्रीदेवी गेल्याची….


सर्वप्रथम मी श्रीदेवीला बघितले ते जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये मी पोहण्यासाठी जात असे, अनेक सिने स्टार तेथेच पोहायला येतात, कोणाकोणाची नावे सांगू…साधारणपणे १५-१६ वर्षे उलटली असतील, श्रीदेवी तिच्या दोन्ही मुलींना स्विमिंग करण्या घेऊन येत असे, मुली पोहायच्या, श्रीदेवी डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे एकटक बघत असे. तशी ती बोलायला साधी सरळ होती, पण या सिने स्टार्स शी बोलायला गेले कि ते उगाच भाव खातात, त्यातले ऋषींकपूर सारखे काही महाभाग पाणउतारा देखील करतात, म्हणून त्यांच्यापासून चार हात लांब राहून गम्मत बघणे योग्य ठरते…


त्यानंतर काही वर्षे उलटलीत आणि श्रीदेवीने मी आधी ज्या सात बंगला परिसरात राहत असे त्या इमारतीला लागूनच बंगला घेतला ज्या बंगल्यात नाग नागिणीचे वास्तव्य असल्याने तो रिकामाच पडलेला होता. हा बंगला घेतल्यावर तिला ते काही महिन्यांनी कळले त्यामुळे त्या बंगल्याचे तिने सुशोभीकरण करूनही तेथे ती राहायला आली नाही. नंतर म्हणे तिने बोनी कपूर साठी त्यावर कर्ज देखील घेतले होते, तसा तो बंगला आजही अशुभ मानल्या जातो त्यामुळेच सहज शक्य असूनही मी तो घेतला नाही. पण अनेकदा ती त्या बंगल्यात सहजच येऊन बसायची, निघून जायची, आम्हाला ती तिथे फिरतांना दिसायची…


असा हा योगायोग, म्हणाल तर माझे अनेकदा श्रीदेवी च्या आसपास वास्तव्य असायचे पण फिल्मी मंडळींपासून चार हात दूर राहणे केव्हाही चांगले म्हणून शक्य असूनही मी तिच्या पासून दूर होतो आणि ती गेली तेव्हा मी देखील दुबैतच होतो, असेल काहीतरी मागल्या जन्माचे नाते. जे दिसायचे त्यावरून ती अत्यंत हळवी असावी म्हणूनच तिने त्या टकल्याशी लग्न केले आणि नटी असूनही शेवटपर्यंत नाते टिकविले…


अलीकडे ‘ तुमच्यासाठी काय पण ‘ कार्यक्रमात वयाच्या तिशीतच चार दोन वेळा आडनावे बदलविणारी भार्गवी नावाची नटी, कुठल्याशा नटीविषयी अनुभव सांगत होती कि त्या दोघी दुबई मध्ये असतांना मीना बाजार मध्ये खरेदी करतांना भान विसरल्या आणि त्यांची विमानतळ गाठताना तारांबळ उडाली. या किस्स्यांवरून मला एक चुटका आठवला,हिंदीतला खलनायक म्हणतो, उस पेडके नीचे पचास करोड लेके आना,आणि मराठीतला खलनायक म्हणतो, त्या झाडाखाली पन्नास हजार रुपये घेऊन ये…हे असे कर्मदरिद्री बोलणे भार्गवीच्या बोलण्यातून आले. दुबईतल्या मीना बाजार मध्ये खरेदीला जाणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणे किंवा ज्यांच्या खिशात पैसे नसतात ते तेथे जातात आणि त्या कार्यक्रमात भार्गवी असे सांगत होती जणू त्यांना एमिरेट्स मॉल मध्ये खरेदी करतांना उशीर झाला. आपण मराठी हे असे अर्धवट ज्ञानातून आपले अमराठी लोकांत हे असे हसे करून घेतो. भार्गवीला वाटले असावे, सारे मराठी माणसे उल्लू आहेत, काहीही सांगितले तरी चालते…


पूर्वी नाही का, अमुक एखाद्या घरातला परदेशात गेला कि आपल्याला वाटायचे तो तेथे खूप मोठा माणूस आहे पण असे अजिबात नसते, येथे भारतातली माणसे अनिवासी भारतीयांपेक्षा कितीतरी अधिक सुखाने जगतात, जे तेथे गेले नाहीत त्यांचा तो भ्रम असतो….

श्रीदेवी ला मनापासून श्रद्धांजली..!!


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *