राजकारणातले इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी

राजकारणातले इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी 

शरद पवारांचे अलीकडे काही दिवसातले शांत दिसणे असणे म्हणजे त्यांना राजकारणात रस राहिलेला नसून ते पुढल्या काही दिवसात पत्नीसह चारी धाम यात्रेला निघून जाणार असल्याचे किंवा उरलेले आयुष्य नातवंडात रमून त्यांना शाळेतून ने आण करणे किंवा बारामतीच्या पारावर बसून कानटोपी घालून समवयस्क मित्रांशी गप्पा त्यानंतर येतांना देवपूजेसाठी फुले आणि बायकोसाठी गजरा आणणे किंवा गावातल्या भजनीमंडळाचे सदस्यत्व स्वीकारून गावोगावी खेडोपाडी मंदिरात भजनाचे कार्यक्रम देणे, तेथे मी गायलेल्या भानावर जमलेल्यांनी कशी दाद दिली हे गहिरी येऊन पानाचा विडा तोंडात कोंबता कोंबता घरच्यांना रंगवून सांगणे, असे काहीही घडणार नाही, एवढेच सांगतो शरद पवारांचे या दिवसात शांत बसणे म्हणजे हि वादळापूर्वीची शांतता आहे, पुढे नक्की काहीतरी घडणार आहे हे माझे वाक्य तुम्ही नमूद करून ठेवावे…

१९९५ ते २००० आपल्या या राज्यात शिवसेना भाजपा आणि अपक्ष युतीचे सरकार होते आणि तदनंतर देखील आपल्या राज्यात शंभर टक्के पुन्हा युती सत्तेत येणार असल्याचे जो तो ठासून सांगत होता, पवार मात्र शांत होते जसे ते आज आहेत, त्यावेळी नेमके उलटे घडले पुढले सरकार येण्यासाठी, सत्तेत येण्यासाठी शिवसेना भाजपा युतीला तब्बल १५ वर्षे वाट पाहावी लागली. आजही वरकरणी शरद पवार जे शांत दिसताहेत तसे अजिबात नाही त्यांना पुढले पंतप्रधान व्हायचे आहे आणि माझे हेही वाक्य लिहून ठेवा, पुढले पंतप्रधान जर नरेंद्र मोदी झाले नाहीत तर त्याजागी एकमेव, फक्त आणि फक्त शरद पवार हेच असतील थोडक्यात पुढल्या पंचवार्षिक योजनेत 

एकतर पवार पंतप्रधान असतील किंवा नरेंद्र मोदी, पण त्यासाठी पवारांना या राज्यातून किमान २२-२३ खासदार या राज्यातून निवडून आणावे लागणार आहेत आणि हे त्यांना यावेळी शक्य आहे का, त्यावर पुढला लेख माझे पुढले लिखाण आकर्षण ठरेल…


आम्हाला वाटते कि शरद पवारांच्या बाबतीती हि वादळापूर्वीची शांतता आहे, पण मुख्यमंत्र्यांना तसे अजिबात वाटत नाही किंवा त्यांनी तसे अलीकडे ट्विट देखील केले होते कि पवारांनी आधी आपल्या पक्षाचे बघावे थोडक्यात आपले घर सांभाळावे मग दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहावे. सहज सुचले म्हणून बोलून टाकले असा फडणवीसांचा स्वभाव नाही किंबहुना भल्या भल्या नेत्यांच्या त्यांनी जमा केलेल्या भानगडी व भानगडींचे पुरावे, मला वाटते याबाबतीत फडणवीस हे मला नेहमी पवारांच्या देखील दोन पावले नेहमी पुढे वाटतात त्यामुळे जसे पवारांशी पंगा घेणे किंवा दंगा करणे त्यांच्या विरोधकांना महागात पडते तेच फडणवीसांच्या बाबतीत देखील त्यांच्या विरोधकांचे होऊ शकते फक्त खलनायकी पद्धतीचे राजकारण त्यांच्यात भिनलेले नसल्याने विनाकारण किंवा पुढे जातोय म्हणून फडणवीस कोणाचाही ‘ भुजबळ ‘ करणे शक्य नाही, पण फडणवीसांकडे असलेली राजकीय माहिती, आणि माझ्याकडे पवारांच्या किंवा त्यांच्या राष्ट्रवादीच्या हालचालींची बारीक सारीक माहिती, मला नाही वाटत त्या दोन्ही मध्ये फारसा फरक असेल, पुढल्या परिच्छेदात जे मी सांगेल ते वाचून तुमचे केवळ मनोरंजन होऊन तुम्ही जागच्या जागी उंचच उंच उड्या मारणार नाहीत याउलट केवढी हि खळबळजनक माहिती असे मनातल्या मनात पुटपुटून कदाचित किंवा अगदी निश्चित तुम्ही मला लाडाने कडेवर घेऊन गावभर मिरवून आणाल, आनंदाच्या भरात स्वतःभोवताली गोल गोल गिरक्या घेऊन मोकळे व्हाल. 

क्रमश :


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *