उद्धव व राणे एकत्र येणे : पत्रकार हेमंत जोशी

उद्धव व राणे एकत्र येणे : पत्रकार हेमंत जोशी 

येथे राजकारणात कुठेही काहीही उगाचच घडत नसते, त्यामागे राजकीय गणितांची जुळवाजुळव असते. सामान्य वाचक एखादी बातमी वाचून मोकळा होतो, बातमी मागची बातमी त्याच्या लक्षात येत नसते. एक मात्र तुम्ही अवश्य करीत राहा, माझे ऑफ द रेकॉर्ड चे अंक संग्रही ठेवत चला, त्यातल्या प्रत्येक अंकातील प्रत्येक पानावर बातमी मागची बातमी मी तंतोतंत मांडलेली असते, त्यातले संदर्भ भविष्यात नेमके काय घडेल त्यावर आधारित असतात, अर्थात या पद्धतीचे लिखाण पत्रकार भाऊ तोरसेकर यांचेही असते, पण अर्थ असा काढू नका मी स्वतःला तोरसेकरांच्या शेजारी नेऊन बसवलेय. नाय….नो….नेव्हर….मी स्वतःला तोरसेकर समजणे म्हणजे येरावार यांनी स्वतःला मुनगंटीवार समजणे किंवा शायना एन सी यांनी स्वतःला सावित्रीबाई फुले समजणे किंवा वर्षभरापासून म्हाडातून सुटीवर गेलेल्या भारती यांच्या नवऱ्याने म्हणजे हेमंत लव्हेकर यांनी स्वतःला भूखंड माफिया समजणे किंवा बांधकाम व्यवसायातील संजय काकडे समजण्यासारखे….

नेमक्या मुद्द्याकडे वळतो. दिनांक २३ जूनला कोकणातल्या कुडाळला मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण भूमिपूजन समारंभ थाटामाटात पार पडला त्यानिमीत्ते एका नव्या राजकीय भविष्याला सुरुवात झाली आहे, जो संदर्भ तब्बल ५-६ महिन्यांपूर्वी मांडून मी मोकळा झालो होतो, जेव्हा जो तो वर्तमानपत्रात लिहून किंवा विविध वृत्त वाहिन्यांवर सांगून मोकळा व्हायचा कि पुढल्या काही दिवसात नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश ठरलेला आहे, नक्की आहे तेव्हा मी एकमेव लिहून ठेवणारा होतो कि नारायण राणे यांना भाजपा मध्ये प्रवेश दिल्या जाणे अशक्य आहे, तसले काहीही अजिबात घडणार नाही, नेमके तेच नेहमीप्रमाणे घडले, जे मी लिहून ठेवले, नारायण राणे यांचे बस्तान भाजपा मध्ये वसले बसले नाही, तेव्हाच हे हि सांगितले, लिहून ठेवले होते कि नारायण राणे यांना शिवसेनेत घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे, राणे शिवसेनेत जातील, उद्धव त्यांना मतभेद मनभेद विसरून शिवसेनेत एक दिवस नक्की घेतील. वास्तविक जेव्हा राणे भाजपामध्ये जाण्यासाठी धडपड करीत होते, तेव्हाच राणे यांना शिवसेनेत जाणे आणि शिवसेनेत घेणे बऱ्यापैकी सोपे झालेले होते, ५-६ महिन्यांपूर्वीच जर राणे किंवा त्यांच्या अपत्यांनी सेनेवर तोंडसुख घेणे आटोपते घेतले असते तर ताट तयार होते, राणेंना मातोश्रीवरल्या पंक्तीला केवळ जाऊन बसणे तेवढे बाकी होते कारण राणे विषयी उद्धव यांच्या मनातली कटुता काढण्यात जे दोघे यशस्वी ठरले होते, त्या दोघांचे इत्यंभूत संदर्भ याबाबतीत माझ्या कानावर जसेच्या तसे होते….

थोडक्यात जे सहा महिन्यांपूर्वीच घडणे सहज शक्य होते ते यापुढे नजीकच्या काळात घडणार आहे, हे ध्यानात घ्या, नारायण राणे यांना सन्मानपूर्वक सेनेत घेतल्या जाईल हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे आणि अनुभवातून सांगतो, नारायण राणे यांनी शिवसेनेत जाणे अधिक योग्य आहे, मनातली अस्वस्थता किंवा आलेली असुरक्षितता त्यांना शिवसेनेत गेल्यास अगदी सहज घालविणे शक्य आहे. नारायण राणे आणि भाजपाकडून सतत टार्गेट केल्या जाणारी शिवसेना, दोघांचीही मोठी ताकद त्यातून वाढणार आहे….

वास्तविक राणे आणि शिवसेना प्रसंगी मुंबईत भलेहि एकमेकांच्या बाबतीत काही प्रसंग शांततेने घेतील पण कोकण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विषय समोर आला कि राणे समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना खाऊ का गिळू पद्धतीने बघायचे, यापुढे तसे घडेल वाटत नाही, गोवा हायवे चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रमात सर्वांदेखत राणे आणि उद्धव एकमेकांविषयी जो आदर व्यक्त करून मोकळे झाले, मित्रहो, राज्यातले राजकीय संदर्भ बदलायला त्या प्रसंगातून सुरुवात झाली आहे, राणे सेनेत जातील आणि उद्धव त्यांना पूर्वीच्याच प्रेमाने जवळ घेतील, यात शंका घेण्याचे कारण नाही. भूमिपूजन कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी त्याठिकाणी वातावरण तणावाचे होते असे आमचा कुडाळ चा वार्ताहर उदय तानपाठक म्हणाला, पण राणे आणि उद्धव एकमेकांच्या प्रति जेव्हा आदरयुक्त उद्गार काढून मोकळे झाले, सिंधुदुर्गातले सारे तदनंतर सभोवताली गिरक्या घेऊन नाचायला लागले किंवा कवी रामदास आठवले त्याप्रसंगी जे म्हणाले तेच खरे आहे…

आता होणार आहे मुंबई,गोव्याला जाणे,

 इकडे एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे…!! 

तूर्त एवढेच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *