आदित्य हे वागणे बरे नव्हे : पत्रकार हेमंत जोशी

आदित्य हे वागणे बरे नव्हे : पत्रकार हेमंत जोशी 

एका विहिरीभोवती लोकांची गर्दी जमलेली, जो तो ओरडतोय, त्याला वाचवा, त्याला वाचवा. एक शाळकरी मुलगा विहिरीत पडल्याने लोकांचा हा गलबलासुरु होता. गावातला उडाणटप्पू गण्या, लोकांनी त्याला उडी मारतांना बघितले नि त्यांचा जीव भांड्यात पडला. गण्या त्या मुलास अलगद घेऊन विहिरीबाहेर येताच, लोकांनी त्याला घेरले, प्रश्न विचारायला सुरुवात केली, तुम्ही पोहणे केव्हा शिकलात, यापूर्वीही तुम्ही एखाद्याला असे वाचवले आहे का, विहिरीत उडी घेतांना तुम्हाला काय वाटले, कसे वाटले, हे असे असंख्य प्रश्न. सारे प्रश्न ऐकून गण्या वैतागला नि सर्वांना शांत करत म्हणाला, मी तुमच्या साऱ्याप्रश्नांची नक्की उत्तरे देतो पण हे सर्वात आधी सांगा कि मला विहिरीत कोणी ढकलले ? 

ठाकरे कुटुंब बुडते आहे, अडचणीत येते आहे, माहित असतांना देखील त्यांना वाचवायला कोणीच पुढे येत नाही म्हटल्यावर मी येथे गण्या व्हायचे ठरविले आहे, त्यांना वाचवायचे हे मनाशी ठरविले आहे. ठाकरेंना बुडविण्यात अलीकडे पुढाकार खुद्द आदित्य यांनी घेतल्याने त्यांना खासे बोल सुनवायाचे, मी ठरविले आहे. बघूया यश आले तर. आदित्य ठाकरे आधी विधानसभा लढवतील तदनंतर उपमुख्यमंत्री होतील, होणार आहेत त्यावर नेमके सांगायचे झाल्यास राजाने राजा सारखे जगायचे असते राजाने कधीही प्रधान व्हायचे नसते. आदित्य आज एकमेव राजे आहेत, राजघराण्यातले एकमेव आहेत, त्यांनी निवडणूक लढवून २८८ मधले एक, अशी बिरुदावली स्वतःभोती चटकावून न घेतलेली बरी…

निवडून येणाऱ्या २८८ आमदारांना पदे चिटकवून घेण्याची मनोमन, सुप्त इच्छा असते त्यातले एक आदित्य देखील, असे ज्यादिवशी दृश्य या राज्याला या देशाला बघायला मिळेल त्यादिवसापासून भलेहि ठाकरे राजकारणातून पूर्णतः जरी खालसा होणारे नसले तरी त्यांची आजची लोकप्रियता नक्की झपाट्याने घसरलेली, येथल्या लोकांना बघायला मिळेल. चवथ्या पिढीने आधीच्या पिढ्यांचाच आदर्श ठेवून येथले राजे म्हणून मानाचे सन्मानाचे फेटे डोक्यावर चढवावेत, योग्य ठरणारे. काय गरज आहे, खुद्द राजाने प्रधान होण्याची. लताबाई त्यांचे स्वतःचे गाणे गात आलेल्या, आवाज अप्रतिम असूनही लता किंवा आशा यांच्या खालोखाल असूनही अनुराधा पौडवाल यांच्याकडे लोकांनी लता म्हणून किंवा लताच्या तोडीची गायिका म्हणून कधीही बघितले नाही कारण अनुराधा यांनी सुरुवातीला लता किंवा अन्य मान्यवर गायिकांची अनेक गाणी गायिली आणि तेथेच त्यांचे महत्व संपले…

आदित्य ठाकरे यांना प्रबोधनकार, बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंना लाभलेली राजाची गादी पुढे चालवायची आहे, त्यांनी का म्हणून रामराव आदिक गोपीनाथ मुंडे नाशिकराव तिरपुडे होऊन झपाट्याने लोकांच्या मनातून उतरावे. मंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना बाळासाहेब किंवा प्रबोधनकार म्हणून लोकांनी कायमस्वरूपी ध्यानात ठेवणे अजिबात शक्य नाही, आमदारकी वाटणाऱ्याने मंत्रीपदे वाटणाऱ्यानेच त्यावर डोळा ठेवणे, त्याचे दूरवर चुकीचे परिणाम तदनंतर आदित्य ठाकरे व ठाकरे कुटुंबाला भोगावे लागतील हे नक्की आहे. राजाने कायम राजासारखेच राहायला हवे, पदाचे महत्व कमी होईल असे वागणे योग्य ठरणारे नसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सार्या सरसंघचालकांनी अगदी स्वप्नात देखील सत्तेत जाण्याचे ठरविले नाही त्यामुळे त्यांची ख्याती जगभर पसरली आणि त्यांच्यासमोर त्यांना भेटायला येणारे नतमस्तक होतात, नतमस्तक झाले अगदी ताठ बाण्याचे नरेंद्र मोदी सुद्धा…

www.vikrantjoshi.com

आदित्य थोरांचे बोल ऐकणारे असतील तर त्यांनी नक्की अनुभवी ज्ञानी तत्वज्ञानी गुरुस्थानी असलेल्या थोरांचा सल्ला घ्यावा, मला खात्री आहे, सारे हेच सांगतील, आदित्य शिवसेना नावाच्या साम्राज्याचे अनभिषिक्त राजे आहेत प्रधान होण्याचे स्वप्न त्यांनी स्वप्नात देखील बघू नये. आदित्य ज्यादिवशी मंत्रालयात सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसतील, तेव्हा ते कॉमन मॅन म्हणून ओळखल्या जातील, जो येईल समोर त्या प्रत्येकाशी त्यांना हसतखेळत सामोरे जावे लागेल, राजासारखे नव्हे तर इतर जसे मंत्री केव्हाही अव्हेलेबल असतात तसे भेटावे लागेल, राजाची शान कमी होईल, राजाचे महत्व झपाट्याने कमी होईल…

आदित्य भोवताली मग चार टगे उभे असतील जे सामान्य माणसाला आत आदित्य यांना भेटायला पाठवणार नाहीत. नारायण राणे यांची एकेकाळी असलेली प्रचंड लोकप्रियता झपाट्याने कमी होण्याचे कारण हे असेच टगे त्यांच्या सतत सभोवताली उभे असायचे. विरोधकांना नेमके जे हवे आहे तेच आदित्य चुटक्यातल्या गण्यासारखे करताहेत. खड्ड्यात ढकलून वर एक दगड घालून बाहेरून गम्मत बघणारे राजकारणात अनेक असतात. ज्यांना ठाकरे कुटुंबाचे चांगले बघवत नाही बघवत नसेल अशाच काही मंडळींनी आदित्य यांना निवडणूक लढविण्याचा नंतर उपमुख्यमंत्री होण्याचा अतिशय चुकीचा सल्ला दिलेला आहे. आज मी जे याठिकाणी लिहिले आहे ते तुम्ही तुमच्याकडे नक्की जपून ठेवावे, घोडा मैदान जवळ आहे, आदित्य यांची चुकीच्या दिशेने घोडदौड सुरु आहे, अनुभवातून मी हे येथे याठिकाणी लिहून ठेवलेले आहे…

मित्रा आदित्य, राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो त्याने २८८ पैकी आपण एक, असे चुकीचे समीकरण स्वभोवताली चिटकवून मोठे राजकीय नुकसान करवून घेऊ नये. आपल्याकडे त्यागाला महत्व आहे, भोगाला उपभोगला नव्हे. पालख्या संतांच्या काढल्या जातात सत्तेत बसणाऱ्यांच्या बसलेल्यांच्या नव्हे. कोणत्याही राजाची पालखी निघत नाही मात्र त्याग करणाऱ्या संतांच्या पालख्या निघतात, देवस्थानी त्यांना ठेवून नमस्कार केल्या जातो. नको हे असे चुकीचे वागणे निर्णय घेणे ज्याची वाट समांतर अन्य हिंदू संघटना आतुरतेने बघताहेत. मराठी लोकांच्या मनातून उतरलेली शिवसेना, ज्यांना बघायची आहे, तुमचे ते सत्तेत जाऊन बसणे, त्यांच्या ते मनासारखे असेल, कदाचित तुमचा गण्या व्हावा असा सुप्त गुप्त प्रयत्न, त्यांचाही हा मोठा डाव असू शकतो, सावध असावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *